फुलणं आणि कोमेजणं ही एक निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
फुलणं आणि कोमेजणं ही एक निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणजेच काय तर ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. आज फुलणारी प्रत्येक गोष्ट कधीतरी कोमेजणारच आहे. आणि हे सत्य आपल्या सर्वाना माहित असत, पण ते आपण कितपत स्वीकारतो? जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला ते मान्य च असत.
पण आपण जेव्हा आपले आप्त गमावतो तेव्हा मात्र खूप अस्वस्थ होतो, अनेक प्रश्न पडतात, या माणसाची खरंच ही योग्य वेळ होती का जाण्याची? वय तरी होत का त्याच? देव/ निसर्ग इतका क्रूरपणा का करतो?
आता याच खरं उत्तर निसर्ग किंवा देव ह्यांनाच माहित असावं. पण माझ्या मते, प्रत्येक माणसाची किंवा जीवाची जशी जन्म घेण्याची किंवा फुलण्याची वेळ ठरलेली असते तशीच कोमेजण्याची किंवा जगाचा शेवटचा निरोप घेण्याची ही ठरलेली असावी. खूप माणसं जगायचं सोडून मरण्याची भीती घेऊन बसलेली दिसतात.
प्रत्येक फुललेल्या फुलाला कधीतरी कोमेजून जावंच लागत पण तरीही ते प्रसन्न आणि उंच मानेन बहरत राहत जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते नेहमी फुलत राहत आणि एक दिवस कोमेजून जात. पण फुलण्याच्या प्रक्रिये पासून ते कोमेजेपर्यंत आणि कधी कधी त्यानंतर ही त्याचा सुगंध हा दरवळत राहतो. त्या फुलाला बघून, त्याचा सुगंध घेऊन नेहमी आपल्या मनाला तजेला मिळतो, मन प्रसन्न होऊन जाते.
एक दिवस आयुष्य असलेलं फुल देखील किती तरी काम करून जात, कधी कोणाच्या केसांत माळल जात तर कधी देवाच्या पायाशी राहून आपला सुगंध दरवळत राहत. पण आपण मात्र जिवंत असताना जगायचं सोडून मरण्याची भीती, काळजी किती काय काय गोष्टींची पर्वा करत बसतो. मरण येईल तेव्हा येईल हो, जिवंत आहोत तर थोडं जगून ही बघूया की!
मनमुराद जीवनाचा आनंद लुटुयात, कारण खरंच खूप मौल्यवान असत हे आयुष्य, त्याला असं काळजीत आणि भीतीत वाया घालवण्यापेक्षा आपल्याही आयुष्याचा सुगंध जरा दरवळून बघुयात.. म्हणजे आपण जाऊ तेव्हा मूर्ती नाही पण कीर्ती तरी मागे ठेवू शकू..!
कळ्यांची फुल होतात, ती फुलतात-बहरतात आणि एक दिवस कोमेजून जातात. निसर्गाचा तो जणू नियम च आहे. तसेच माणूस असो किंवा इतर कोणताही प्राणी त्यालाही बाल्य अवस्था, तारुण्य आणि अखेर वृद्ध अवस्था ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे अविभाज्यच आहे. पण तरीही प्राणी आणि माणूस किंवा फुले आणि माणूस यांत जमीन अस्मानाचा फरक बघायला मिळतो.
तो असा की, फुल असो किंवा इतर कोणताही प्राणी, पक्षी, किंवा अगदी किड्या मुंग्या यांचं निरीक्षण केल्यास असं लक्षात येईल की हे सर्वजण त्यांना निसर्गाने दिलेली कामे म्हणा किंवा त्यांची जीवन जगायची एक पद्धत म्हणा, हे नियमितपणे करत राहतात. उद्या आपण कोमेजणार मग आज का म्हणून फुलायचं असा विचार फुले करत नाहीत, उद्या एखाद्याच्या पायाखाली येऊन आपण चिरडले जाऊ शकतो या विचाराने मुंगी चिकाटीने अन्न जमवण्याचं तीच काम सोडत नाही.
पण माणूस मात्र असंख्य विचारांनी, प्रश्नांनी घेरलेला दिसतो. निसर्गाचे अनेक नियम तो मोडत असतो आणि ज्याला जीवन आहे त्याला एक दिवस मरण ही स्वीकारावं लागत हा नियम सुद्धा त्याला मान्य नाही असं म्हणाल तरी गैर ठरणार नाही. कारण मृत्यू अटळ आहे हे जरी त्याला माहित असल तरी कोणी ह्या जगाचा शेवटचा निरोप घेतल्यास त्याला असंख्य प्रश्न असतात.. देवाने याला आत्ताच का नेलं? किंवा कधी कधी माणसे आपला कोणीतरी दूर गेल्यावर त्याचा दोष ही देवाच्या माथी मारताना दिसतात.
