Skip to content

आर्थिक परिस्थितीची जाण असणाऱ्या स्त्रिया संसाराला कधीच कमी पडत नाही.

आर्थिक परिस्थितीची जाण असणाऱ्या स्त्रिया संसाराला कधीच कमी पडत नाही.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


संसार म्हणजे कधी आयुष्याची सुरेल गुंफण ,तर कधी आयुष्याचा अगम्य गुंता….!! जशा व्याख्या ठरवता येतील तशा आपण व्याख्या ठरवत जाऊ. त्याला फारसा वेळ लागणार नाही. पण संसाराच काय…? संसार करायला लागतो , व्हावा लागतो..इतकच नाही तर एखाद्या वचनासारखा तो निभवावाही लागतो.

आयुष्यात कितीही खाचखळगे आले तरी तो संसार थाटावाच लागतो.तो असा अर्ध्यावर सोडून जायच नसतं.नाहीतर ‘संसार’ या शब्दाला काही अर्थच उरत नाही. असं म्हणतात संसार रूपी रथाची ‘स्त्री आणि पुरुष’ ही दोन भक्कम चाकं आहेत. या चाकांशिवाय हा रथ अपूर्ण…! ही दोन चाकं जर भक्कम असतील तर हा संसाररूपी रथ वेगाने आणि सुरक्षितपणे निरंतर चालत राहतो.अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…!

संसार म्हंटल की त्याची सुरुवात – मध्य – शेवट हा आलाच.आयुष्याचे जसे वेगवेगळे टप्पे असतात तसेच या संसाराचे काही छोटे-मोठे टप्पे असतात. आयुष्य वेगळं आहे आणि त्यातील संसार हा भाग वेगळा आहे. दोन्ही गोष्टी अगदी भिन्न स्वरूपाच्या आहेत.पण तितक्याच एकमेकांना पूरकही आहेत.

मित्रांनो, आयुष्य जरी एकट्याचं असलं तरी संसार हा एकट्याचा मुळीच नसतो. काटेरी मखमली गुलाब आणि तो धुंद मोगरा या दोघांचा हा संसार असतो. संसार दोघांचा असतो म्हणजे तो दोघांनीच सजवला पाहिजे. एकाने तोडलं तर दुसऱ्याने जोडलं पाहिजे. एकमेकांच्या कलाने गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तरच संसार फुलांसारखा दरवळतो…नाहीतर पाकळ्या गळून पडाव्या तसा सहज गळून पडतो…!

आयुष्यात संसार करताना कित्येकदा विविध प्रकारची संकटं येतात. अनेकदा ही संकटं तर आर्थिक स्वरूपाची असतात. कोणतं न कोणतं आर्थिक संकट हे संसार करताना ओढवतं.पण मग अशावेळी अनेकदा संसार कसा करायचा…? असा प्रश्न पडतोच.कारण नुसत्या शब्दांनी , प्रेमानी संसार होत नसतो.संसार करायचा तर आधी जगायला हवं.

आणि जगायच असेल तर पोटाला कुलूप लावून चालणार नाही. पोटापाण्यासाठी काहीतरी करावच लागतं.बर्गर-पिझ्झा नाही पण एका भाकरीसाठी तरी कमवावच लागतं.आणि जवळ असलेलं उधळण्यावरही तितकाच ताबा ठेवावा लागतो.

नाही म्हंटल तरी स्त्री लग्न करून दुसऱ्या घरी जाते.तिचा संसार फुलविण्यासाठी…! पण अनेकदा कित्येक स्त्रियांना संसार कसा करायचा असतो हेच कळत नाही. पैशाचं महत्त्व तर त्या जाणतच नाही. कोणताही ताबा न ठेवता , विचार न करता बिंधास्त पैसा उधळतात. कदाचित आर्थिक परिस्थितीची त्यांना जाण नसावी. अनेकदा याच गोष्टीमुळे संसारात काहीतरी कुरापती होत रहातात.

