Skip to content

…आणि गृहिणी असूनही तिला तिची कमाई सापडली !!!

…आणि गृहिणी असूनही तिला तिची कमाई सापडली !!!


पल्लवी तुपे


दोन दिवसांपासून खूपच अस्वस्थ होता तो..तिला ते जाणवत होतं.. पण तो स्वतः हुन सांगेल म्हणून ती शांत बसली. आणि झालं ही तसंच.. त्याने कारण सांगितलं..त्याच्या ऑफिस मधील एक सहकारी अचानक चक्कर आल्याच निमित्त होऊन गेला होता. वय ही फार नव्हतं त्याच.तिला ही हे ऐकून वाईट वाटलं .त्यानंतर दोन दिवसांनी याने कपाटातील सगळी कागदपत्र काढली. हिला शेजारी बसवून सगळं दाखवू लागला. सगळ्या पॉलिसी .. एफडी.. म्युच्युअल फंड …कुठे किती जमीन आहे… वगैरे सगळं…सांगितलं… जी काही त्याची आतापर्यंत ची कमाई आहे ती सगळी तिला सांगितली. तिला खूप आश्चर्य वाटत होतं. ती म्हणाली ” मला का सांगतोस हे सगळं तू आहेस ना पाहायला मग मी कशाला काळजी करू.” तेव्हा तो म्हणाला ” तुला सगळं माहीत हवं. माझ्यानंतर तुमचं काही अडुन नको राहायला. आता हळू हळू या सगळ्यात ही लक्ष घाल. आज मी आहे म्हणून ठीक आहे. उद्या मी नसलो तर?? ” क्षणभर ही हादरली पण वातावरण निवळण्यासाठी हसत म्हणाली.. ” काही होणार नाही तुला..चांगला शंभर वर्षे जगनार तू.वटपौर्णिमेच व्रत माझं वाया नाही जायचं. चल आवर पटकन छान गरमागरम चहा करते.. तुला बाहेर जायचं होतं ना ?”

अस म्हणताच त्याने ही म्हटलं .. तुला सगळं सांगून ठेवलेलं बरं..जॉब करत होतीस तेव्हा पैशांच्या व्यवहाराकडे लक्ष द्यायचीस.. आता अजिबात च लक्ष देत नाही या गोष्टींकडे. म्हणून सांगितलं” तसा तो ही उठला.. सगळं आवरून चहा घेतला आणि बाहेर गेला.

हिने ही स्वतःला चहा घेतला… जरा निवांत चहा पिऊया खिडकीत बसून ..ही तिची खूप आवडती जागा होती. चहा घेऊन बसली.. पण डोक्यातून मघाचे विचार काही जाईना. किती काळजी करतो आपली.. असा कसं काही ही मनात घेतो न सांगत बसतो. आणि असाच विचार मी केला तर… मी गेल्यावर यांचं सगळ्यांच काय????

मी जायच्या आधी काय सांगून जाऊ यांना.. क्षणभर काहीच सुचेनासे झालं हिला.. काय सांगू .. काय सांगू?? मी गेल्यावर …..ओला टॉवेल बेड वर टाकू नकोस… लोणच्याचा बरणीचं झाकण घट्ट लाव.. नाहीतर लोणचं खराब होईल.. वर्षभर लागणार सांडगे पापड… त्या मोठया पिंपात ठेवलेत.. त्या नेहमीच्या भाजीवली कडूनच भाजी आणा.. ती जमवून देते..

आणि..आणि.. काय सांगून ठेवू… आणि खरंच हे सगळं सांगितलं तर यांचं काही अडणार नाही का…. ? ही आयुष्यभरची कमाई आहे का माझी… नाही नाही.. “क्षणभर तिने आंजळीत चेहरा झाकला… आणि सगळं आठवायला लागलं तिला….”पहिलं बाळ झाल्यावर बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून तिने matrnity leave वाढवून घेतली.. सासू सासऱ्यांचं वाढतं वय लक्षात घेता त्यांच्यावर बाळाची जबाबदारी टाकणं शक्य नाही हे तिला जाणवलं . आणि स्वतःच्या इच्छेन हिने चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचं ठरवलं. नवऱ्याने समजावून ही सांगितलं पण बाळासाठी घरासाठी हिने स्वतःहून निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.. आणि पूर्ण वेळ संसारासाठी दिला..नंतर दुसरी मुलगी … सासू बाईंची गुढगे दुखी.. सासऱ्यांचं बीपी, शुगर ची पथ्यपाणी मुलांचा अभ्यास..क्लासेस.. घरातली काम या सगळ्यात स्वतःला वाहून घेतलं आणि एक फुल्ल टाइम गृहिणी बनली. खूप खुश होती ती.. पण कधीतरी आपण काही चूक तर नाही ना केली असे क्षणभर वाटून जायचं.कारण नोकरी करताना मिळणारा पैसा.. मान..आत्मविश्वास हे सगळं च गेलं होतं ..पण ते थोड्या वेळापुरातच वाटायचं … आणि आज अचानक आपण काय कमावलं हे सगळं करून हा असा विचार आपल्या मनात आला.

