Skip to content

मनाने एकमेकांचे जरी झालेले असू तरी काही स्पेस ठेवायला हवी का…?

मनाने एकमेकांचे जरी झालेले असू तरी काही स्पेस ठेवायला हवी का…?


हर्षदा नंदकुमार पिंपळे


नात्यामध्ये भलतीसलती रेस नाही तर मोकळी स्पेस हवी……तरच नाती मोकळेपणाने बहरतात. नाहीतर शर्यतीमध्ये धावून धावून दमछाक होऊन ती नातीही बेशुध्द होतात.ज्याप्रमाणे एखाद्याची आपल्या आयुष्यात जागा असते त्याप्रमाणेच प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्वतंत्र जागा असते.आणि ती जागा एकमेकांना एकमेकांनी देणं खूप गरजेच असतं.

दोन व्यक्ती मनाने एकत्र असल्या तरी एकमेकांना थोडीफार स्पेस देणं आणि एकमेकांमध्ये थोडीफार स्पेस ठेवणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही नात्यात आवश्यक असते ती “space” . नात्यांमध्ये जर थोडीफार स्पेस असेल तर नाती मोकळेपणाने खुलायला वेळ लागणार नाही.

‘स्पेस’…हल्ली तर या स्पेसला आयुष्यात भलतीच डिमांड आहे. कित्येकजण तर स्पेसकडे एखाद्या क्रेझिनेससारख बघतं.अहो पण स्पेस म्हणजे काय क्रेझिनेस नाही नं…? मुळात खऱ्या अर्थाने स्पेस या शब्दाचा अर्थ कित्येकांना उमगलेलाच नाही.’मला हवं ते करू देणं’ या अर्थाने ‘स्पेस’ शब्द हल्ली रूजत चाललाय.त्यामुळे नात्यांमध्ये निरर्थक गैरसमज , निरर्थक वाद याला नव्याने पुन्हा एक संधीच मिळत असते.स्पेस या छोट्याशा (अर्थपूर्ण)शब्दाचा आपण कितीतरी मोठा चुकीचा अर्थ घेत आहोत.आणि कदाचित याची कित्येकांना जाणीवही नसेल.

“तु मला काही स्पेसच देत नाही.मला थोडीतरी स्पेस दे….प्लीझ…..तुला कळत नाहीये का मला माझी स्पेस हवी आहे…. प्लीझ प्लीझ तु जा आत्ता…” हा असा संवाद प्रत्येकाने नक्कीच ऐकला असेल,अनुभवला असेल. यातून एकतर दोन निष्कर्ष आपण काढू शकतो ते म्हणजे – एकतर आपण एकमेकांना स्पेस देत नाही.

आणि दुसरं म्हणजे आपण स्पेस स्पेस करत (स्पेसचा अतिरेक)उगाचच आपल्या व्यक्तीपासूनच नकळतपणे दुरावले जातोय. पण आपल्या कुणाच्याही ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण धावत बसतो फक्त स्पेस या शब्दामागे….आणि धावता धावता मनामनाने जोडलेल्या नात्याला मात्र कायमचे मागे सोडून जातो.

प्रत्येक नात्यात स्पेस ही हवीच.पण ती स्पेस एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवी. अशी मागून, जबरदस्ती दिलेल्या ,मिळवलेल्या स्पेसला काहीही अर्थ नाही. कारण प्रत्येक नात्यातील स्पेस ही नातं उणीवा कमी करून जाणीवा समृद्ध करत असते.त्यामुळे एका मर्यादेपर्यंत प्रत्येकाने ‘कितीही काही झालं तरी प्रत्येकजण ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच स्वतंत्र असं आयुष्य आहे ‘ हे लक्षात घेऊन एकमेकांना ती ‘स्पेस’ न मागता द्यायला हवी.

