जोडीदाराच्या सारख्या चुका माफ करून तुम्हीच त्याला बिघडवत आहात.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
प्रत्येक माणूस हा चुका करत शिकत असतो. पण एकच चूक पुनःपुन्हा केल्यास त्याला माणूस कसं बरं म्हणता येईल? चूक म्हणजेच चुकून होणारी कृती. एक कृती पुनःपुन्हा केल्यास तिला चूक म्हणता येणार नाही. ती त्या माणसाची सवय किंवा वृत्ती असते. प्रत्येक चुकीला शिक्षा असतेच असं नाही, कारण काही चुका खरंच इतक्या शुल्लक असतात की त्यांना काय शिक्षा करणार, आणि मुळातच अजाणतेपणाने झालेल्या कृतीला काही वेळा शिक्षा देणं ही बरोबर वाटत नाही , शेवटी ते ‘चूक’ कशा पद्धतीची आहे यावरच ते अवलंबून असतं.
चुकांना माफ करणं, सोडून देणं, त्याबद्दल कडवे बोल सुनावण, हे प्रत्येक माणसाचं वेगळं असतं. बऱ्याचदा आपण जवळच्या माणसांच्या चुका पोटात घालतो, त्यांना सहजपणे माफ करतो. आणि जिथे आपला जोडीदार येतो तिथे तर ते आणखी सहजपणे ते केलं जात. पण काही लोकांची ‘जिथे चालतंय तिथे चालवलं जात’ अशा प्रकारची वृत्ती असते.
म्हणजेच काय तर समोरचा माणूस गप्प बसतो, फार काही बोलत नाही याचा अर्थ त्याला आपल्या चुकांचा त्रास होत नसेल असा नसतो, पण हे त्यांच्या लक्षात येत नाही. समोरचा माणूस शांत आहे म्हणून ते त्यांचं चुकीचं वागणं किंवा चुका या गोष्टी बंद न करता चालूच ठेवतात.
आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जात की ‘अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या इतकाच जबाबदार असतो’. म्हणजेच काय तर समोरच्या माणसाच्या चुका आपण जेव्हा दर वेळी दुर्लक्षित करतो तेव्हा त्याच्या पुढच्या चुकांना देखील त्याच्या इतकेच आपण सुद्धा जबाबदार असतो.
आपल्या जोडीदाराच्या चुका आपण त्याला नम्रपणे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खरा जोडीदार असेल तर तो तुम्ही दाखवलेल्या चुकांबद्दल लाज,शरम, किंवा वाईट वाटून न घेता नक्कीच त्या सुधारण्याचा आणि परत होऊ न देण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक चूक पोटात घालणं गरजेचं असतंच असं नाही. ज्या चुकांनी कोणाचं नुकसान होत नसेल, आपल्यालाही फार फरक पडत नसेल, अशा चुकांकडे दुर्लक्ष केलं तर चालू शकत.
पण ज्या चुकांमुळे आपल्याला आणि इतरांना ही त्रास होतो अशा चुकांबद्दल त्या माणसाला सावध करणे हे त्याच्या जोडीदाराचे कर्तव्य आहे. आपण सगळे जरी माणूस असलो तरी आपले आचार, विचार, नैतिक मूल्ये ही खूप वेगळी असतात. आणि कधी कधी आपल्या या गोष्टीचा कोणाला त्रास होत असेल किंवा कोणी याकडे चूक म्हणून बघत असेल असा विचार देखील आपल्या ध्यानीमनी नसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या जोडीदाराला न चिडता स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणे, गरजेचे असते.
आपण जेव्हा आपल्या जोडीदाराच्या किंवा कोणत्याही जवळच्या माणसाच्या चुका दुर्लक्षित करत असू, पोटात घालत असू, आणि आपला असा समज असेल की तो माणूस स्वतःहून कधीतरी सुधारेल, तर असं होण्याची शक्यता खूप म्हणजे खूपच कमी असते. कारण तो करत असलेल्या चुकांना गांभीर्याने घेतच नसतो, आणि आपण त्यावर प्रतिक्रिया देत नसतो.
जोडीदाराला आपण त्याच्या गुण-दोषांसहित स्वीकारलेलं असतं याचा अर्थ असा मुळीच नसतो की त्याच्या चुकांना आपण खत-पाणी घालावे त्याला योग्य मार्ग दाखवणं हे जोडीदार म्हणून आपलं कर्तव्य असतं.
आपण बाहेरच्या माणसांच्या चुका दुर्लक्षित केल्या तरी ती माणसं आपल्याला रोज भेटणारी नसतात आणि त्यांच्या चुकांचा आपल्याला तेवढा त्रास देखील होत नसतो त्यामुळे तिथे काही वेळा चालून जात. पण आपल्या जवळच्या माणसांच्या चुकांचा मात्र आपल्याला खूप होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण त्याच्या चुका सतत माफ करत असू, किंवा पोटात घालत असू, याचा अर्थ आपणच एक प्रकारे त्याला बिघडवतोय किंवा चुका करायला प्रोत्साहन देतोय असाच होतो.
आपण लहान असताना सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली असावी. ती म्हणजे त्या लहान मुलाची जो लहान असताना वर्गातल्या मुलांच्या पेन्सिल , खोडरबर इत्यादी गोष्टी चोरायला लागतो आणि तरी देखील त्याची आई त्याला हटकत नाही. आणि मग मोठं झाल्यावर मात्र तो मोठा गुन्हेगार होतो आणि जेव्हा पोलीस त्याला अटक करतात तेव्हा आईला शेवटचं भेटताना तो तिचा कान चावतो.
तो कान अशासाठी चावतो, कारण जर तिने तो लहान असताना त्याला चूक आणि बरोबर यातला फरक समजावून सांगितला असता आणि तिथेच रोखले असते तर आज त्याच्यावर ही वेळ आली नसती. तसा बघायला गेलं तर थोडं फार का होईना ही परिस्थिती आपल्या आजच्या विषयाशी संबंधित आहे.
आपण जर आपल्या जोडीदाराच्या चुका गरज असेल तेव्हा तेव्हा त्यांना स्पष्ट करत गेलो, आणि त्या तुमचं आणि त्यांचं देखील कसं नुकसान करतायेत हे समजावलं तर नक्कीच पुढच्या कितीतरी चुकांना आळा नक्कीच बसेल. कारण जस-जशा माणसाच्या लक्षात त्याच्या चुका यायला लागतात तसतसा तो नीट विचार करून पावलं टाकायला लागतो. आणि एक चांगला जोडीदार म्हणून ते आपलं कर्तव्यच नव्हे का, की आपल्या जोडीदाराला आपण योग्य मार्ग दाखवावा!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


