Skip to content

सत्र बारावे:- झोपेत चालणे (Sleep Walking)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र बारावे:- झोपेत चालणे (Sleep Walking)


या आजाराने ग्रस्त व्यक्ती झोपेत केवळ चालण्यापुरती मर्यादित नसतात, तर बिछान्यात नुसते बसून राहणे यापासून ते बाथरूममध्ये जाणे, साफ-सफाई करणे, ते अगदी ई-मेल्स करण्यापर्यंत अशा असंख्य कृती झोपेच्या दरम्यान त्यांच्याकडून घडू शकतात. काही केसेसमध्ये तर स्वयंपाक करणे, ड्रायविंग करणे किंवा याप्रमाणेच इतर धोकादायक ठरू शकतील अशी कृत्ये घडल्याचेही दिसून येते. एवढेच नाही तर, झोपेच्या दरम्यान चुकून स्वतःलाच ठार मारले जाणे, लैंगिक आक्रमकता, कोणावर हल्ला करणे यांसारखी अत्यंत घातकी कृत्ये घडल्याचेही दिसून येते, परंतु अशा केसेस मात्र आपल्या सभोवताली अत्यंत तुरळक आढळतात.


केस :-
राहुल वय २८ वर्ष, मागील १२ वर्षांपासून राहुल झोपेतून उठून आपल्या घरातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतो. दुसऱ्या दिवशी त्याला कुणी विचारले असता, आदल्या रात्रीबद्दल त्याला काहीच सांगता येईना. राहुलच्या आजोबांना समाजसेवेची फार आवड होती, म्हणून ते राहुल मध्ये प्रवेश करून त्यांची इच्छा पूर्ण करून घेतात, असा घरच्यांनी काढलेला एकमात्र निष्कर्ष ! खरंतरं राहुलच्या या आजाराची सुरुवात त्याच्या बालपणापासूनच हळूहळू वाढत गेली आहे. ती अशी की, राहुल हा लहानपणापासून आजोबांच्या सानिध्यात वाढलेला आहे, त्यामुळे आजोबांचे समाजसेवेची विचारशैली त्याच्यावर रुजलेली आहे, एकंदरीत आजोबांच्या विचारांचा फार मोठा पगडा त्याच्या मनावर बिंबला गेलेला आहे. त्यानंतर आजोबांचा झालेला अकाली मृत्यू हे राहुलच्या मनावर फार मोठे ओझे होऊन आजोबांची समाज स्वच्छतेबद्दलची असलेली तळमळ ही राहुलच्या ठिकाणी अधिक तीव्र होताना दिसली ज्यावेळी पहिल्यांदा राहुलच्या ठिकाणी या आजाराची लक्षणे आढळली. आज राहुल २८/ वर्षाचा असून त्याच्या लक्षणांनी असा काही आकार घेतला आहे की राहुलला चक्क झोपल्यानंतर दोरीने बांधून ठेवावे लागते. आज राहुल परिसरातले गटार आणि नाले साफ करताना आढळतो. वेळीच आजार ओळखून शास्त्रीय उपचार न केल्यामुळे राहुलला या अवस्थेतून आज जावे लागत आहे. हे आता तरी अति धार्मिकतेने बुरसटलेल्यांना उमगेल का ? कोण जाणे ?


लक्षणे :-
१) अशा व्यक्तींना झोपेत त्यांच्या हातून काय घडलंय याची काहीच कल्पना नसते. त्यांचे डोळे जरी उघडे असले, हातून विविध कृती होत असल्या तरी ते सर्व त्यांच्या जाणिवेच्या पातळीवर घडत नसते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी काहीच आठवू शकत नाही.
२)  झोपेत चालणाऱ्या व्यक्तींचा स्वप्नांशी फारसा काही संबंध नसतो.
३) झोपेत विविध कृती करण्याचा कालावधी ३ सेकंदापासून ते ३० मिनिटांपर्यंत असू शकतो.
४) जास्तीत जास्त केसेसमध्ये व्यक्ती झोपेत चालत जाऊन पुन्हा आपल्या मूळ जागेवर माघारी येतात.
५) हा आजार प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.


कारणे :-
१) मनाचा गोंधळ, प्रचंड थकवा, अपुरी झोप, अतिज्वर ही या आजरा मागची कारणे असू शकतात.
२) मागच्या पिढ्यांमध्ये जर कोणाला हा आजार असेल तर तो पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होऊ शकतो.
३) दडपलेल्या इच्छा आणि आकांक्षा यांना मोकळी पायवाट म्हणून झोपेत विविध कृत्य करताना व्यक्ती आढळतात.
४) मेंदूतील रसायनांमध्ये असमतोल हे देखील एक कारण असू शकते.
५) या आजाराचा संबंध थेट अबोध मनाशी असून जे जागेपणी करता येत नाही, ते झोपेत असताना पूर्ण केल्या जातात.


उपचार :
१) दुसऱ्या दिवशी अशा व्यक्तींना काहीच आठवत नसल्याने स्वतःच्या आजाराविषयी जाणीव होण्यासाठी अशा व्यक्तींचा व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना व्यवस्थित समजाविणे हे केव्हाही उत्तम.
२) प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा असल्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम तसेच मेडिटेशनने सुद्धा फार चांगला फरक पडतो.
३) यामधील काही व्यक्तींना स्वतःचा व्हिडीओ दाखविल्यानंतर ते स्वतःलाच रात्री झोपताना घाबरतात, त्यामुळे काही गोष्टी या कटाक्षाने पाळाव्या लागतात.
४) झोपेत विविध कृत्य करत असताना त्याच वेळी त्यांना जागे करून त्यांना त्यांच्या आजाराविषयी माहिती देणे.
५) तसेच ज्या गोष्टी दडपलेल्या आहेत त्यावरही समुपदेशन होणे फार महत्वाचे आहे.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते.

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!