अवेळी आलेल्या नको त्या उत्कट भावनांना आवर कसा घालावा??
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
‘उत्कट’..आता उत्कट म्हणजे काय तर साधं सरळ सांगायच झालं तर अधिक तीव्र असा त्याचा अर्थ होतो. किंवा आपण त्याला “passionate” या अर्थानेही वापरतो. आनंद , क्रोध , प्रेम यांसारख्या अशा कितीतरी भावना आहेत ज्या उत्कट भावना समजल्या जातात.इतकच नाही तर हा उत्कट शब्द आपण अनेक ठिकाणी वापरतो.आता भावना या केवळ भावना असतात असं नाही. तर त्यांनाही काही “levels” असतात.
काही उत्कट असतात तर काही नसतात. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात अगदी तसच या उत्कट भावनांचही तसच आहे. यांनाही एक सकारात्मक आणि नकारात्मक अशी बाजू असतेच.या उत्कट भावना कधी सकारात्मक रूपात बाहेर येतात तर कधी नकारात्मक रूपात बाहेर येतात.
पहा,आपलं आयुष्य फुलपाखरासारख रंगीबेरंगी आहे. या आयुष्याच्या विविध अशा छटा आहेत. काही गडद तर काही फिक्या आहेत. व्याकरणातील उपमा अलंकार आपण आपल्या खऱ्या आयुष्यातही वापरतो.अगदी तसच आपल्या भावनांना सुद्धा एक वेगळाच साज असतो.रंगांप्रमाणेच त्यांच्याही विविध अशा छटा असतात.
फुलपाखरू जसं कधीही अवेळी कोणत्याही फुलांवर येऊन स्वार होतं अगदी तसच काहीसं या भावनांच आहे. काही अशा उत्कट भावना असता ज्या कधीकधी अवेळी व्यक्त होऊ पाहतात. आणि अशावेळेस नेमकं काय करावं हे आपल्याला कळेनासं होतं.त्या अशा उत्कट भावनांना आवर कसा घालायचा हे आपल्याला समजतच नाही.
आपल्याला कधी कधी सगळ्या गोष्टी अगदी सहजतेने जमतात पण भावनांना आवर घालणं मात्र जमत नाही. भावनांना आवर घालणं आपल्याला खूप मोठ्ठ ‘दिव्य’ वाटतं.नैसर्गिक आहे हे असं म्हणून आपण कित्येकदा त्यांना आवर घालायचा विसरून जातो.मित्रांनो, भावना जरी नैसर्गिक , स्वाभाविक असल्या तरी त्यांच्यावर आपलं नियंत्रण असतं.त्यांच्यावर आपणच नियंत्रण ठेवू शकतो.
पण केव्हा आणि कुठे यांना आवर घालायचा हे आपल्याला कळायला हवं.नाहीतर ओघामध्ये त्या भावना कधीकधी नको त्या वेळी…अर्थातच अवेळी बाहेर पडतात. आणि मग अवेळी भावना बाहेर पडल्यामुळे नंतर आपल्यालाच वाईट वाटतं , पश्चाताप होतो.नको नको त्या गोष्टी मनात पुन्हा घर करू लागतात.
पण या अशा उत्कट भावना सारख सारखं अवेळी बाहेर पडणं योग्य नाही. कधीतरी त्यांना आवर हा घालायलाच हवा. नाहीतर या भावना कधी नियंत्रणाबाहेर जातील कळणारही नाही. कारण उत्कट भावना ह्या जितक्या चांगल्या वाटतात तितक्याच या कधी कधी वाईटही असतात. अर्थात त्यांना सांभाळता आलं तर चांगलच आहे पण जेव्हा या उत्कट भावनांना सांभाळता येत नाही तेव्हा मात्र गोष्टी कठीण होण्याची शक्यता असते.उत्कट… अतिशय तीव्र इच्छा ही चांगली गोष्ट आहे परंतू ती कुठे कशी कधी याचा ताळमेळ जमणं आवश्यक आहे.
या उत्कट भावना प्रेमाच्या असू शकतात , आनंदाच्या , शारिरीक-मानसिक सहवासाच्याही असू शकतात. आनंदाला-प्रेमाला पारावर नसतो पण तो आनंद, ते प्रेम योग्य वेळी बाहेर आलं पाहिजे. सहवास म्हणाल तर तो हवाहवासा वाटतो. स्पर्शात , सहवासात सुद्धा खूप ताकद असते असं म्हणतात.
काहींच्या केवळ सहवासाने खूप बरं वाटतं तर कुणाच्या स्पर्शात एक वेगळीच जादू असते.आणि याउलट सांगायच झालं तर गोष्टी त्याच असतात पण त्या नकारात्मक असतात, विरुद्ध दिशेच्या असतात. क्रोध ,द्वेष अहंकार ,सूड भावना या उत्कट भावना तर अनेकदा नुकसानच करतात.कधी कधी आपल्या बाबतीत अशा काही गोष्टी घडतात की या उत्कट भावना अवेळी, नको तिथेही बाहेर पडतात. त्यांना थांबवणं आपल्याला कठीण जातं.त्या उत्कट भावनेपुढे आपल्याला काहीच सुचेनासं होतं.
काळ, वेळ ,ठिकाण यांचा विचार करायला विसरू नका.आपण कोणत्या ठिकाणी आहोत , आपल्या सोबत किती जण आहेत या सगळ्या गोष्टी सर्वप्रथम विचारात घ्या.स्वतःला आधीच सक्त ताकीद द्या की कितीही काहीही झालं तरी मनावरचा कंट्रोल सुटता कामा नये.आणि कंट्रोल सुटलाच तर वेळीच त्याच्यावर ताबा मिळवा.तुला थांबायचय हे मनाला निक्षून सांगा.
ही योग्य वेळ नाही , आपण नाही पण वेळ चुकतेय ह्याची मनाला जाणीव करून द्या.आत्ता इथेच नाही थांबलो तर पुढे काय होईल नी काय नाही हे आपण स्वतःही सांगू शकत नाही …नी होणारा पसाराही काही सहजासहजी आवरू शकत नाही हे तेव्हा त्याच क्षणी स्वतःला पटवुन द्या.उत्कट भावना कोणत्याही प्रकारच्या असूद्या त्यावर कंट्रोल ठेवायला शिका.आयुष्यात कोणतीही जागा खूप महत्वाची असते त्यामुळे जागेच नेहमी भान ठेवा.
स्वतःवर संयमाची जबाबदारी ठेवून पहा, ती नीट पार पडली की सगळं कसं शक्य होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