आता मात्र तिला अस्वस्थ वाटायला लागलं….आपण बरोबर केलं ना…? ती विचारात पडली.. आणि तिच्या ही नकळत एक अश्रू गालावर ओघळला…
तितक्यात तिची लेक समोर हातात गरम गरम पोहे न चहा घेऊन आली.. तिच्या भातुकलीच्या संसारातला… आणि म्हणाली ” तू कशी आजी आजोबांना गरम चहा न पोहे देते तसं तुला मी देते..खाऊन घे हा पटकन.” आणि ती दुसरी पोह्यांची प्लेट न चहा घेऊन आजोबांकडे गेली. आणि आजोबा ही खोटा खोटा आस्वाद घेत नातीचे पोहे खाऊ लागले. छान झालेत हं… अशी कॉम्प्लिमेंट ही दिली.या सगळ्या अस्वस्थ विचारात असताना ही हिला हसू आलं. खिडकीतून बाहेर पहिल…मोठा मुलगा आजी ला दुर्वा करू लागत होता. तो आता आजीचा हात धरून तिला पायऱ्या चढायला मदत करत होता.मुलांकडे पाहून तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली.. तिने डोळे पुसले …मघाशी आलेली अस्वस्थता क्षणार्धात गेली…आणि स्वतःशीच म्हणाली “ही आहे माझी कमाई.”

मुलांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या प्रत्येक बाललीला मी स्वतः पाहिली.. अनुभवली.. रोज त्यांच्या सगळ्या गोष्टी नवरा घरी आल्यावर सांगून .. नवऱ्याला ही मुलांच्या कोडकौतुकात नाहताना पाहिलं. त्यांच्या आजारपणात त्यांच सगळं केलं..त्यांना चांगली शिस्त लावली..

थोरामोठ्यानचा आदर करायला शिकवलं.. त्यांच्यावर चांगले संस्कार करतीये .. त्यांना healthy life style दिली .ही माझीच कमाई आहे की…सासुसासर्यांच्या उतरत्या काळात जमेल तितकी त्यांची सेवा करत आहे.. त्यांचे औषधपाणी.. पथ्यपाणी संभाळतीये ..घराचं घरपण टिकून ठेवतीये …कधीतरी भांड्याला भांड लागतं…पण परत लगेच सगळं सुरळीत होतं.परवा सासूबाई त्यांच्या मैत्रिणीला सांगत होत्या ” सुनबाई सगळं करते हो आमचं.. नशीबवान आहोत आम्ही.” त्या वेळी सासूबाईंच्या डोळ्यातले भाव ही माझीच कमाई .. सासऱ्यांना डॉक्टरानी विचारलं पथ्य संभाळताय ना… त्यावर सासऱ्यांनी सांगितलं.. “मी नाही हो.. सुनबाई सगळं पहाते पथ्याचं …त्यामुळे मी ठणठणीत आहे.. “हे ऐकल्यावर माझ्या नवऱ्याकडे त्या डॉक्टरांनी ज्या नजरेनी पाहिलं..ती एक प्रकारची कमाई च आहे की.आशा खूप गोष्टी आहेत की मी कमावलेल्या. करिअर ही गरजेचं होतं माझ्यासाठी पण मी माझ्या priorities ठरवल्या. थोडीशी खंत आहे .. करिअर सोडल्याची पण कुठल्या गोष्टीच guilt नाही… माझ्या घरच्या माणसांच्या प्रत्येक सुखदुःखात .. मुलांच्या बाल हट्टा त.. आजारपणात .. मी 24 बाय 7 हजर होते.कुटुंबासोबत चे सगळे क्षण मी खऱ्या अर्थाने जगले.. माझ्या मुलांच्या बालपणात मी पुन्हा माझं बालपण अनुभवलं. माझ्या नसण्याने कुणाचं काहीच अडुन रहाणार नाही ही चांगलीच गोष्ट आहे. पण मी केलेल्या संस्कारांनी त्यांचा आयुष्याचा प्रवास सुखकर नक्कीच होईल.
असा विचार करून ती आत्मविश्वासाने उठली .. एक दीर्घ श्वास घेतला.. आज नव्याने तिला तिची कमाई सापडली होती….☺️



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “…आणि गृहिणी असूनही तिला तिची कमाई सापडली !!!”

  1. प्रकाश राजगे

    खूप छान पल्लवी ताई ,खरच आज घरात आई असण्याची किती गरज आहे ते फक्त आईविना वाढलेली मुलेच सांगू शकतात,आई ही खूप मोठी संस्काराची खाण आहे यात वादच नाही.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!