Skip to content

तुम्ही मिळवलेला आनंद वास्तववादी असेल तर तो नक्की दीर्घकाळ टिकेल.

तुम्ही मिळवलेला आनंद वास्तववादी असेल तर तो नक्की दीर्घकाळ टिकेल.


गीतांजली जगदाळे


कोणतही ध्येय पूर्ण होण्याआधी किंवा कोणतीही इच्छा पूर्ण होण्याआधी तिच्यासाठी प्रयत्न करत असताना असच वाटत की हे मिळालं ना की मला खूप आनंद होईल. ते मिळाल्यानंतर आनंद होतो, होत नाही असं नाही, पण तो आनंद खुप थोड्या काळासाठी राहतो. आनंद भरपूर होतो पण त्याचा जीवनकाल खूपच कमी असतो. असं का होत?

आपण एक झालं की एक अशा अनेक ध्येयांमागे , इच्छांमागे धावत असतो. प्रत्येक वेळी वाटत असत बस हेच पाहिजे मला, हे मिळाल्यावर मला खूप आनंद मिळेल, समाधान मिळेल, पण तो आनंद , ते समाधान फार काळ आपल्यासोबत राहत नाही. आणि परत आनंदी होण्यासाठी आपण परत एक गोष्ट मिळवण्याच्या मागे लागतो.

कारण खरा आनंद हा कधीच कोणत्या वस्तू मध्ये नसतो, ती एक मानसिकता असते किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जो प्रवास, जे कष्ट केले जातात त्यात जो आनंद मिळतो तो वास्तववादी आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणजे ती गोष्ट आपल्याला तेवढा आनंद देत नाही जेवढा ती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आपल्याला देऊ शकतो, पण ofcourse जर आपण तो प्रवास खुल्या मनाने एन्जॉय करत असू तरच!

मुळात ‘आनंद’ याची व्याख्याच फार लोकांना समजलेली दिसत नाही. क्षणिक आनंद असतो त्याला आपण ‘आनंद’ असं म्हणू शकत नाही. क्षणिक असणाऱ्या आनंदाला ‘pleasure’ असं म्हणतात. खरा आनंद, वास्तववादी आनंद हा कोणत्याही वस्तूतून, गोष्टीतून, माणसांतून मिळत नसतो.

खरा आनंद , जो दीर्घकाळ टिकतो, आपल्यासोबत राहतो तो आपल्या आतून येत असतो म्हणजेच अंतर्मनातून येत असतो. जेव्हा आपण आनंदी, समाधानी कोणत्याही एका ठराविक गोष्टीमुळे झालेलो नसतो तेव्हा तो आनंद दीर्घकाळ टिकण्याची शक्यता जास्त असते. कारण एखाद्या गोष्टीने आलेला आनंद , ती गोष्ट गमावली असता दुःखात परिवर्तित होतो. आनंद, समाधान या गोष्टी जर वस्तू, पैसा मिळवल्याने मिळत असता तर आज आपल्याला सगळ्यात श्रीमंत माणसे नेहमी आनंदी, समाधानी दिसली असती.

पैसा, किंवा अन्य काही गोष्टी आपल्याला नक्कीच जीवन जगण्यासाठी गरजेच्या आहेत. पण तो पैसा कमावताना हे विसरून चालणार नाही की ‘money can’t buy happiness ‘ म्हणजेच पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, तसेच कोणतीही वस्तू आपल्याला दीर्घकाळचा आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनीच आपला आनंद आपल्या आत शोधायला सुरुवात केली पाहिजे.

दीर्घकाळ टिकणारा वास्तववादी आनंद हा एक गोष्ट केल्याने नक्कीच नेहमी मिळतो. ती म्हणजे लोकांची मदत करणे, माणुसकी जपणे, इतर प्राणिमात्रांवर प्रेम करणे, झाड लावणे-जगवणे इत्यादी. या कृतींनी आपल्याला तेवढ्यापुरताच आनंद, समाधान मिळत नाही, तर मनात नेहमी प्रसन्नता आणि सकारात्मकता टिकून राहते.

म्हणजेच हा आनंद दीर्घकाळ टिकतो. वास्तववादी असणाऱ्या, आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आनंदासाठी आपण कोणतं ही काम कशापद्धतीने करतो किंवा ते नैतिक दृष्टीने किती योग्य आहे या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. आपण केलेलं प्रामाणिक कष्ट, मेहनत, कोणाला ही न फसवता केलेलं कर्म हे नक्कीच आपल्या आनंदाचे कारण बनते.

वास्तववादी आनंद हा आतून येत असतो आणि त्या पातळीवर आपण तेव्हाच पोहचू शकतो जेव्हा आपण मानसिक रित्या सुदृढ असतो, आणि ही सुदृढता आपल्याला योग्य- अयोग्य यामध्ये योग्य गोष्टींची साथ दिल्याने , सत्याची साथ दिल्याने आणि नैतिकता जपल्याने मिळत असते. या गोष्टी नक्कीच करायला अवघड असतात, पण योग्य मार्ग कधीच सोप्पा नसतो त्यामुळे प्रयत्न केल्यास आपल्याला या गोष्टी जमू शकतात.

पण जर तुम्ही शॉर्टकट वापरले, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचं नुकसान करायला ही तुमची काही हरकत नसेल तर अशा पद्धतीने मिळालेला आनंद तर कधीच चिरकाळ टिकणार नाही आणि तो तुम्हाला आतून प्रसन्नता आणि समाधान कधीच मिळवून देणार नाही. म्हणजे शेवटी काय तर इतकं सगळं ज्यासाठी केलं तेच मिळणार नसेल तर सगळे कष्ट , प्रयत्न व्यर्थ जाणार.

‘विनम्र राहणे आणि अहंकारीपणा सोडून देणे’ याने देखील दीर्घकाळ आनंद मिळत असतो. या वास्तववादी आनंदासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. पण आपण आपल्यात जे छोटे छोटे पण गरजेचे, आवश्यक बदल करतो त्यातच हा ‘वास्तववादी’ आणि ‘दीर्घकाळ’ टिकणाऱ्या आनंदापर्यंत पोहचण्याचा मार्ग असतो.

ज्या प्रमाणे आपण कोणतीही गोष्ट मिळवली असता तिचा आनंद काही काळ अनुभवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला होणाऱ्या दुःखाबाबत आपण तसं करत नाही, जेवढ्या लवकर आनंदाचे क्षण विसरतो तेवढ्या लवकर दुःखाचे जर विसरता आले तर मन नेहमी मोकळं आणि हलकं राहायला मदत होईल. आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या नवीन गोष्टी, नवे बदल आपण मनमुराद पणे जगू शकू.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!