” आत्ताचं टेन्शन बाजूला सारून जोडप्यांना पूर्वीसारखं आनंदी जगता येईल का?? “
मधुश्री देशपांडे गानू
काही वर्षांपूर्वी आदरणीय स्मिता तळवलकर यांचा “तू तिथे मी” नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट आला होता. यात आदर्श जोडपं कसं असावं हे उत्तम रित्या चित्रीत केलं होतं. तरुणपणी कर्तव्यं व जबाबदाऱ्या, कधी भीडेपोटी, अन्य काही कारणांनी ज्या महत्त्वाच्या रोमँटिक गोष्टी एकमेकांसाठी करायच्या राहून गेल्या त्या हे जोडपं आता उतारवयात अनुभवू पाहतं.
एकमेकांसोबत 24 तास असणं ही त्या जोडप्याची गरज असते. एकमेकांवरील निस्सीम प्रेम दिलखुलासपणे व्यक्तच करता आलेलं नसतं. ते आता प्रत्येक लहानसहान कृतीने व्यक्त करायचं असतं. जरी शरीर साथ देत नसेल तरीही मनाने तरुण असलेलं हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेलं असतं. आणि थोडाही विरह त्यांना सहन होण्यासारखा नसतो.
हे सगळे सांगायचा हेतू एवढाच की जोडपं म्हणजेच दोन शरीर एक मन. लग्नाने शरीर-मनावर झालेले संस्कार आणि त्यामुळे प्राप्त झालेलं अद्वैत. अगदी लग्न झाल्या झाल्या सुरूवातीचे दिवस अगदी मंतरलेले, सोनेरी असतात. एकमेकांशिवाय जराही चैन पडत नाही. एकमेकांचा सहवास, आकर्षण, शरीरसंबंधांची आतुरता आणि गोडी, एकमेकांना संपूर्णपणे ओळखण्याची धडपड, सगळंच हवंहवंसं असतं. अशातच काहीवेळा जोडीदारांच्या चुकांकडे, न आवडणाऱ्या पैलूंकडे प्रेमामुळे दुर्लक्षही केलं जातं.
पण हळूहळू संसाररूपी रथ ओढताना वास्तवाचं भान येऊ लागतं. कर्तव्य व जबाबदाऱ्या, मुलांचे जन्म आणि संगोपन, इतर कुटुंबीय, सामाजिक आर्थिक अपेक्षा या सगळ्यांमुळे नवरा बायकोचं नातं त्याच तीव्रतेने, ओढीने व्यक्त होत नाही. आणि ठराविक काळानंतर आपलं हक्काचं माणूस आपण अत्यंत गृहीत धरायला लागतो.
संसार यशस्वीपणे चालवताना अनेक चांगल्या वाईट घटनांचा, प्रसंगांचा सामना करावा लागतो. आर्थिक समस्या उभ्या राहतात. एक उदाहरण देते. एक अत्यंत प्रेमळ, आदर्श जोडपं. यशस्वी व्यावसायिक, गर्भश्रीमंत. दोघांनी अत्यंत कष्टाने, एकमेकांच्या साथीने उभे केलेले तीन कारखाने. एका चुकीच्या निर्णयाने सगळं होत्याचं नव्हतं झालं.
अगदी राहतं घर ही गेलं. काहीही उरलं नाही. तरीही त्या दोघांनी एकमेकांना दोष न देता एकमेकांची साथ सोडली नाही. जी परिस्थिती आली त्याला दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरुन तोंड दिलं. या अवस्थेतही दोघे कायम समाधानी दिसायचे. कारण एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि निष्ठा.
अत्यंत दुःखदायक परिस्थिती जरी होती तरी परस्परांच्या साथीने दुःख सहन करायला ताकद मिळाली. अशा अनेक अकस्मात येणाऱ्या घटनांना तोंड देत संसार सांभाळत पुढे जावं लागतं. अशावेळी अगदी कितीही टेन्शन आलं तरीही एकमेकांची साथ सोडायची नाही असं जर ठरवलं तर काही टेन्शन लवकर संपू शकतं. एकमेकांच्या चुका मोठ्या मनाने पोटात घ्याव्या लागतात. कारण दोघांचं नातं अबाधित राहणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं दोघांसाठीही. नाहीतर हे घडू शकत नाही.
आत्ता या क्षणी टेन्शन असलं तरीही आत्ताचा हा क्षण आपण एकमेकांसोबत आहोत आणि हा आनंद ही काही कमी नाही हे सत्य स्वीकारून कोणतंही जोडपं आनंदी राहू शकतं. नात्यातला गोडवा, ताजेपणा दोघेही कायम ठेवू शकतात.
अगदी वाद, भांडणं प्रत्येक जोडप्यात होतातच. ते तर माणूस असल्याचं लक्षण आहे ना! अशा वेळी एकाने शांत राहणे, आपली चूक कबूल करणे, माफी मागणे, माफ करणे, जोडीदाराला प्रेमाने स्पर्श करणे, मिठी मारणे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी भांडण लगेच मिटतं. आणि टेंशन वाद विसरून दोघेही आनंदी होतात. एकमेकांचा आदर करत,
एकमेकांची मतं विचारात घेत कोणत्याही समस्येवर दोघेही निश्चितच मार्ग काढू शकतात. आपलं हक्काचं माणूस, पती-पत्नी हे नातं आपल्या आयुष्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा पैलू आहे. पण आपण हेच नातं जास्त गृहीत धरतो. या नात्यात अहंकार आला तर नातं संपुष्टात यायला वेळ लागत नाही.
आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं असतं हे खास दोघांचंच नातं. हे नातं जर सुखाचं, आनंददायी असेल तर आपण अधिक आनंदी, शारीरिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण होऊ शकतो.
आज आपण फक्त आनंदी जोडप्यांबद्दलच बोलतोय. मग अशा या जोडप्यांना समोर कितीही संकटं, टेन्शनस् आली तरीही हे अद्वैताचं नातं प्राधान्याने जपलं जातं. यामुळेच अशी आलेली विघ्नं लवकर संपतात. कारण दोघेही एकमेकांना समर्थ साथ देत सक्षमपणे या सगळ्याला तोंड देतात.
टेन्शन असलं तरीही एकमेकांना आनंद देतात. मुळात पती-पत्नीने एकमेकांच्या निर्भेळ प्रेम, विश्वास, निष्ठा, आदर या मूलभूत भावना जोपासल्या, वेळोवेळी अत्यंत मोकळेपणाने त्या व्यक्त केल्या तर नक्कीच प्रत्येक जोडप्याचं नातं हे आनंदी, सौख्याचं, प्रेमाचं होणारच याची खात्रीच आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


