Skip to content

“त्याच्याकडून चूक झाली, पण त्याला लगेच माफ करायला हवं का??”

“त्याच्याकडून चूक झाली, पण त्याला लगेच माफ करायला हवं का??”


मधुश्री देशपांडे गानू


आजचा विषय मुळातच गुंतागुंतीचा आहे. या एकाच विषयाचे अनेक कंगोरे पदर आहेत. पती-पत्नी म्हणून नातं सांभाळताना, निभावताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. मन, विचार, दृष्टिकोन लवचिक ठेवावा लागतो. तरच संसार यशस्वी होतो. बरं हे दोन्हीं कडून समान पातळीवर हवं. स्त्री-पुरुष दोघांच्याही पती-पत्नी म्हणून अपेक्षा, ईच्छा असतात. सर्व पूर्ण होतातच असे नाही. त्याला इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

पण तरीही हे नातं जर दोघांसाठीही महत्त्वाचं, प्रेमाचं असेल तर ते नातं टिकवण्याचा दोघेही आटोकाट प्रयत्न करतात. अनेक निर्णय मनाविरुद्ध घेऊनही आपण एकत्र आहोत ही भावना जास्त समाधान देणारी असते. आपलं माणूस आयुष्याच्या, संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याजवळ, आपल्या बरोबर आहे यासारखं दुसरं सुख नाही.

आता “चूक” ही कोणाकडूनही होऊ शकते. नवरा-बायको दोघेही चुकू शकतातच. कारण आपण भावभावनांचे अनेक पदर असलेली माणसं आहोत. संसार करताना एकमेकांना गुणदोषांसहित स्वीकारायचं असतं. लहान मोठ्या चुका दोघांकडूनही होतातच. आणि जोडीदाराकडून त्या सावरल्याही जातात. या चुकांमुळे भांडणं, वाद झाले तरीही ती चहाच्या पेल्यातील वादळं असतात. लवकर मिटतात. कारण नात्याला प्राधान्य असतं. पती-पत्नी तेवढे प्रगल्भ, समजूतदार असतात. अनेक कर्तव्यं, जबाबदार्‍या एकत्र पार पाडायच्या असतात. मुलांचे भवितव्य एकत्र घडवायचे असते.

आजचा विषय हा “त्याच्या कडून चूक झाली तर पत्नी कशी वागेल?” यावर आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा लेख फक्त ज्यांना मनापासून संसार यशस्वी करायचा आहे त्यांच्या साठीच आहे. नाहीतर अत्यंत व्यसनी, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले, बाहेरख्याली अशांचेही संसार होतातच की!

त्यातूनही आज आपण फक्त नवऱ्याकडून चूक झाली तर बायकोने त्याला लगेच माफ करायला हवं का? यावर मत मांडणार आहोत. मग तुम्ही म्हणाल की बायकोकडून चुका होतच नाहीत का?? तर होतातच. प्रत्येक माणूस चुका ह्या करतोच. आणि त्यातूनच शिकत पुढे जातो. पण आज आपण फक्त नवऱ्याने चूक केल्यास बायकोने कसे वागावे यावर भर देणार आहोत.

सर्वात प्रथम चूक हा शब्द ही तसा सापेक्षच आहे.  एखादी छोटीशी चूक झाली तर माफ वगैरे करायचा प्रश्नच येत नाही. थोडासा वाद होईल. उदाहरणार्थ, पत्नीने पतीला ऑफिसमधून येताना काही सामान, भाजी आणायला सांगितली आणि ती त्यांनी नाही आणली तर पत्नीला निश्चितच राग येईल. पण तो तात्पुरता असेल. अशावेळी पत्नीची भांडेल, रुसेल आणि हे भांडण लगेच मिटेलही.

