Skip to content

सत्र तेरावे : अवास्तव भिती (Phobia)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र तेरावे : अवास्तव भिती (Phobia)


विचार करा की, समोरून साप येतोय आणि त्यावेळी आपल्याला भितीच वाटली नाही तर काय होईल ? म्हणजे भिती ही आपल्या सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु जर त्याच भितीचे रूपांतर फोबियामध्ये झाले तर काय होईल ? फोबिया म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाची अवास्तव भिती. म्हणजेच आपल्याला भितीदायक वाटणारी एखादी गोष्ट, व्यक्ती, घटना समोर नसतानाही केवळ त्या गोष्टींच्या विचाराने अंगाचा थरकाप होणे, घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे. परिणामी दैनंदिन जीवन उध्वस्त होते. अश्या या फोबिया मध्ये आपल्याला चिंतेने संपूर्ण ग्रासलेले असते. व्यक्ती संपूर्णतः या विकृतीच्या आहारी गेल्यास तिचा वास्तवाशी संपर्क तुटतो. फोबियाचे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकार आहेत. स्पेसिफिक फोबिया या प्रकारात व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टी बाबतीत भिती वाटते. जसे की कुठल्याही प्राण्याविषयीची अवास्तव भिती (कुत्रे, पाल), निसर्गातील काही विशिष्ट बाबींविषयीची भिती (उंच जागा, पाणी, दऱ्या, वादळ), रक्त आणि इंजेक्शन विषयीची भिती, ऍगोरा फोबिया या प्रकारात व्यक्ती कुठेही असताना ‘जर मला त्वरीत मदत मिळाली नाही, तर माझे काय होईल’ या भितीने ग्रासलेली असते. जसे की गर्दीच्या ठिकाणी, नाजूकसा ताप आल्यावर, लिफ्टमध्ये असताना. सोशल फोबिया या प्रकारात व्यक्तीला समाजात वावरण्याची भिती वाटते, जसे की, आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांचे नुकसान तर होणार नाही ना ? इतर लोकांनी माझी चेष्टा केली तर ? माझ्याबद्दल इतरांचे वाईट मत झाले तर ?थोडक्यात अशा व्यक्तींना समाजामध्ये स्वतःची अवहेलना, निंदा होण्याची अवास्तव भिती वाटते.


केस :
१) सामान्य भिती : काल रात्री अजय बेडवर झोपल्यानंतर त्याच्या अंगावर पाल पडली, अजय घाबरून लगेचच ताडकन उठला आणि कालांतराने शांत झोपी गेला.
अवास्तव भिती : दररोज रात्री विजयला बेडला पाहून पालीची भिती वाटते, विजयचे लक्ष सारखे घराच्या भिंतीवर असते, केवळ घराच्या नव्हे तर आता ऑफिसच्या भिंतीवर सुद्धा त्याचे लक्ष वळायला लागले आहे. त्याच्या या भितीमुळे त्याचे कामात लक्ष लागत नाही. (स्पेसिफिक फोबिया)
२) सामान्य भिती : त्यादिवशी अमितची तब्येत काहीशी बिघडलेली असूनही तो त्याच्या मित्राच्या लग्नात गेला. होता. लग्नावरून येऊन मग डॉक्टरकडे जाऊ असे त्याने ठरवले.
अवास्तव भिती : सुमित गर्दीच्या ठिकाणी जाणे आता पूर्णपणे टाळायला लागलाय, कारण तेथे जर मला काही झाले आणि त्वरीत मला मदत मिळाली नाही तर माझे कसे होईल ? म्हणून तो गर्दीच्या ठिकाणी जायला खूप घाबरतो. (ऍगोरा फोबिया)
३) सामान्य भिती : आजच्या मिटिंगमध्ये मनोजच्या तोंडातून अचानक त्याच्या बॉसबद्दल नकळत एकेरी शब्द बाहेर पडले, पण त्याबद्दल सर्वांसमोर मनोजने दिलगिरी व्यक्त केली आणि त्याचे बोलणे पुढे चालू ठेवले.
अवास्तव भिती : प्रसन्न चारचौघात ऑफिसमध्ये कधीही मिसळताना दिसत नाही. त्यादिवशी Good Morning बोलण्या ऐवजी प्रसन्नच्या तोंडून Good Night निघाले, आपण काहीतरी चुकीचे बोललो आहोत हे कळताच क्षणी त्याची हृदयाची स्पंदने वाढली, घाम फुटला. इतर आता आपल्याला कमी लेखतील ही भिती त्याला वाटायला लागली. (सोशल फोबिया)


