Skip to content

“माझ्यामुळेच संसार सुरू आहे असा ओव्हर कॉन्फिडन्स का येतो??”

“माझ्यामुळेच संसार सुरू आहे असा ओव्हर कॉन्फिडन्स का येतो??”


मधुश्री देशपांडे गानू


आजही देविकाचा मूड खराब होता. ऑफिसमध्ये कामाच्या डेडलाइनचं टेन्शन तर होतंच. पण एकूणच भविष्याची अनिश्‍चितता दिसत होती. खरंतर अतिविचार, अतिचिंता तिच्या मनाला खात होती. घरी आल्यावर निनाद बरोबर नेहमीप्रमाणे क्षुल्लक कारणावरून तिने भांडण काढलं. हल्ली हे रोजचंच झालं होतं.

निनाद तिचा नवरा, पाच वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला होता. दोघेही उच्चशिक्षित, सुसंस्कृत, चांगल्या पगाराची नोकरी असणारे, समंजस. दोघांचा संसार अगदी दृष्ट लागण्या इतका छान चालला होता. आता तीन वर्षाची गोंडस मीरा ही होती. पण गेल्या वर्षी निनादने पूर्ण विचारविनिमय करून, योग्य सल्ला घेऊन, देविकाची परवानगी घेऊन नोकरी सोडून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला होता.

वास्तवाचा विचार करायचा झाल्यास व्यवसायाला एक गती येण्यासाठी ठराविक कालावधी आणि संयम द्यावा लागतो.  निनाद अगदी योग्य पद्धतीने हाताळत होता. पण मान्यता देऊनही देविका मात्र नकारात्मक विचारांनी आणि असंयमी  वृत्तीमुळे चिडचिडी झाली होती. निनादची नियमित मिळकत आता तिच्या हातात येत नव्हती.

हळूहळू ऊठसूट निनादचा अपमान करू लागली. त्याला कमीपणा येईल असे बोलू लागली. “मीच कमावती आहे आणि माझ्यामुळेच संसार सुरू आहे” असे सतत जाणवून देऊ लागली. खरंतर हा एक तात्पुरता काळ होता. तिने स्वतःच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याला साथ द्यायला हवी होती.

पण स्वतःच्या अहंकारापायी आणि मीच वरचढ आहे या समजा पोटी तिने संसारातील सुरळीतता मोडीत काढली. यामुळे निनादही  अकारण चिंताग्रस्त राहू लागला. त्याचा आत्मविश्वास डळमळू लागला. व्यवसायात लागणारी उत्स्फूर्तता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास गमावू लागला. संसार आणि व्यवसाय दोन्हीकडे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले.

वरील कथा अगदी कोणाच्याही आयुष्यात सहज घडणारी आहे. लग्नाने कायमस्वरूपी एकत्र येणारे दोन जीव. अत्यंत वेगळ्या परिस्थितीतून, माणसांतून, संस्कारातून, स्वभावातून एकत्र आलेले. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या दोन सख्ख्या मुलांचाही स्वभाव अगदी भिन्न टोकाचा असतो. इथे तर संपूर्णपणे प्रौढ, स्वतःची ठाम मतं, ठाम आवडीनिवडी असलेल्या दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येतात.

पती-पत्नीमध्ये एक मोकळेपणाने व्यक्त होणारा असतो तर एक अबोल. एक धाडसी तर एक छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करणारा. एक अगदी हिशोबी तर एक उधळपट्टी करणारा. एक दानशूर तर एक  स्वार्थी.. व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच ना!

बहुतेक वेळा असं दिसून येतं की लग्न झाल्यावर स्त्रिया स्वतःचं उत्तम चाललेलं करिअर नोकरी सोडून घरी बसतात. संसाराला, नवऱ्याला, मुलांना, त्यांच्या संगोपनाला प्राधान्य देतात. कित्येकदा पतीपेक्षा ही उत्तम करिअर असलेल्या स्त्रिया केवळ संसारासाठी स्वतःच्या सर्वांगीण प्रगती वर पाणी सोडतात.

इथे असं अजिबात म्हणायचं नाहीये की त्यांचं चुकतं.. मुलांच्या संगोपनासाठी आईने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या मुलासोबत असणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यभराची गुंतवणूक आहे ही. आणि प्रत्येक पती-पत्नीचा संपूर्णपणे वैयक्तिक निर्णय. प्रत्येक गृहिणी ही नोकरी करणार्या स्त्री इतकीच श्रेष्ठ आहे.

