प्रेम म्हणजे… एकाच व्यक्तीबद्दल शेवटपर्यंत असणारं आकर्षण !!
मेराज बागवान
प्रेम’ ही अदृश्य पण जगातील सर्वात सुंदर भावना.जी प्रत्यक्ष रित्या डोळ्यांना दिसत तर नाही, पण आपल्याला ती जाणवते. आपण ती अनुभवू शकतो.प्रेम कोणावरही होऊ शकते.आपण ह्या लेखामध्ये, स्त्री-पुरुष यांच्यात असणाऱ्या प्रेमा विषयी बोलणार आहोत.
आकर्षण आणि प्रेम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण परस्पर संबंधित गोष्टी आहेत. आपल्याला आकर्षण अनेक जणांविषयी असू शकते पण प्रेम असलेच असे नाही.आपल्याला जर एकाच व्यक्तीविषयी कायम आकर्षण वाटत असेल आणि ती व्यक्ती सोडून इतर कोणाविषयी देखील आकर्षण कधीच वाटत नसेल तर त्याला प्रेम म्हणता येईल.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला कायम एकाच व्यक्तीविषयी आकर्षण वाटते , तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या संपर्कात नसली तरी देखील त्यांच्यातील प्रेम कमी होत नाही. कधी कधी हे प्रेम अबोल असते. कधी ही संवाद झालेला नसला तरी देखील कायम आकर्षण फक्त एकमेकांबद्दल वाटून प्रेम निर्माण होऊ शकते.प्रेमाला कोणतीच भाषा नसते.पण आयुष्यभराचे सार प्रेमात सामावलेले असते. अशा प्रकारच्या आकर्षणात ना कधी कोणती अपेक्षा असते ना कधी कोणती मागणी असते.बरयाचदा , न काही सांगता देखील सर्व काही समजते आणि हेच ते खरे प्रेम.
आकर्षण तसे पाहायला गेले तर तात्पुरते असते.पण काही बाबतीत जसे की प्रेम , प्रेमाविषयी आकर्षण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत असू शकते. मग अशा ह्या प्रेमात कायम एकमेकांची काळजी घेतली जाते.आपसूकच त्यागाची तयारी दोघांकडून देखील होते. नेहमी संवाद असेलच असे नाही पण जीवनाच्या अवघड टप्प्यावर आल्यानंतर एकमेकांना न मागता मदत देखील केली जाते.मग त्या क्षणी अंतर असून देखील काही फरक पडत नाही. हेच ते प्रेम असते, ज्यात आकर्षण कायम एकाच व्यक्तीविषयी वाटत असते.
आपल्याकडे ‘प्रेम विवाह’ सध्या बऱ्यापैकी दिसून येत आहेत. पण याचबरोबर हेच विवाह मोडकळीस आलेले देखील आपण पाहत आहोत आणि याचे प्रमाण देखील तुलनेने खूप जास्त आहे.बरयाचदा वेगळे होण्याचे कारण, “तुझे माझ्यावर पाहिल्यासारखे प्रेम नाही” हे असते.मग ज्या प्रेमात विश्वास नाही, त्याला खरे प्रेम म्हणता येईल का ? ते केवळ तात्पुरते आकर्षण च होय.
प्रेमात, ‘विश्वास आणि समजूतदारपणा’ खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि ह्या दोन गोष्टींवरच प्रेम चिरकाल टिकते.मग कधी त्याग करण्याची वेळ जरी आली तरी देखील मन ते करायला मागे-पुढे पाहत नाही.जेव्हा एकाच व्यक्तीबद्दल कायम आकर्षण असते तेव्हा स्वतःच्या आधी त्या व्यक्तीच्या भल्याचा, त्याच्या सुखाचा विचार केला जातो.ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जरी गेली तरी देखील , त्या व्यक्ती नेहमी सुखात राहावी हीच अपेक्षा असते.ह्या अशा अकर्षणालाच ‘प्रेम’ असे नाव देता येईल.
आपल्या समाजात बहुतांशी विवाह हे ‘अरेंज’ पद्धतीचे असतात. प्रथमतः प्रेम नसले तरी देखील सुरवातीला आकर्षणाने आणि नंतर नंतर सहवासाने प्रेम निर्माण होते.मग अशा नात्यात बांधिलकी , जबाबदारी वाढीस लागते आणि यामुळेच कायम ह्याच व्यक्तीबद्दल आकर्षण चिरकाल टिकू शकते.
अर्थात प्रत्येक नात्यांमधील अनुभव वेगळा असू शकतो. पण जेव्हा जेव्हा कोणत्याही नात्यामध्ये, विश्वास, काळजी ,बांधिलकी, समजूतदारपणा आणि एकमेकांविषयी आदर असेल तर त्या नात्यात कायम आकर्षण टिकून राहते आणि फक्त प्रेम आणि प्रेमच वाढीस लागते.
म्हणूनच काळजी घ्या, विश्वास ठेवा आणि एकमेकांशी बांधील राहून नात्यांमधील आकर्षण कायम टिकवून ठेवा.आयुष्य आणखीन मजेत जगत येईल.
आनंदी आयुष्यासाठी प्रेमळ शुभेच्छा !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूप छान आहे हा लेख
Very nice….appsulatary real and important things
Right