आज सोशल मीडिया आणि आभासी जगातील मित्र-मैत्रिणी आणि या आभासी जगाला देण्यात येणारा अवास्तव वेळ, आभासी खोटी नाती यामुळे पती-पत्नीचं नातं अत्यंत तणावपूर्ण होण्याची उदाहरणं झपाट्याने वाढीला लागली आहेत. काही घटस्फोटांचे, नैराश्यग्रस्त होण्याचं कारणही सोशल मीडिया आहे.

आणखी एक उदाहरण… जर एखादा मोठा आर्थिक निर्णय पतीने पत्नीला विश्‍वासात न घेता परस्पर घेतला तर मात्र या नात्यात  विश्वासाला तात्पुरता तडा जाऊ शकतो. नातं टिकून राहील पण कुठेतरी उसवलं जातंच.

अजून एक उदाहरण पाहू. एकुलत्या एक मुलाचा प्रेम विवाह आईच्या मनाविरुद्ध तिला न सांगता परस्पर करण्यात आला. या सगळ्यात वडील मुलाच्या बाजूने होते. आईला विश्वासात न घेता वडिलांनी परस्पर तिच्या अनुपस्थितीत मुलाचे लग्न लावून दिले. अशावेळी ही फक्त चूक म्हणता येईल का?? त्या माऊलीला किती दुःख झाले असेल?? तिचे अस्तित्व इतके नगण्य होते?? अशा वेळी ती पतीला लगेच माफ करू शकेल??? तर नाही.

ती नवीन सुनेला स्वीकारेलही. पण एवढा मोठा निर्णय घेताना नवऱ्याने विश्वासात घेतले नाही ही खंत तिला आयुष्यभर राहील. अशावेळी संसार निभावताना त्या पती-पत्नीचं नातं सौहार्दाचे, सौख्याचं राहील का??

कोणतीही स्त्री काहीही सहन करू शकते पण आपल्या संसारात पतीच्या मनात दुसऱ्या स्त्रीचे आकर्षण, प्रेम सहन करू शकत नाही. आता तर सगळेच सवंग झालं आहे म्हणा.. असा प्रमाद (चूक नाही) जर पतीच्या हातून घडला तर अशावेळी पत्नीच्या भावविश्वावर काय परिणाम होईल??

ती मनातून उध्वस्त होते. ज्याच्यावर प्रेम आहे, विश्वासाने ज्याच्या साठी घर सोडलं, स्वतःचं सगळे देऊ केलं अशा पतीच्या मनात आता तिला स्थान नाही हे ती कधीच सहन करणार नाही. स्वतःचा संसार पणाला लावायला कधीच तयार होणार नाही. त्याला चूक समजून ती सहज पतीला माफ करू शकेल का?? मुळात ही चूक नाहीच. परिणामांची कल्पना असतानाही केलेला प्रमाद आहे हा…

कोणतीही लहान मोठी चूक किंवा अगदी प्रमादही असला तरीही जर पतीने प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केली, पुन्हा असे न वागण्याची

खात्री देऊन पत्नीला शाश्वत केले, तर आणि तरच पत्नी पतीला माफ करू शकेल. यालाही तिला काही वेळ लागेलच. किंवा पहिली चूक आहे, प्रमाद आहे म्हणून तिला नवऱ्याला एक संधी नव्याने द्यावीशी वाटेल. कारण कोणत्याही स्त्रीला आपला संसार अत्यंत प्रिय असतो. लगेच ती तो मोडीत काढत नाही. अर्थात हल्ली यालाही खूप अपवाद आहेत.

पण तरीही पतीकडून चूक झाल्यास चुकीचे स्वरूप, त्यातील गंभीरपणा, त्याचे गंभीर परिणाम या सगळ्यांचा विचार करून आणि नातं दोघांनाही खरंच हवं  आहे का? हे लक्षात ठेवून तिने माफ करावं. वेळप्रसंगी घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला, वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, समुपदेशन नक्की घ्यावं. स्वतःला आणि नवऱ्याला आणि या नात्याला पुन्हा नव्याने संधी द्यावी. पुन्हा प्रेम, विश्वासाने संसार यशस्वीपणे निभावण्यासाठी…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!