फक्त महिन्याच्या महिन्याला पैसे कमवून आणणं म्हणजे संसार नाही. तर संसारातील अनेक आघाड्या यशस्वीपणे सांभाळणं, सगळं कुटुंब एकत्र बांधून ठेवणे म्हणजे संसार उत्तम करणे. मग ती स्त्री गृहिणी असो की नोकरदार. पण जर या तिच्या त्यागाची, तिच्या कष्टांची तिच्या पतीला जाणीवच नसेल तर?? फक्त पैसे कमवून आणतो म्हणून जर माझ्यामुळेच संसार सुरू आहे असं पती म्हणत असेल तर?? काय वाटेल त्या स्त्रीला??

संसारासाठी खस्ता खाऊनही  तिचे मूल्य शून्य असेल तर?? हा ओव्हर कॉन्फिडन्स का येतो?? आज समाजात फक्त पैशाला मान सन्मान आहे. मग तो कसाही मिळवला असला तरीही. “मी घर चालवतो. माझ्या पैशावर तुम्हीं जगता. माझ्या घरात तुम्ही राहता.” असं अतिआत्मविश्वासाने बोलणारे अनेक कुटुंब प्रमुख पाहिले आहेत. अशा वेळी कुटुंबातील इतर सदस्यांची मनस्थिती काय होत असेल??

हेच अगदी पुरुषांसाठीही लागू होतं. स्थिर नोकरी असणारी स्त्री आणि अनिश्चितता असलेला व्यवसाय करणारा पती. अशा वेळी पत्नी पतीला हीन वागणूक देऊ शकते. देते. काहीवेळा माहेरची परिस्थिती अत्यंत गडगंज असलेली स्त्री पती कितीही आर्थिक सक्षम असला तरीही त्याला हीन वागणूक देताना दिसते. “मी आहे म्हणून घर संसार चालू आहे.” असं ती पतीला ऐकवते. आज आर्थिक अनिश्चितता असलेले अनेक व्यवसाय आहेत. नाटक-चित्रपटात काम करणारे अनेक तंत्रज्ञ, कलाकार आपण पाहतो. इथे आर्थिक स्थैर्य असतच असं नाही. अशावेळी जोडीदाराची योग्य आणि भक्कम साथ असणे खूप गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती मोकळेपणाने व्यक्त होणारी नसते. अशावेळी पती-पत्नीत गैरसमज निर्माण होऊ शकतात. सुसंवाद नसल्याने अनेक वादही होतात. भडाभडा बोलणारी व्यक्ती माझ्यामुळेच संसार चालू आहे असे म्हणू शकते. काहीवेळा पती-पत्नीमधील एकच जण निर्णयक्षम असतो. प्रत्येक निर्णय त्याला घ्यावा लागतो. जोडीदार फक्त “मम” म्हणण्यापुरता असतो. अशावेळी निर्णयक्षम जोडीदाराला “माझ्यामुळेच संसार सुरू आहे” हा अतिआत्मविश्वास येणारच ना!

इंग्लिश-विंग्लिश चित्रपटामध्ये श्रीदेवीच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे. “मुझे प्यार की जरुरत नहीं, जरुरत है तो थोडेसे  सम्मान की..”

मुळात संसार करायला, निभवायला दोन व्यक्तींची गरज असते. त्यामुळे फक्त एकामुळे संसार चालू आहे असं म्हणणं रास्त नाही. इथे आपण  व्यसनाधीन, दारूडे, कुकर्म करणाऱ्या व्यक्तीं बद्दल बोलतच नाही आहोत.

दोन सर्वस्वी भिन्न प्रकृती, स्वभावाच्या व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येतात. नवीन जीव जन्माला घालतात. त्याची सर्वस्वी जबाबदारी घेतात. या संपूर्ण प्रक्रियेत माणूस म्हणून अधिक उणं होणे स्वाभाविक आहे. मतभिन्नता, वाद-विवाद, भांडणही समजू शकतो. पण एखादी व्यक्ती आर्थिक स्वतंत्र, सक्षम नसेल तरीही ती संसारासाठी इतर अनेक मार्गांनी राबत, खपत असते.

त्यामुळे कोणत्याही वरवरच्या निकषांवर पती-पत्नी पैकी कोणी एकाने फक्त माझ्यामुळे संसार सुरु आहे असा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये. “अशाने आपण आपल्या जोडीदाराच्या आत्मसन्मानाला दुखावत आहोत हे कायम लक्षात ठेवावे.” संसार करणं ही जबाबदारी आहे. एकमेकांवरील प्रेमाने, विश्वासाने, एकमेकांच्या संमतीने, एकत्र निर्णयाने, समंजसपणे ती निभावता आली तरच यशस्वी होते. जिथे एक जण कमी पडेल तिथे दुसऱ्याने उभं राहायचं इतक्या समंजसपणे संसार होऊच शकतो. एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांचा सन्मान यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे… पटतंय ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!