 
लक्षणे :
१) आपल्याला वाटणारी भिती ही अवास्तव आहे, याची जाणीव व्यक्तीला असते.
२) भितीपोटी कित्येक महीने व्यक्ती घरातून बाहेर पडत नाही.
३) या विकृतीमुळे अश्या व्यक्तींचे दैनंदिन जीवन उध्वस्त होते.
४) जर व्यक्तीची मूळ भिती ही सापाशी संबंधित असेल तर त्या सापाचा रंग, आकार, उंची इ. समान असणाऱ्या गोष्टींबद्दलही व्यक्तीच्या ठिकाणी अवास्तव भिती निर्माण होऊ शकते. जसे की, दोरी, करडा रंग इ.
५) व्यक्ती तिच्या अवास्तव कल्पनांच्या भावविश्वात रमलेली असते, असे असूनही तिच्या आजाराबद्दल तिला जाणीव असते.


कारणे :
१) एखादी विशिष्ट मागची घटना फोबियाला कारणीभूत ठरते. जसे की सापाचा फोबिया असणाऱ्या व्यक्तीने यापूर्वी कुणालातरी साप चावताना पाहिलेले असेल किंवा वाचलेले असेल.
२) तसेच पालीला पाहून आपली आई किंवा शेजारचे घाबरतात हे जर आपण लहानपणापासून पाहत आलेलो असू तर पुढे जाऊन आपल्या ठिकाणी पालीचा फोबिया उद्भवतो.
३) मेंदूतील amygdala या भागामध्ये बिघाड झाल्यास व्यक्ती या विकृतीच्या दिशेने मार्गक्रमण करते.


उपचार :
१) Systematic Desensitization या थेरेपीमध्ये त्रस्त व्यक्तीला भिती वाटणाऱ्या परिस्थितीच्या कल्पनेतून हळूहळू सामोरे जायला सांगितले जाते. कारण एकदम त्या परिस्थितीला सामोरे गेले की व्यक्ती प्रचंड अस्वस्थ होते.
२) ज्यावेळी भिती अवास्तव रूप धारण करते, तेव्हा स्नायूंमधील ताण वाढतो. हा अतिरिक्त ताण कसा कमी करायचा याचेही प्रशिक्षण व्यक्तीला दिले जाते.
३) Modeling ही थेरेपीसुद्धा उपयुक्त ठरते. काही वेळा दुसऱ्यांची भिती पाहून आपण स्वतः भयभीत होतो, अशा वेळी दुसरा त्या परिस्थितीला कसा छान सामोरे जातोय, हे त्रस्त व्यक्तीला दाखविले जाते. या थेरेपीमुळे व्यक्तीतील केवळ भितीच दूर होत नाही, तर व्यक्तीमध्ये नवीन कौशल्य सुद्धा आत्मसात करता येतात. जसे की, स्टेज फोबिया असेल तर प्रख्यात व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांचे model व्यक्तीसमोर ठेवून समुपदेशन केले जाते.
४) व्यक्तीला काही चुकीच्या विचारांनी किंवा गैरसमजुतींनी पछाडलेले असते, त्यावर उपचार म्हणून REBT ही थेरेपी सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
५) तसेच Social Skill Therapy, Group Therapy हे देखील फायदेशीर ठरतात.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते 

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

5 thoughts on “सत्र तेरावे : अवास्तव भिती (Phobia)”

  1. Very nice but the treatment methods still need to be more explained
    Because the counselings fee is not affordable

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!