Skip to content

राग शांत होण्याआधीच कित्येक संसार कायमचे मोडलेले असतात.

राग शांत होण्याआधीच कित्येक संसार कायमचे मोडलेले असतात.


मेराज बागवान


‘संसार’ ह्या शब्दात खूप काही सामावलेले असते.संसार म्हणजे संपूर्ण आयुष्यच. संसार म्हणजे दोन जीवांचा एकत्र राहून केलेला प्रवास.एकमेकांना प्रत्येक परिस्थितीत दिलेली कायमची साथ. पण संसार म्हणला की , भांडणे, रुसवे-फुगवे हे आलेच.पण ह्या सगळ्या गोष्टींनीच तर नात्यातील गोडवा वाढतो.एकमेकांची खऱ्या अर्थाने ओळख होते आणि नाते बहरत जाते.पण ही भांडणे, कलह , राग काही काळापुरता योग्य असतो.खूप जास्त काळ जर राग एकमेकांवर राहिला तर नाते कायमचे संपुष्टात येते.

संसारात एकमेकांना समजून घेणे खूप महत्वाचे असते.कधी कधी भांडणे होतात.मग थोडयाच वेळात कोणीतरी माघार घेते, ‘सॉरी’ म्हणते, समजून घेते आणि भांडण देखील मिटते.पण काही वेळेस दोघांपैकी कोणीच माघार घ्यायला तयार नसते.एकमेकांवरचा राग काही केल्या शांत होत नाही आणि मग हा राग शांत होण्यापूर्वीच संसार मोडकळीस आलेला असतो.

‘लग्न’ ही आयुष्यातील खूप सुंदर आणि महत्वाची बाब आहे.लग्नामुळे दोन जीवांचे आयुष्य पूर्णतः बदलते.फक्त स्वतःचा विचार न करता, आपल्या जोडीदाराचा देखील विचार करावा लागतो.एकमेकांना जपावे लागते, काळजी घ्यावी लागते .यामुळे एकमेकांना समजून घेता येते.विचार समजतात.पण सुरवातीला सगळे छान चाललेले असताना.छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होऊ लागतात.

मग एकमेकांवर राग हा आलाच.कधी पती समजून घेतो तर कधी पत्नी.पण मग फक्त एकच व्यक्ती कायम समजून घेते स्वतःचा राग शांत करते.आणि सर्व सुरळीत करू पाहत असते.पण दुसरी व्यक्ती तिला साथच देत नाही.एकाचा राग शांत होतो, पण दुसरा कायम रागातच राहतो.आणि दुसऱ्याचा राग शांत होईपर्यंत संसार मात्र मोडलेला असतो.

नाती ही खूप नाजूक असतात.ती खूप हळुवारपणे जपायची असतात.काही जोडपी खूप समजूतदार असतात. कितीही काहीही झाले तरी देखील , कितीही राग आला तरी ते नाते कधीच तुटू देत नाहीत.आणि हेच तर संसारात अपेक्षित असते.एकमेकांवर विश्वास, आपुलकी, प्रेम , जिव्हाळा असला की आपोआपच राग शांत होतो आणि संसार आणखीनच फुलू लागतो.पण आजकाल , अनेक पती-पत्नी नाते फुलण्याऐवजी ‘मीच कशी बरोबर, मीच कसा समजूतदार’ यातच अडकून पडतात आणि मग संसार मोडला तरी त्यांच्या लक्षात येत नाही.

पती-पत्नी च्या नात्यामध्ये ‘संशय’ ही खूप मोठी भूमिका बजवतो. ‘असुरक्षिततेची भावना’ साहजिकच आहे .पण या भावनेचे ‘संशयात’ रूपांतर होणार नाही , याची काळजी उभयताने घेतली पाहिजे. पण आजकाल नात्यांमधील विश्वासच राहीलेला नाही.अनेक ठिकाणी नात्यामध्ये फक्त ‘व्यावहारिक’ दृष्टिकोन पाहिला जातो.

‘सोशल मीडिया’ च्या अतिवापराने देखील अनेक दुष्परिणाम पहावयास मिळतात.आणि एकमेकांवरील विश्वास देखील कमी होऊ लागतो. कधी कधी हा अविश्वास, संशय इतका बळावतो की डोक्यात , मनात एकमेकांविषयी फक्त रागच उरतो.आणि हा राग काही केल्या शांत होत नाही. आणि यामुळे अनेक संसार मोडतात.

आजकाल संसारात बरयाच ठिकाणी ‘तडजोड’ पहावयास मिळत नाही.दोघांपैकी कोणीच तडजोड करायला तयार होत नाही.किंवा कधी दोघांपैकी कुणीतरी एक नेहमी तडजोड करीत असतो.पण तरी देखील दुसऱ्याला काहीच फरक पडत नाही.मग ही एकतर्फी ‘तडजोड’ फार काळ टिकत नाही आणि ते नाती देखील टिकत नाही.

कोणीच रागावर नियंत्रण ठेवत नाही.कधीतरी एक जण राग शांत करून पुन्हा नाते जोडायला पाहतो पण पुढचा त्याला हवा तसा प्रतिसाद देत नाही.मग हा खेळ असाच सुरू राहतो आणि राग पूर्णपणे शांत होण्याआधीच संसार नावाचा खेळ कायमचा बंद पडतो.

‘लग्न’,’संसार’ खूप सुंदर गोष्टी आहेत.या गोष्टींमुळे जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त होतो. हे नाते खूप गोड असते.भांडणे जरूर व्हावीत पण ती फक्त त्या क्षणापूरती असावीत. अन्यथा कायम मनात अडी धरून संसार पुढे सरकत नाही तर तो कायमचा बंद होतो.

त्यामुळे संसारात एकमेकांना समजून उमजून घ्यावे. प्रेम द्यावे -घ्यावे,सहवासाने एकमेकांची सवय होते.मग जिथे ‘सवय’ होते , तिथे राग देखील क्षणात गिळंकृत करता आला पाहिजे आणि हेच सुखी आणि शांतीमय संसाराचे लक्षण असते.संसार टिकवायला ‘समजूतदारपणा आणि विश्वास’ पुरेसा असतो.

म्हणूनच समजून घ्या, विश्वास ठेवा आणि मजेत एकमेकांबरोबर जीवन व्यतीत करा.संसाररूपी वेल कायम बहरत राहील आणि आयुष्याला एक नवीन तजेला देईल.

धन्यवाद!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!