पैसा उधळून झाल्यावर तो कमी पडला की आता संसार कसा करायचा…असं बोलणाऱ्या काही स्त्रिया आहेत. पण हेही तितकच खरं की आर्थिक परिस्थितीची जाणीव असणाऱ्या स्त्रिया संसाराला कधीच कमी पडत नाही.

नसे लोळण ही पैशाची
तरी अंगणा सुख खुलविते ती…
संसाराच्या नाजूक वेलीवर
फुले प्रीतीची फुलविते ती…!!

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची जाणीव असेल तर ती व्यक्ती ती गोष्ट अगदी व्यवस्थित हाताळते.अगदी तसच आर्थिक परिस्थितीची जाण असलेल्या स्त्रिया संसाराच्या गाडीतील पेट्रोल कधीच संपू देत नाहीत. पैशाची लोळण नसली तरी त्या घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख खुलवतात.स्वतःच्या संसाराची वेलही ताजी टवटवीत कशी राहील याची काळजी घेतात. मनात जाणीवांचा सुगंध ठेवून प्रीतीची फुलही फुलवतात…!

आहे पैसा म्हणून उधळूयात अशी त्यांची भूमिका कधीच नसते.पैसा असेल तर त्याची गुंतवणूक करतात.भाजी आणताना , छोट्या छोट्या गोष्टी आणताना चार पैसे वाचवून बाजूला ठेवतात. तोच पैसा असल्या – नसल्याला शेवटी उपयोगी येतो.कधी कधी करते बाई हट्ट एखाद्या साडीसाठी….पण कधी तितक्याच मनापासून ती प्रेमाची तडजोडही करते.अगदी लग्नातला शालूसुद्धा चार लोकांच्या लग्नात तितक्याच आनंदाने मिरवते.

पूर्वस्थिती वा प्रकर्षाने अनुभवलेले काही प्रसंग यातून त्या स्त्रियांनी आयुष्यासाठी चांगलेच धडे घेतलेले असतात. त्यामुळे त्यांना अशा आर्थिक परिस्थितीची चांगलीच जाणीव असते.आर्थिक परिस्थिती बिकट असो वा चांगली त्या स्त्रिया पैशाची जाणीव कधीच विसरत नाही. चांगल्या परिस्थितीतही तो पैसा कोणत्या चांगल्या कामासाठी वापरला जाईल..?कुठे गुंतवता येईल ..? कुठे उधळपट्टी होणार नाही..? या सगळ्या गोष्टींचा त्या विचार करतात.

आणि बिकट परिस्थितीतही आहे त्यात कसं नीटनेटकं करायच याची जाणीव त्यांना असते.उगाचच परिस्थितीचा बाऊ करून संसारात त्या कधी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत नाही. याऊलट संसार सुखाचा कसा होईल यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. कमवता एकटा असला काय किंवा दोघे असले काय..तिला त्या परिस्थितीची जाणीव तितकीच असते. फोडणी कितीही जळाली तरी ती रूचकर कशी बनेल याची काळजी त्या स्त्रिया नक्की घेतात.

उगाचच एखाद्या करारासारखं त्या कधीच वागत नाही. संसार दोघांचा आहे मग स्वतःला पावलं उचलणं गरजेच आहे हे त्या जाणतात. परिस्थितीची पिनच इतकी घट्ट लावलेली असते की जाणीवांचा , जबाबदाऱ्यांचा पदर त्या कधीच सुटू देत नाहीत.कमी असेन तर उणीव भासू देत नाहीत आणि जास्त असेन तर त्याची वाहवा करत दिंडोऱ्याही पिटत नाहीत.कधी एक पाऊल मागे येऊन तर कधी एक पाऊल पुढे टाकून त्या संसार फुलवायला सहाय्य करतात.आलेल्या संकटांना हसतहसत झेलतात.अशा या जाणीवांचा हळवा, कणखर सुगंध असलेल्या स्त्रिया संसारात कधीच कमी पडत नाहीत.
खरचं…

धन्य त्या स्त्रिया नी धन्य त्यांच्या जाणीवा…!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आर्थिक परिस्थितीची जाण असणाऱ्या स्त्रिया संसाराला कधीच कमी पडत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!