सत्र पंधरावे : नखे चावणे (Nail Biting)
या आजाराचा थेट संबंध हा मनातल्या चिंतेशी जोडला जात असला तरीही आपल्या सभोवताली नखे चावणारी व्यक्ती ही आपल्याला सहज आढळून येते. असे काही प्रसंग दिसताच क्षणी आपल्याला समजते की, त्या व्यक्तीच्या मनात विचारांचा गोंधळ सुरु आहे. परंतु असा विचारांचा गोंधळ आणि नखे चावणे याचे प्रमाण हे तीव्र असतील म्हणजेच सारखीच ती व्यक्ती नखे चावत असेल तरच त्या व्यक्तीचे निदान या आजाराने करता येते. नाहीतर आपण सर्वसामान्य व्यक्तीही कोणत्याना कोणत्या गोंधळलेल्या परिस्थितीत नखे कुर्तडतोच ! पुढची केस आणखीन स्पष्टता येण्यासाठी आपल्याला मदत करू शकेल.
केस :
विजय वयवर्षे ३५, आज विजयची अशी परिस्थिती आहे की त्याच्या दोन्हीही हातामध्ये पितळेचं भांडं घालून ते हाथ पलंगाला बांधून ठेवले जातात. त्याच्या दोन्हीही हातांवर उपचार सुरु आहेत. नखे चावून-चावून त्याने त्याचे हाताचे सालटे पूर्ण उकरून काढले आहेत, त्याठिकाणी त्याला प्रचंड वेदना होत असून सुद्धा त्याची नखे चावण्याची प्रबळ इच्छा मात्र काही जात नाही. यामागचे कारण शोधल्यास असे आढळले की, विजय लहान पणापासून पेन्सिल दाताने कुरतडायचा. त्याचं कुरतडण्याचं प्रमाण हे त्याच्या गोंधळलेल्या परिस्थितीत तीव्र असल्याने ज्या ज्या वेळी गोंधळलेली परिस्थिती उद्भवायची त्या त्या वेळी पेन्सिल कुरतडणे यापासून त्याला समाधान मिळू लागले. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि पेन्सिलची सवय तुटल्यानंतर विजयचं संपूर्ण लक्ष त्याच्या नखांकडे वळलं आणि पुढे जाऊन त्याला अशी काही सवय जडली की त्याच्या ठिकाणी गोंधळलेली स्थिती असो किंवा नसो जर नखे चावायला त्याला मिळाले नाही तर प्रचंड मानसिक अस्वस्थता त्याच्या ठिकाणी जाणवू लागली. आज विजयच्या मनाची अस्वस्थता समजून न घेता ज्या पद्धतीने त्याला बांधून ठेवले जात आहे, जर हीच परिस्थिती काही काळ कायम राहिली तर एक नवीन विकृत प्रकार त्याच्या ठिकाणी जन्म घेईन, हे वेळीच त्याच्या आप्तस्वकीयांना समजेल का ? कोण जाणे ?
लक्षणे :
१) या आजाराने त्रस्त व्यक्ती वारंवार नखे चावत राहते. तेथील त्वचेला त्यापासून इजा झाली तरीही व्यक्ती ते करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही.
२) सतत नखे चावत असल्यामुळे त्यापासून व्हायरल इन्फेक्शनचा धोका होऊन त्यामुळे व्यक्तीच्या बोटांना नाखुर्डे येते.
३) अशा व्यक्तींच्या तोंडात कोणत्याना कोणत्या पद्धतीच्या इजा झालेल्या असतात.
कारण :
१) या आजाराच्या त्रस्त व्यक्तींना कोणत्याना कोणत्या चिंतेने भयंकर ग्रासलेले असते.
२) या आजाराची बीजे ही लहानपणीच पेरली गेलेली असतात. लहानपणी एखाद्या गोंधळलेल्या स्थितीला एखाद्या विशिष्ट वर्तनासोबत जोडले जाते. असे केल्याने त्या व्यक्तीला समाधान मिळते. जसे नखे खाणे, च्युईंगम चघळणे, पाय सतत हलविणे इ.
३) लहानपणी नखे कापण्याच्या सक्तीतुन जर मुलांच्या ठिकाणी भीती निर्माण झाली तर त्यांच्या ठिकाणी हा आजार उद्भवू शकतो.
उपचार :
१) प्रथमतः त्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाचे याठिकाणी समुपदेशन केले जाते.
२) या आजारासाठी Behaviour Therapy फार महत्वाची भूमिका बजावते.
३) अशा व्यक्तींच्या नखांवर कडवट चवीचा असणारा नेलपॉलिश लावल्यास त्यांची समस्या आटोक्यात येऊ शकते.
४) एकंदरीत गोंधळलेल्या तीव्र चिंतेच्या स्थितीवर उपचार केल्यास निर्माण झालेला विकृत वर्तन प्रकार थांबण्यास मदत मिळू शकते.
टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते
फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !