मी एक योग्य जोडीदार निवडलाय, हे मला कसं समजेल ??
मेराज बागवान
‘जोडीदार’ , जो असतो आयुष्यभरासाठीचा जोडीदार. जोडीदार ला अनेक शब्द आहेत, जसे की , ‘पती-पत्नी’,’नवरा-बायको’ इत्यादी.तर असा हा जोडीदार , अगदी सर्वात जवळचे नाते.दोन जीव पण एकच आत्मा, एकच मन असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
आयुष्यात जोडीदार आल्यानंतर संपूर्ण आयुष्यच ३६५ अंशाच्या कोनाने बदलून जाते. कोणतीच व्यक्ती कायम एकटी राहू शकत नाही.म्हणून मग आपल्याकडे ‘लग्न’ ही परंपरा , मग यापुढे जाऊन ‘लिव्ह-इन’ वगैरे. एकंदरीत काय ,तर जोडीदार हा प्रत्येक व्यक्तीसाठी जरुरी असतो.पण हा जोडीदार आपण योग्य निवडला आहे की नाही हे कसे समजू शकेल?
जोडीदार योग्य निवडला आहे की नाही, हे समजायला प्रथम जोडीदाराबद्दल स्वतःच्या मनात काय प्रतिमा आहे? अपेक्षा काय आहेत? हे कळले पाहिजे.जसे की काही जणांच्या अपेक्षा असतात, माझी होणारी बायको सुंदर-गोरीपान असावी, नोकरी करणारी असावी, लांब सडक केस असावेत, समजून घेणारी असावी इत्यादी.
तर काहींच्या अशा अपेक्षा असतात की , माझा होणारा नवरा वेल सेटल असावा, उंच असावा, देखणा असावा, स्वतःचे घर-बंगला ,गाडी असावी , समंजस असावा इत्यादी.ही झाली अपेक्षांची यादी. ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते.
प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.मग अशा अपेक्षांची जुळणी होते आणि एकदाचे लग्न पार पडते.मग सुरु होतो संसार. आणि हीच ती परीक्षा असते, एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखायची आणि आपण निवडलेला जोडीदार योग्य आहे हे पाहण्याची.
जर तुमच्या अपेक्षा असतील की माझा जोडीदार समंजस असावा. त्याने मला माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी.आणि मग तो जर नेहमी तुम्हाला समजून घेत असेल, न सांगता तुमच्या मनातील इच्छा त्याला समजत असतील , न सांगता अडी-अडचणीत तो तुम्हाला मदत करीत आहे तर मग तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे असे समजू शकता.
काही वेळेस अपेक्षा एक असतात आणि वास्तव वेगळे असू शकते.एखाद्या मुलीला वाटते की , माझ्या नवऱ्याने मला सारखे बाहेर फिरायला न्यावे , हौसमौज करावी .पण नवऱ्याला कामामुळे सारखे सारखे जमत नाही.पण तोच नवरा अनेकवेळा आपल्या बायकोला तिच्या नकळत फिरायला नेतो आणि सरप्राईज देतो.तर मग इथे , तिने ओळखायला हवे की , मी योग्य जोडीदार निवडला आहे.जो माझ्या आवडी-निवडी जपत आहे.
पती-पत्नी मध्ये , पत्नी खूप छान लेखन करते.अनेक लेख, कविता, कथा ती लिहीत आहे. आणि आता लग्नानंतर देखील तिला ही आवड जोपासायची आहे.आणि यामध्ये माझ्या पती ने मला ही आवड जोपासायला मदत करावी अशी तिची मनात कुठेतरी एक अपेक्षा आहे.पती मात्र , कधीच तिचे तोंडावर कौतुक करीत नाही.
म्हणून थोडे की होईना पत्नी हिरमुसत असते.पण पती तिच्या मागे , तिच्या लेखांचे एक पुस्तक प्रकाशित करायला टाकतो आणि तिच्या वाढदिवसाला तिला ते भेट देतो. मग त्या पत्नी चा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ‘मी योग्य जोडीदार निवडला आहे’ असे ती मनात म्हणते.
अशा काही उदाहरणातून आपण ओळखू शकतो की , मी योग्य जोडीदार निवडला आहे.अपेक्षा ह्या न संपणाऱ्या असतात.पण नेहमी अपूर्णच राहतात असे नाहि.कधी कधी आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत हे देखील आपल्याला समजत नाही.कारण आपला जोडीदार त्या आपल्या नकळत पूर्ण करीत असतो.
म्हणूनच ‘समजूतदारपणा’ महत्वाचा. अपेक्षा कोणतीही असो, त्यात जर ‘समजूतदारपणा’ नसेल तर , कायम आपल्याला आपला अपेक्षाभंग च होतोय असे वाटत राहील.
म्हणून जोडीदार जेव्हा अबोल राहतो. तेव्हा समजून जा की तो कुठतरी तुमच्यासाठी ‘जुळवून’ घेत आहे.तुम्हाला तो दुःखात, त्रासात पाहू शकत नाही. म्हणून न बोललेले शब्द समजता आले पाहिजेत.माणसे वाचता आली पाहिजेत.
कारण प्रत्येकवेळी वाटते, दिसते तसे असतेच असे नाही. जी व्यक्ती स्वतःआधी तुमचा विचार करते, तुमच्या आनंदाचा विचार करते, समजून घेते.अनेकवेळा तुमच्यासाठी त्याग करते.
तुमच्या नकळत तुमची काळजी घेते.तुमच्यावर निस्सीम प्रेम करते, कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासाठी सर्व काही करते.संपूर्ण कुटुंबासाठी झटते. आणि कुटुंबाकडे लक्ष देत असताना देखील तुमची देखील काळजी घेते.कठीण काळात तुमची ताकद बनते.’मी आहे ना, सर्व काही ठीक होईल,तू काळजी करू नकोस’ असे जेव्हा म्हणते, तेव्हा समजून जा तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे.
मग जी व्यक्ती तुमचा एवढा विचार करते, तुम्हाला समजून घेते ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणारच ना.हवा फक्त विश्वास. एकमेकांवर असलेला विश्वास.जो कधीच कोणत्याच गोष्टीमुळे तुटणार नाही.भांडणे झाली, अबोला आला तरी देखील समजुतीने पुन्हा एकमेकांसाठी जर जगायला कोणी तयार असेल तर तो योग्य जोडीदार आहे असे म्हणता येईल.
म्हणूनच ‘तक्रार’ करण्यापेक्षा ‘समजून’ घेण्यावर भर असावा. ‘गृहीत’ धरण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात ‘धरून’ आयुष्याचा प्रवास करता यायला हवा.
आणि असाच तुमचा जोडीदार असेल तर तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे, हे म्हणायला हरकत नाही.
नांदा सौख्यभरे!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख छान आहे
पण सुरवातीचे उदाहरणे खर्या आयुष्यात खुप कमीच घडतात. अगदी 1%
आपले लेख व त्याचे शिर्षक खूप छान असतात परंतु लेखातील काही शब्द, वाक्यरचना या पुष्कळ वेळा चुकलेल्या दिसतात. कृपया ते दुरूस्त करून घ्यावे.