‘ मी पणा ‘ ची धुकं दाटली की जवळची माणसं सुद्धा दिसत नाहीत.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
“मी पणाची ” धुकं दाटली की जवळची माणसं सुद्धा दिसत नाहीत. म्हणजेच आपल्याला प्रिय असणाऱ्या, आणि ज्यांना आपणही प्रिय असतो अशी माणसे आपल्याला दुरावतात ती फक्त आणि फक्त आपल्या ‘मी पणा’ या अहंकारी भावनेने. ” मी पणा ” म्हणजे अहंकार. माणसाने स्वाभिमानी असावं पण अहंकारी असू नये. पण स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये खूप पातळ लाईन असते ती ओळखायला काही लोकांना जमत नाही. आणि त्यामुळे कधी स्वाभिमान अहंकारमध्ये रूपांतरित होतो हे कळत देखील नाही. माणूस जेव्हा मी पणा सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकतो.
‘ मी का फोन करू ? मी का कमीपणा घेऊ? मी का बोलू? ‘ असे बरेच ‘मी’ माणसांत आढळतात. पण याच ‘ मी पणाने’ आपण आपलं खूप नुकसान करून घेत असतो हे लक्षातच येत नाही, आणि काहींच्या तर लक्षात येऊन देखील त्यांना त्यांचा ‘मी पणा ‘ कुरवाळत बसणं जास्त महत्वाचं वाटत असत.
दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आधी स्वतःचा मी पणा बाजूला ठेवावा लागतो. आणि ज्या माणसांना नात्यांपेक्षा आपला मी पणा प्रिय असेल त्यांनी खरंच नाती बनवू नयेत. कारण जेव्हा एखादी गोष्ट कमी जास्त होते तेव्हा यांना समोरच्याला समजून घेण्यापेक्षा त्यांचा मी पणा जपणं जास्त गरजेचं वाटत असत.
आणि नाती म्हणजे कुठलाही व्यवहार नसतो जिथे तू एवढं केलं तर मी तेवढं करेन किंवा कोणाचं तिकडं काय व्हायचं ते होउदे पण मी मात्र माघार घेणं नाही कारण मी बोलतोय/बोलतीये तेच बरोबर आहे. कोणतीही गोष्ट आपण नात्यात मोजून मापून करत नसतो. प्रयत्न हे दोन्ही बाजुंनी असणं गरजेचं असत.
कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड आली की, ती कीड नातं जास्त काळ टिकू देत नाही. कारण नातं म्हणलं की समजून घेणं आलं, काही वेळी माघार घेणं, कमी पणा घेणं हे देखील त्याचाच एक भाग असतो पण या गोष्टी अहंकारी माणसांत नसतात त्यामुळे अहंकारी व्यक्तीला समोरच्या माणसांची कदर राहत नाही आणि त्याच मुळे माणसांची मन देखील दुखावली जातात आणि काही चांगली नाती सुद्धा तुटायला वेळ लागत नाही.
आणि मजेशीर भाग म्हणजे काही अहंकारी लोकांकडे खरंच अहंकार करावा असं काहीच नसत. म्हणजे एखादी खूप जगावेगळी गोष्ट आहे किंवा खूप पैसे आहेत , खूपच चांगली नौकरी आहे किंवा आणखी काही आहे, असं काहीही नसलेली सुद्धा कित्तेक लोक अहंकारी आहेत असं पाहायला मिळत. यांना बघून नक्की यांना अहंकार आहे तरी कशाचा बाबा, असा प्रश्न पडतो.
म्हणजे मी पणा करायला त्या ‘ मी ‘ मध्ये तसं भारी काहीतरी असायला सुद्धा हवं ना, की ज्या जोरावर यांना सगळी दुनिया यांच्या पायाशी हवी असते.आणि अहंकार करावा अश्या गोष्टी असून देखील काही लोकांचे पाय जमिनीवरच असतात आणि ती माणसे नम्रपणे इतरांशी वागताना ही दिसतात.
‘मी पणा’ असणारी माणसे स्वतःच्या गोष्टीच कश्या खऱ्या किंवा बरोबर आहेत हे सिद्ध करायच्या मागे लागलेली असतात, आणि त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय, त्याचा ही विचार कदाचित बरोबर असू शकतो असा विचार त्यांना नकोच असतो. त्यामुळे ते कधी कधी ऐकून ही घ्यायला तयार नसतात आणि काही वेळा ऐकून आणि त्यांना ते पटून सुद्धा ते ती गोष्ट मान्य करायला तयार नसतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यापासून हळूहळू लोक दूर व्हायला लागतात.
बऱ्याचदा असंही दिसून येत की, अहंकारी माणसांना त्यांचे अवगुण सांगणारे, चुका सांगणारे आणि त्या चुका सुधारायला मदत करणारे ‘खरे’ मित्र नको असतात, तर त्यापेक्षा त्यांची स्तुती करणारे त्यांच्या ‘मी पणाला ‘ खतपाणी घालणारी लोक अवतीभवती हवी असतात. कारण ‘मी पणा’ मध्ये ‘मी’ कुठे कमी आहे हा विचारच त्यांना अमान्य असतो.
आपल्याला प्रत्येक वेळी आपलंच का खरं करावंसं वाटत किंवा आपण चुकलोय हे कोणी सांगितलं तर त्याचा आपल्याला एवढा त्रास का होतो याचा आपण विचार केला पाहिजे. कारण माणसाच्या जन्माला आल्यावर चुका या आपल्याकडून होणारच आहेत, त्याच चुकांमधून आपण शिकलं ही पाहिजे आणि नाती हवी असतील, आपल्या जवळ आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला आरसा दाखवणारी माणसं हवी असतील तर नक्कीच हा ‘मी पणा’ बाजूला ठेवून वेळप्रसंगी कमीपणा घेणं, समोरच्याला समजून सांगणं या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण या जगात न चुकणारी व्यक्ती आणि नेहमी प्रत्येक गोष्टीत बरोबर असणारी व्यक्ती मिळणं केवळ अशक्य आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


अप्रतिम जबरदस्त आहे. ‘ मी पणा ‘ करणाऱ्यांसासाठी हा लेख एक प्रकारची चपराक आहे…!