दागिन्यांनी मढवून आणि पैशांचा पाऊस पाडूनही स्त्री व्यक्त होत नसते.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
पुरुषांना बाह्य सौंदर्य महत्वाचं असत आणि स्त्रियांना पैसे, दागिने अशा गोष्टी महत्वाच्या असतात असा समज आपल्या समाजात आढळतो. पण सगळ्याच पुरुषांना बाह्य सौंदर्य तेवढं महत्वाचं असेल असं नाहीए, कितीतरी पुरुष याला अपवाद असल्याचं आढळून येतात. त्याच प्रमाणे स्त्रियांबाबत ही हेच दिसून येत की प्रत्येक स्त्री ला दागिने आणि पैसा सगळ्यात महत्वाचा असेल असं नाही. अपवाद हे दोन्हीकडे आहेत. पण ज्या स्त्रियांना दागिने आणि पैसा महत्वाचा वाटतो त्यांना तो मिळाला तरी त्या खुश, आनंदी असतात का?
प्रत्येक माणसाची व्यक्त व्हायची एक पद्धत असते. काही लोक टेन्शन आले असता धूम्रपान करतात, काही जास्त झोपतात तर काहींना अजिबात झोप लागत नाही, राग आलेला असताना ही काही लोक तो व्यक्त करताना ओरडून बोलत असतात, काहींना त्यातही रडायला येते , काही मनातच ठेवतात तर काही त्यातही वस्तू फेकून देणे अशा पद्धतीने व्यक्त होताना दिसतात.
काही लोक त्यांचा राग, टेन्शन हे overeating च्या माध्यमातून सुद्धा काढायचा मार्ग अवलंबतात. त्याचप्रमाणे टेन्शन किंवा बेचैन असताना काही स्त्रियांना शॉपिंग करायची सवय असते. आणि काही घरांतून असंही दिसून येत की काही नवरे त्यांच्या बायकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे देखील त्याच्या बदल्यात महागडे गिफ्ट्स, सोन्याचे दागिने हे देताना दिसतात.
गिफ्ट्स देण्यामध्ये चुकीचं असं काहीच नसत पण कोणत्याही वस्तू मग त्या किती महाग किंवा मौल्यवान असल्या तरीदेखील माणसातल्या नात्याची, त्यांच्यातल्या व्यतीत होणाऱ्या वेळेची उणीव भरून काढू शकत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना कितीही दागिने आवडत असले तरी त्यांना त्यातून व्यक्त होणं शक्य होत नाही. आणि काही वेळा सगळ्यात आवडत्या गोष्टी, वस्तू मिळून देखील ते समाधान, तो आनंद त्यांना प्राप्त होत नाही.
आपल्या समाजात काही लोकांचा अजून ही असाच समज आहे की स्त्रियांना दागिन्यांनी मढवल की त्यांना अजून कशाची फार गरज लागत नाही. आणि स्त्रियांचा देखील असा समज आहे की पुरुषांचा कल हा गोऱ्या आणि सुंदर बायकांकडे जास्त असतो. काळ आता इतका बदललाय की स्त्रियांना आधीसारखं आर्थिक दृष्टीने मजबूत असणाऱ्या नवऱ्याची गरज आहेच असं नसत.
ती आता स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेली दिसते आणि त्याचमुळे तिचा पार्टनर निवडतानाचा प्राधान्य क्रम देखील बदलेला आपणास दिसून येतो. आजची स्त्री ही स्वतःसाठी दागिने, आणि सगळ्या मौल्यवान गोष्टी स्व कष्टाने विकत घेऊ शकते. तिला गरज फक्त मानसिक आधार किंवा भावनिक आधाराची भासते. आणि त्यामुळे आजच्या बहुतेक स्त्रिया आपल्या पार्टनरमध्ये हेच गुण शोधताना दिसून येतात.
त्यामुळे स्त्रियांना दागिन्यांनी किंवा पैशाने मढवून त्या सुखी समाधानी होतील असं नाही. आणि स्त्रियांना देखील या गोष्टी महत्वाच्या वाटल्या तरी त्यातून खरंच आपल्याला आत्मिक सुख-समाधान मिळतंय का हे त्यांनीही पाहावं.
पूर्वीपासून आजपर्यंत एका गोष्टीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. ते म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. त्याला अपवाद दोन्ही बाजूला आढळतील. पण जास्त प्रमाणात स्त्रिया ह्या भावनिक असतात. त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, जीवन जगण्याची पद्धत ह्यामध्ये भावनिकतेकडचा कल जास्त दिसून येतो.
याचा अर्थ असा नव्हे की त्या व्यावहारिकता विसरून निर्णय घेतात , जिथे गरज असेल तिथे त्या व्याव्हारिकपणे विचार करतात पण जास्त कल हा त्यांचा भावनिकतेकडे दिसून येतो. त्याचप्रमाणे पुरुष हे काही अपवाद वगळले तर व्यावहारिक दृष्टीने विचार करून निर्णय घेताना दिसतात. आणि त्याच मुळे पत्नीला वेळ देण्यापेक्षा दागिन्यांनी मढवून खुश करणे त्यांना सोप्पे वाटते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