म्हणजे हे असं होतंय, की आपल्याला माहितीए की मृत्यू हा अटळ आहे तरी त्याबद्दल आपल्याला तक्रारी असतात. म्हणजे प्रत्येकाच्या मतानुसार प्रत्येकाची मृत्यूची एक ठराविक वेळ योग्य असावी पण निसर्ग माणसांनुरूप चालत नाही आणि इथे तर माणसं तरी निसर्गानुरूप कुठे वागतात ?
जवळचा माणूस गेल्यावर त्रास होणं, दुःखी होणं यांत चुकीचं असं काहीच नाही, किंबहुना ते खूप स्वाभाविक आणि साहजिकच आहे. पण असा विचार करून बघा की आपला जवळचा कोणीतरी अमेरिकेला गेलाय आणि आपण इथे बसून सतत त्यांना परत ये , का च गेलास, जायला नको होत, असे संदेश पाठवतोय खूप सारा त्रास करून घेतोय स्वतःला..
तर तुम्हाला काय वाटत, त्या अमेरिकेला गेलेल्या माणसाला तिथे बैचेन नाही वाटणार? तो अस्वस्थ नाही होणार? नक्कीच होणार. तसेच जेव्हा माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा आपण जो त्रास करून घेतो, जितका करून घेतो आणि जे काही काही बोलतो ते सगळं त्या माणसापर्यंत म्हणजेच आत्म्या पर्यंत जात असत त्याला किती वाईट वाटत असेल आपल्या जवळच्या माणसांना असं बघून? एक वेळेस अमेरिकेला गेलेला माणूस परत येऊ शकतो, फोन करून तुमच्याशी बोलू शकतो पण जगाचा निरोप घेतलेल्या माणसाकडे ती सोय ही नसते.
त्यामुळेच दुःख, त्रास कितीही झाल तरी एकदा गेलेल्या माणसाला चांगल्या मनाने त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेछया देणं आणि आपलं प्रेम, आणि सकारात्मक भावना त्याला अर्पण करणं किती योग्य असेल नाही! माफ करा, मला इथे कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. प्रत्येकाची दुःख, संकटे आणि सगळं जीवनच हाताळायची, त्याला सामोरं जायची एक वेगळी पद्धत असते पण तरी एकदा ही गोष्ट करून बघा त्यांच्या पर्यंत तुमचे संदेश पोचतायेत याचा कदाचित तुम्हाला पुरावा मला देता येणार नाही पण तुम्हाला ते करून कस वाटतंय याकडे नक्की लक्ष द्या.
एक गोष्ट सांगावीशी वाटतीये ती म्हणजे, माझे आजोबा नेहमी आम्हाला सांगायचे की मी गेलो ना की कोणीही रडू वगैरे नका, ते घरात गोड-धोड न करणे, वर्षभर सनसुद साजरी न करणे असलं काहीही करू नका, उलट मला हसतमुखाने, आनंदाने निरोप द्या, पुढच्या वाटचालीसाठी. तुमच्या सगळ्यांचे हसरे चेहरे बघून मला इथून जायला आवडेल.
तेव्हा खरंच खूप विचित्र वाटायचं हे ऐकून एक तर लहान असल्यामुळे फार कळायचं नाही पण माणसं गेल्यावर साधारणपणे रडणं, दुःख करणं, आक्रोश करणं याच गोष्टी बघायला मिळतात. फक्त गेलेल्या दिवशीच नाहीतर जवळपास किती तरी दिवस, महिने, वर्ष माणसं त्रास करून घेताना बघायला मिळतात.
त्यामुळे एवढंच म्हणेन की जीवन आहे तोपर्यंत ते कस फुलवता येईल हे बघा.. कोमेजण्याची भीती मनात न धरता मनसोक्त फुलण्याचा आनंद घ्या..कोमेजणं हे तर अपरिहार्यच आहे पण फुलणं आणि बहरन ही मात्र आपली निवड असू शकते..! त्यामुळे आहे ते आयुष्य भले छोटंसं का असेना पण अगदी दिलखुलासपणे, मनापासून आणि मनमुरादपणे जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला