Skip to content

” मला असं वाटलं नव्हतं की तू माझ्याशी असं वागशील. “

” मला असं वाटलं नव्हतं की तू माझ्याशी असं वागशील. “


मधुश्री देशपांडे गानू


अस्मिता अत्यंत हुशार, करिअरला प्राधान्य देणारी मुलगी. चार्टर्ड  अकाउंटंट. नामांकित फर्ममध्ये भल्यामोठ्या पगाराची नोकरी. योग्य वयात तिचे लग्न झाले. असीम तिचा नवरा, तोही आयटीमध्ये. दोघेही करिअरला प्राधान्य देणारे. स्वतंत्र विचार, ठाम मतं असणारे. एकमेकांचे विचार, मतं, भविष्याबद्दलच्या कल्पना, इच्छा, स्वप्नं, आवडीनिवडी सगळे पसंत पडल्यावर हे लग्न झालं.

दोघेही सकाळी लवकर बाहेर पडत ते उशिरा घरी येत. घरी सासू सासरे दोघेही उच्चशिक्षित. सासू ही बँकेत नोकरी करून आता निवृत्त झालेली. तरीही हळूहळू तिला अस्मिताचं वागणं खटकू लागलं. तिने घरातली कामं करायला हवीत. स्वयंपाक करून जायला हवं. सगळे सणवार सोपस्कार व्यवस्थित पार पाडायला हवेत. असा सासूचा अट्टाहास होता. दिवसभरासाठी गृह मदतनीस सखी ठेवता आलीच असती…

हे सगळं फार काही जमणार नाही, आणि फारशी आवडही नाही हे अस्मिताने आधीच सांगितलं होतं. तरीही तिला टोमणे मारणं, सतत तिच्या तक्रारी असीमला सांगणं, तिला अपमानास्पद बोलणं, तिच्या आई वडिलांचा उद्धार करणे हे सगळं सुरू झालं. गंमत म्हणजे असीमही कधीकधी आईच्या बोलण्यात येऊन अस्मितालाच बोल लावू लागला. कहर तर तेंव्हा झाला, जेव्हा सासूबाईंनी नातवासाठी टुमणं लावायला सुरुवात केली.

दोघांचं आधीच तीन-चार वर्ष काही नाही असं ठरलं होतं. पण आईच्या सततच्या आग्रहाला बळी पडून असीमही तसंच बोलू लागला. तेंव्हा मात्र तिला आश्चर्याचा धक्का बसला. आई होण्यासाठी तिची मानसिक तयारी नव्हती आणि आज एक मूल वाढवणंही अत्यंत कठीण जबाबदारी होती. हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय होता.

तो परस्पर असीमला बदलण्याचा काहीच अधिकार नव्हता. तिचे आणि त्याचेही पुढील भविष्याचे सगळे प्लॅन्स वाया जाणार होते. तिचं म्हणणं आणि तिची बाजू समजूनही न घेता, ती कशी हट्टी, हेकट आहे असे आरोप करण्यात आले. असीमचं तिच्याशी वागणं बदललं. मग मात्र ती हतबुद्ध झाली आणि म्हणाली, ” मला असं कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्याशी असं वागशील. एकमेकांना दिलेली आश्वासने, एकमेकांच्या साथीने, इच्छेने आपण संसार करायचा असं ठरलं होतं. पण महत्वाच्या निर्णयांमध्ये जर मला स्थानच नसेल तर पुढे कसं होणार???”

लग्न म्हणजे संस्था आहे. फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंब जोडली जातात असे आपण नेहमीच म्हणतो. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येऊन एकमेकांच्या सहयोगाने एक सामायिक जबाबदारी स्वीकारतात. दोघांनी मिळून संसार करणं ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

दोघांनाही एकमेकांच्या मनाविरुद्ध ऐकावं लागतं. एकमेकांशी सातत्याने संवाद साधावा लागतो. मनाविरुद्ध पण कुटुंबासाठी योग्य असे निर्णय घ्यावे लागतात. एक माणूस म्हणून सर्वार्थाने प्रगती करत असताना तुमचा जोडीदारही तुम्हांला सहकार्य करायला तुमच्या बरोबर असतो. लग्नामुळे एकमेकांच्या साथीने एकमेकांना  प्रगल्भ करण्याची जबाबदारीही येते.

त्याच बरोबर चोवीस तास एकत्र राहत असतानाही एकमेकांचे स्वातंत्र्य, स्वतंत्र व्यक्तिमत्व, विचारसरणी, स्पेस पण जपावी लागते. एकमेकांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारावे लागते. सतत एकमेकांना गृहीत धरून चालत नाही. उदा. अशी अनेक जोडपी आहेत की एक  मांसाहारी असतो आणि एक शाकाहारी. इथे दोघांचीही आवड जपली गेली पाहिजे. आणि स्वतः सारखेच दुसऱ्याने असावं ही जबरदस्ती, अट्टाहास अजिबात असता कामा नये.

जोडीने संसार करताना, तो फुलवताना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या, कर्तव्यं  पार पाडावी लागतात. मुलांचे जन्म व त्यांचे संगोपन, शिक्षण, स्वतःची नोकरी व्यवसायातील प्रगती, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जबाबदाऱ्या… अशावेळी एकमेकांच्या साथीने, एकमेकांना जपत, एकमेकांना आनंद देत, सन्मान देत ही कर्तव्यं जास्त सहज पार पडू शकतात.

मुळात आपलं माणूस आहे तसं स्वीकारणं आणि त्याच्या  मतांचा आदर करणे हे फार गरजेचे आहे. भांड्याला भांडं लागणारच आणि भांडणं होणारच. पण ते तुटेपर्यंत ताणू नये. नातं सर्वात महत्त्वाचं आहे कारण या नात्यावर संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा असतो.

लग्नसंस्था यशस्वी होण्यासाठी, टिकण्यासाठी हे सहकार्य, हा सहयोग, ही प्रगल्भता जोडप्यांमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

आज अगदी क्षुल्लक कारणांवरूनही घटस्फोट होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना तर हा विचार होणे फार गरजेचे आहे. आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तुम्हांला नशिबाने लाभलेली व्यक्ती तुमची सहचर असते. प्रत्येक जोडप्याने एकमेकांच्या साथीने उत्तम संसार आणि उत्तम आयुष्यासाठी  प्रयत्नशील असावे ही शुभेच्छा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!