सत्र एकोणिसावे : भितीदायक स्वप्न पडणे (Nightmare Disorder)
भितीदायक स्वप्न पडणे ही एक सामान्य बाब आहे, परंतु त्याची तिव्रता जर दिवसेंदिवस वाढत असेल तर त्याचे मानसिक आजारात रुपांतर होण्यास वेळ लागत नाही. रोजच्या जगण्यात व्यक्ती ज्या पद्धतीचे अनुभव घेत असते ते सर्व अनुभव तिच्या अबोध मनात दमन होऊन व्यक्तीला स्वप्न पडत असतात. जर रोजच्या व्यवहारामध्ये व्यक्ती भितीदायक अनुभव घेत असेल तर त्या सर्व बाबींचे दमन होऊन अबोध मनातील ताण विस्फारीत होतो, आणि आपल्याला स्वप्न पडतात. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचा झोपेच्या बाबतीत बोजवारा उडालेला असतो. भितीदायक स्वप्न पडतील म्हणून अशा व्यक्ती झोपतच नाही, जरी झोप लागली तरी काहीशी भितीदायक स्वप्नांची चाहूल लागून या व्यक्ती ताडकन जाग्या होतात, नंतर मात्र त्यांना झोपेपासून वंचित राहावे लागते. तरीसुद्धा जागेपणी ते भितीदायक अनुभव घेत असतात. काही वेळेस भितीदायक स्वप्न पडणे हे एखाद्या गंभीर मानसिक आजाराची लक्षणे सुद्धा असू शकतील.
केस :
मनीषा वयवर्ष ३०, सध्या खूप घाबरीघुबरी राहते. तिच्या अशा वागण्याचे परिणाम आता तिच्या कामाच्या ठिकाणीही होवू लागले आहेत. रात्र होऊच नये असे तिला वाटते. जशी रात्र जवळ येते तशी तिची भिती दुप्पट वाढते आहे. मनीषाचा एकंदरीत इतिहास पाहता तिला फारसे वैवाहिक जीवनातील सुख मिळालेले नाहीये. तिची ही खंत आता जखमासारखी वाढत जाऊन तिला आता त्याची भिती वाटायला लागली आहे. मग ही भिती लोक काय म्हणतील ? माझ्या चारित्र्यावर संशय तर घेणार नाही ना ? माझ्या पुढच्या करीअरचे कसे होईल ? मला कामावरून काढून तर टाकणार नाही ना ? अशा अतार्कीक गोष्टी भितीच्या स्वरुपात तिच्या मनात वाढत आहेत. तसेच त्या अशा पद्धतीने वाढत आहेत की अबोध मनातील बराचसा कप्पा याच भितीदायक विचारांनी व्यापलेला आहे आणि त्यातूनच मनीषाला अहोरात्री भयानक स्वप्न पडत आहेत. मनीषा ही लहानपणापासूनच अतिसुरक्षित वातावरणात वाढलेली असल्यामुळे तिच्या ठिकाणी परावलंबन प्रचंड प्रमाणात आहे. त्यादिवशी तर नोकरीच्या ठिकाणातील सहकारी मला मारून टाकण्याचा कट रचत आहेत आणि मला जमिनीत पुरण्यासाठी खड्डा खोदत आहेत, असे अतार्कीक स्वप्न मनीषाला छळू लागले आहेत. तसेच जंगल, भित्रे प्राणी, खोल दरी, आग, काळोख ही मनीषाच्या स्वप्नांची प्रमुख स्थळे. अश्या या भितीदायक स्वप्नांतून मनीषा सध्याच जीवन जगात आहे. जर हीच परिस्थिती कायम राहीली तर मनीषाचं घराबाहेर जाणं मुश्कील होऊन एका गंभीर मानसिक आजाराला ती बळी पडू शकते, हे वेळीच ओळखून त्या पद्धतीने तिच्यावर शास्त्रीय उपचार होतील का ? कोण जाने !
लक्षणे :
१) या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती आपला भितीदायक अनुभव सांगताना थरथरतात, त्यांना घाम फुटतो, रक्तदाब वाढतो.
२) अशा व्यक्तींचा झोपेचा बोजवारा उडालेला असतो, रात्र होऊच नये असे त्यांना वाटते.
३) तसेच दिवसासुद्धा झोप काढायला या व्यक्तींची दमछाक होते, झोप व्यवस्थित न मिळत असल्यामुळे या व्यक्तींचे डोळे एकतर खोल गेलेले असतात किंवा लालबुंद झालेले असतात.
४) अपुऱ्या झोपेमुळे या व्यक्ती भ्रम आणि विभ्रम या गोष्टींचा तीव्र अनुभव घेतात.
५) या आजारामुळे त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्यपणे जगता येत नाही. भूक न लागणे, एकटे पडणे, निरुत्साह वाटणे, कमी किंवा काहीच न बोलणे इ.
कारणे :
१) सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अबोध मनातील दडलेल्या इच्छा, आकांक्षा, भितीदायक अनुभव, वेदना, दु:ख, क्लेशकारक भावना या गोष्टींची मात्रा अपेक्षेपेक्षा वाढल्यास ताण वाढून व्यक्तीला भितीदायक स्वप्न पडतात.
२) लहानपणापासून जर सभोवतालीन वातावरणात दोष असल्यास त्याचा परिणाम पुढे मानसिक आजार होण्यावर होतो.
३) अनुवांशिकतेमार्फत हे भितीदायक रसायन एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होवू शकते.
फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)