आता आपण मनामनाने एकत्र आहोत मग त्या ‘स्पेस’ च इतकं काय…? आता कशाला हवी स्पेस…?आणि कसली स्पेस….?असं कितीतरी जणांना वाटतं.समोरच्या व्यक्तीला कधी कधी त्यांची स्पेस हवी असते, त्यांचा वेळ हवा असतो.प्रत्येकवेळी गोष्टी शेअर करणं जमतच असं नाही.

अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तर स्पेस म्हणजे स्वैराचार वगैरे या अर्थाने घेणे मुळातच चुकीच वाटतं.कारण स्पेस ही कोणतीही असू शकते. भावनिक ,मानसिक ,आर्थिक अगदी कोणतीही असू शकते.त्यामुळे आधी स्पेसचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.आणि योग्य वेळी प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस आनंदाने देणे गरजेचे आहे.

पण ही स्पेस इतकीही नसावी की नात्यांमध्ये कायमची स्पेस निर्माण होईल. नाहीतर सतत स्पेसचा पाढा वाचत राहीलात तर नात्यात खरच खूप मोठ्ठी स्पेस दिसून येईल. नात्यात अंतर केव्हा निर्माण होईल कळणारही नाही.”मला स्पेस हवी , मला स्पेस हवी” असं सतत करत राहिलात तर त्याचे परिणाम फार काही चांगले होणार नाहीत. या स्पेसच्या नादात “अगं/अरे अजून तुला किती स्पेस हवी……????एक काम कर, काय स्पेस हवी ती घे…काहीही कर…जा…” असं म्हणण्याची एखाद्यावर वेळ आणू नका.याने स्पेस देणारा वैतागून शेवटी कधी कधी आपल्याला कायमची स्पेस देऊन जातो.

त्यामुळे एक लक्षात ठेवा…

मनामनाने एकत्र असेल तरी एकमेकांना स्पेस ही द्यायला हवी. एकमेकांमध्ये थोडी स्पेस ठेवायलाच हवी.परंतु ही स्पेस अतिशय समजूतदारपणे एखाद्याला देता आली पाहिजे. आयुष्याच्या वळणावर एकमेकांना एकमेकांची स्पेस देणं, एकमेकांमध्ये स्पेस ठेवणही तितकच महत्वाच आहे. कारण स्पेस म्हणजे थोडक्यात एक सुसह्य असं मोकळ अंगणंच….!

ती स्पेस सहजगत्या जपता आली की नात्यांची जबाबदारी, कर्तव्यही हसतहसत पार पाडली जातात. स्पेस दिली की कसं सहज सुटसुटीतपणा जाणवतो.कोंडलेल्या वाफा त्या स्पेसमधून अलगदपणे निघून जातात. त्यांचा हळुहळू निचरा होतो. नाहीतर एकमेकांना अजिबात स्पेसच दिली नाही तर नाती म्हणजे बंधनं , ओझी वाटू लागतात. आणि कधी कधी हे ‘वाटणच’ सगळ्यात जास्त भीतीदायक नी त्रासदायक असतं. त्यामुळे ‘स्पेस’ समजून घ्या.”स्पेस द्यायला शिका….कधी कधी स्वतःसाठी स्पेस घ्यायला शिका….तर कधी स्पेस ठेवायला शिका….” कारण हीच स्पेस एकमेकांना बांधून ठेवत असते.

स्पेसचा अर्थ खरतरं फुलांच्या पाकळ्यांमध्ये सहज शोधता येतो. कितीक ती पाकळ्यांची गर्दी… इतकी गर्दी…तरीही त्या एकसंध असतात………निरखून पहा जरा त्यांच्यातही थोडा स्पेस हा असतो.इतकच नाही तर त्यांच्यातील स्पेस वाढत गेला तर हळुहळू सगळ्या पाकळ्या गळून पडतात.

So…थोडीफार स्पेस द्यायची असते,स्पेसचा अतिरेक करायचा नसतो हे एकदा समजून घ्या.आणि स्पेस ठेवणही तितकच महत्त्वाच असतं हेही समजून घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!