Skip to content

सत्र सतरावे :- सतत शारीरीक दुखणं असल्याची तक्रार (Pain Disorder)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र सतरावे :- सतत शारीरीक दुखणं असल्याची तक्रार (Pain Disorder)


या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना सतत शारीरिक दुखण्याने घेराव घातलेला असतो. त्यामुळे अशा व्यक्ती सतत त्याविषयी तक्रार करीत असतात. डोके दुखणे, पोट दुखणे, पायदुखी, कंबर व पाठ दुखणे, गुढगे दुखी अश्या प्रकारच्या शारीरिक दुखण्याने त्यांचे दैनंदिन जीवन गळून पडलेले असते. परंतु हेच दुखणे घेऊन ज्यावेळी ते डॉक्टरांचा सल्ला घ्यायला जातात, त्यावेळी कोणत्याही शारीरिक दुखण्याचं निदान होताना दिसत नाही. या आजारालाच “Pain Disorder” असे म्हणतात. म्हणजेच अश्या व्यक्तींना सतत वाटते की, माझ्याठीकाणी प्रचंड शारीरिक दुखणं आहे, असे वाटल्याने त्यांना समाधान वाटते. याउलट असे न वाटल्यास त्यांच्या ठिकाणी प्रचंड अस्वस्थता उद्भवते.


केस :
आरती ही २४ वर्षाची विवाहीत गृहीणी आहे. तिच्या लग्नाला २ वर्ष झाले. लग्न झाल्यापासून आरतीला फार एकटे-एकटे वाटते. घरी नवरा व ती दोघेच असतात. नवरा रात्री ८.३० वाजता घरी येतो. त्यातून आकाश जरा अबोल स्वभावाचा आहे. घरी आल्यावरही टीव्ही पाहणे किंवा कॉम्पुटरवर काम करीत राहणे, असेच त्याचे सुरु असते. तसेच पुण्यात नवीन असल्याने आरतीला म्हणाव्या तितक्या मैत्रिणीही नाहीत आणि दोघांचे मूळ गाव नाशिक असल्याने याठिकाणी त्यांना नातंमंडळीही नाही. एकंदरीत आरतीला या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला जरा अवघडच जात आहे. अलीकडे आरतीला अधून-मधून डिप्रेशन जाणवते. त्यात आणखी २-३ महिन्यांपासून तिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. आरतीला अतिशय तीव्र पोटदुखी व पायदुखीचा त्रास होतोय. काही वेळा तिला इतक्या वेदना होतात की पूर्ण वेळ झोपून राहावे लागते. अनेक डॉक्टर झाले, सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. तरीही पाठदुखी व पायदुखीमागच्या कारणाचे निदान अजूनही होऊ शकले नाही. अखेरीस डॉक्टरांनी आकाशला सल्ला दिला की, आरतीला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावे. आकाश व आरतीला हे फारसे पटत नव्हते. पाठदुखी व पायदुखीसाठी अशा ठिकाणी कशाला बरे जायचे, असा दोघांनाही प्रश्न पडला ? परंतु दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे तो तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेला. त्याठिकाणी आरतीचे “Pain Disorder” या आजाराने निदान झाले.


लक्षणे :
१) या आजाराने ग्रस्त व्यक्ती सतत शारीरिक दुखण्याची तक्रार करीत असतात, या दुखण्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाला गळती लागते.
२) शारीरिक दुखणं वारंवार डॉक्टरांकडे जाणे, विविध तपासण्या करणे, सारखी औषधे किंवा पेन किलर्स घेणे हे त्यांचे सतत सुरूच असते.
३) कितीही तपासण्या केल्या तरीही शारीरिक पातळीवर व्यक्तीस कोणतीच व्याधी दिसून येत नाही किंवा काही आढळलेच तर ते फार किरकोळ असते.
४) त्यांच्या शारीरिक दुखण्याकडे एका ठराविक परिस्थितीनंतर कुटुंबाने दुर्लक्ष केल्यास त्यांच्याठिकाणी कमालीची अस्वस्थता जाणवते.


कारणे :
१) हा मानसिक आजार होण्याआधी प्रचंड अस्वस्थता, निराशा, डिप्रेशन, एकाकी वाटणे, दूर सारल्याची भावना इ. एकत्रीत घटक जबाबदार असू शकतात.
२) अनुवंशिकतेमार्फत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा आजार संक्रमित होऊ शकतो.
३) बालपणापासून सभोवतालीन वातावरणामध्ये जर कोणालाही हा आजार होताना पाहून व्यक्ती मोठी झाली असेल तर तिच्या ठिकाणी मोठेपणी हा आजार येण्याची शक्यता वाढते.


उपचार :
१) या आजाराची कारणे शोधण्यासाठी अबोध मनात दडलेल्या कप्याचा अभ्यास करण्यासाठी स्पप्न विश्लेषण हे उपचार तंत्र उपयुक्त ठरू शकते.
२) व्यक्तीला तिच्या आजाराची जाणीव करून देऊन तार्किक दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते.
३) CBT, REBT, Existential Therapy इ या सायकोथेरेपीचा फार मोठा फायदा या व्यक्तींवर होतो.
४) तसेच मेडिटेशन व रेलॅक्सेशन ने व्यक्तीला तिचे मन नियंत्रणात आणून देण्यास मदत होते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

3 thoughts on “सत्र सतरावे :- सतत शारीरीक दुखणं असल्याची तक्रार (Pain Disorder)”

  1. मुलाची मनाची चंचलता . परिक्षेत उत्तरे येत असले तरीही चंचलतेमुळे लिहित नाही. मार्गदर्शन मिळालवे.

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: