Skip to content

जगण्याचा सुंदर मार्ग हवाय ? मग हे वाचाच !!

ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी फॉर हॅप्पी लाईफ


(जगण्याचा सुंदर मार्ग हवाय ? मग हे वाचा)

अमृता, एक कॉलेज कन्यका, शिकायला गाव सोडून शहरात आलेली ! घरून आलेले महिन्याच्या खर्चाचे पैसे काढण्यासाठी ती एकदा भरदुपारी एटीएम मशीन बॉक्स जवळ गेलेली ! आत जाऊन कार्ड काढून मशीनमध्ये सरकवणारं, इतक्यात तिचे लक्ष जाते, तिथे नोटा बाहेर येण्याच्या ड्रॉवरमध्ये २ हजारच्या पाच नोटा तिला दिसतात. ती पटकन आजूबाजूला, इकडे तिकडे पाहते. जवळपास तर कोणीच दिसत नाही.

आता काय करावे ? हे पैसे कुणाचे असतील ? कोण विसरून गेले असेल ?
या विचारात ती पडलेली !

अमृता आधी त्या २ हजारच्या पाच नोटा मशीनमधून काढून शांतपणे हातात घेते. आणि नंतर स्वतःला हवे असलेले महिन्याचे पैसे आपले कार्ड टाकून काढून घेते.

अचानक समोर तिथे त्या एटीएम मशीन ज्या बँकेचे असते त्या बँकेचा फोन नंबर दिसतो. स्वतःच्या मोबाईलवरून ती नंबर फिरवून बँक मॅनेजरशी बोलते कि,

इथे आता कुणीतरी माझ्या आधी १० हजार रुपये काढले होते, मात्र ती व्यक्ती पैसे विसरून गेलीय !

ती बँक जवळच असते म्हणून मॅनेजर तिला बँकेत बोलावतो. अमृता तिथे जाते. आणि ते १० हजार त्यांना देऊन सांगते कि, माझ्या आधी ज्या कुणा व्यक्तीने पैसे काढले असतील त्या कार्ड नंबरवरून शोध घेऊन तुम्ही त्यांना हे पैसे परत द्यावेत, अशी माझी इच्छा आहे !

मॅनेजर तिच्या प्रामाणिकपणाबद्दल चकित होतो, त्याचवेळी तिला धन्यवाद देतो. तिचा नाव पत्ता फोन नंबर घेऊन सांगतो कि, मॅडम, त्या व्यक्तीचा शोध लागला कि आम्ही तुम्हाला नक्की कळवतो.

अमृता शांतपणे एक चांगले काम केल्याच्या आनंदात घरी येते.
थोड्या वेळाने त्या बँक मॅनेजरचा फोन येतो. तो सांगतो कि, ते दहा हजार रुपये श्रीमती राधाबाई यांचे अकाउंट मधील आहेत. त्या ८० वर्षाच्या वृद्ध आहेत. एकट्याच असतात. महिन्याचे घरभाडे (आठ हजार) व इतर खर्चासाठी (दोन हजार) असे त्यांनी दहा हजार काढले होते. आम्ही ते त्यांना परत देत आहोत. थँक्स !
असे म्हणून तो फोन बंद होतो !

इकडे नकळत अमृता विचार करू लागते कि, एकटीच वृद्ध बाई राहतेय, आणि आता फक्त २ हजारात महिना भागवते हेही किती अवघड आहे. मी स्टुडंट असून मला एकटीला दहा – पंधरा हजार लागतात आणि हि आज्जी २ हजारात कसे जगत असेल ?

शेवटी न राहवून अमृता त्या बँक मॅनेजरला पुन्हा फोन करून सांगते कि, माझेही खाते तुमच्याच बँकेत आहे. मोबाईल परमिटेड खाते आहे. तर मी विनंती करते कि माझ्या त्या अकाउंट मधून कृपया त्या आज्जीच्या अकाऊंटला एक हजार ट्रान्सफर कराल का ?

मॅनेजर पुन्हा चकित होतो आणि आनंदाने तो ते काम करतो !
मात्र एक तासाने पुन्हा बँकेतून फोन येतो.

मॅनेजर बोलत असतो. तो म्हणतो कि, मॅडम, तुम्ही विना ओळखीच्या असून सहजपणे १ हजार रुपये त्या आज्जीला देऊ केलेत. आणि आम्ही तर गेली अनेक वर्षे त्या आज्जीला ओळखतो. आमची पण काहीतरी जवाबदारी तुम्ही जागी केलीत ! त्यामुळे आमच्या सर्व स्टाफने प्रत्येकी ५०० रुपये असे मिळून १० हजार रुपये त्या आज्जीच्या अकाउंटला आताच ट्रांसफर केले आहेत. आणि त्या आज्जीला तुम्ही त्याच्यासाठी केलेले सर्व सांगून तुमचाही नंबर त्यांना दिला आहे.

पंधरा मिनिटांनी फोनची बेल वाजते,
“हॅलो, अमृताचा नंबर आहे का हा ?”
“होय, मी अमृता बोलतेय. आपण कोण?”
—-
—-
हॅलो, कोण बोलतंय ? हॅल्लो ????
*
*
*

“बेटी, गळा दाटून आल्याने बोलता येत नाहीय ग ”
“मी राधा जोशी. तू जिच्या खात्यात १ हजार भरलेत तीच मी. वृद्धापकाळ असल्याने विस्मरण होतेय ग, मी मशिनमधून रिसीट घेतली पण बाहेर आलेले पैसे काढून घ्यायला विसरले ! घरी आल्यावर लक्षात आले पण मग विचार केला कि आता नंतर कितीतरी लोक तिथे येऊन गेले असतील, कोण कशाला ठेवतेय तिथे पैसे? पण तू देवाची मुलगी बनून आलीस आणि माझा महिना वाचवलास ग पोरी”
———
बास्स !! दोन मिनिट दोघी दोन्हीकडे निशब्द ! नकळत एकेक थेम्ब डोळ्यातून ओघळलेला ! आनंदाचा, कृतार्थतेचा !!
काय नव्हतं त्या अश्रू मध्ये ?
“विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले”
हि ज्ञानोबा माऊलीची साद प्रत्यक्षात तिथे अवतरलेली !
—-

सांगण्याच तात्पर्य ……
दिल्याने वाढतो त्याला आनंद म्हणतात आणि घेतल्याने कमी होते, त्याला दुःख म्हणतात. आपण आपल्याला जमेल तेव्हा जमेल तिथे आणि जमेल तितके इतरांचे असे दुःख घेतले आणि जमेल तेव्हा आनंदाचे चांदणे उधळून दिले तर त्यातुंन आपल्यालाही आनंदच मिळतो. कारण आपल्याला जे हवे ते आधी आपण दुसऱ्याला द्यायला शिकले पाहिजे. मस्त जगण्याचे हे बेसिक तत्व आहे.

तेच आपण सारे मिळून जमेल तिथे पाळूया ! आणि प्रामाणिकपणा हा कोणता खास असा गुण नसून तो जगण्याचाच एक भाग म्हणून जगूया ! मग पहा अनेक राधा आज्जी सुखी होतील !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

7 thoughts on “जगण्याचा सुंदर मार्ग हवाय ? मग हे वाचाच !!”

  1. खुप छान आमच्या प्रनांना उत्तर मिळेल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!