Skip to content

” लग्न म्हणजे शेवटपर्यंत नुसती compromise?? “

” लग्न म्हणजे शेवटपर्यंत नुसती compromise?? “


मधुश्री देशपांडे गानू


“शादी का लड्डू जो खाये वो पछताये..

जो ना खाये वो भी पछताये….”

बरोबर ना!  जन्म, लग्न आणि मृत्यू या तीन गोष्टी आपल्या हातात नसतात, असं म्हणतात. लग्न म्हणजे स्वर्गात मारलेल्या गाठी अशी ही म्हण प्रचलित आहे. पण बहुतेक वेळा या गाठी विजोडच असतात, असं दिसत आपल्याला. अगदी काही पती-पत्नी तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे असतात. पण  “opposite attracts” म्हणतात ना! तसंच एकमेकांमध्ये काहीही कॉमन नसतानाही बहुसंख्य संसार तथाकथित यशस्वीपणे सुरू असतात. सगळ्या सांसारिक जबाबदार्‍या नीट सांभाळून.

खरंतर लग्न ही अत्यंत तुमच्या आयुष्यावर आमूलाग्र परिणाम करणारी घटना आहे, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक सर्व स्तरांवर.. आपल्याकडे तर लग्न संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामाजिक, कौटुंबिक स्थैर्य, मान यामुळे मिळतो.

आज आधुनिक काळातही प्रेम लग्न होत असली तरीही ठरवून केलेली लग्न ही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एका लग्नामुळे फक्त नवरा-बायको जोडले जात नाहीत तर दोन कुटुंबं कायमस्वरूपी एकत्र येतात. समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजही केवळ पालकांची इच्छा आणि  त्यांनी ठरवलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करून संपूर्ण आयुष्य काढणारी मंडळी आहेत.

आता लग्न म्हणजे शेवटपर्यंत नुसती कॉम्प्रोमाइज का?? तर उत्तर आहे “हो”. आज या लेखात आपण फक्त ज्या जोडप्यांना लग्न टिकावं, यशस्वी व्हावं, आयुष्यभर जोडीदाराची साथ असावी अशा मानसिकतेच्या जोडप्यांचाच विचार करणार आहोत. ज्यांचं पटत नाही ते लगेच वेगळे होऊन मोकळे होतात. तर लग्न ही एक तडजोड आहे का? तर नक्कीच आहे.

मुळात कोणतंही नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, त्या नात्यातील व्यक्तीला तुमच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असेल तर तुमची तडजोड करण्याची मानसिकता तयार होतेच. इथे आपण सकारात्मक मानसिकतेने पाहू. अगदी मनाविरुद्ध लग्न झालं तरीही आपण चोवीस तास एकत्र राहिल्यामुळे सहवासाने आपुलकी, प्रेम वाटू लागतं. आणि हळूहळू सुरुवातीला तडजोड म्हणून पण नंतर आवडीने संसारात, आपल्या हक्काच्या व्यक्तीमध्ये आपण रमतोच ना!

अगदी कोणत्याही नात्यात तुम्हांला तडजोड करावीच लागते. जन्मदाते आई-वडील असतील तरीही आपलं नेहमीच कुठे त्यांच्याशी पटतं? कधीतरी वाद, मतभिन्नता, आवड-निवड असतेच. पण ते नातं आणि ती व्यक्ती ही आपल्यासाठी प्रेमाची असल्यामुळे आपण समंजसपणे वाद मिटवून नातं टिकवून ठेवतोच ना! भावंडाचं कुठे नेहमी पटतं एकमेकांशी? रक्ताची नाती असूनही या नात्यात विसंवाद होतातच. मग नवरा-बायको हे तर चिकटवलेलं नातं.. रक्ताचं नसूनही सगळ्यात जवळचं, कोणताही आडपडदा नसलेलं नातं!

लग्नानंतर एकूणच एकमेकांचे स्वभाव, संस्कार, निर्णयक्षमता, मानसिकता, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक स्तर अशा अनेक गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असतेच. खुपदा आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी आपण आपल्या मानून घेतो. अगदी साध्या, छोट्या  गोष्टी आपण जोडीदाराच्या आवडीनुसार करतो. मग ही तडजोडच आहे ना!

लग्नामुळे अनेक नातलग जोडले जातात. काही नातलगांशी आपलं नाहीच पटत. पण आपण आपल्या जोडीदाराचा सन्मान म्हणून नातलगांचा ही मान राखतो. “कधी तू समजून घे, कधी मी समजून घेईन” इतक्या सहजतेने तडजोड करता येतेच. आज बहुतेक सगळ्या कुटुंबात एकुलती एक मुलगा किंवा मुलगी असते. अशावेळी दोघांच्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी सांभाळण्याची जबाबदारी दोघांचीही समान असते. आज अनेक जोडपी दोन्ही आई-वडिलांना समर्थपणे सांभाळताना दिसतात.

फक्त ही नातं टिकवण्याची, फुलवण्याची भावना दोन्हींकडून हवी. पती-पत्नी हे नातं समान पातळीवर हवं. कोणतंही नातं आयुष्यभर निभवायचं असेल तर तडजोड करावीच लागते. मग जर तडजोड करावी लागणारच आहे तर मनाविरुद्ध का करायची?? त्याचा त्रास, त्याचं guilt का वाटून घ्यायचं? आपल्या जोडीदाराचा, वास्तवाचा मनापासून स्वीकार करून हीच तडजोड आपण मनापासून आणि आनंदाने केली, तर आपल्याला तर समाधान मिळतंच पण समोरच्या व्यक्तीलाही आनंद मिळतो.

कोणत्याही नात्यामध्ये प्रेम, विश्वास, एकमेकांबद्दल आदर, एकमेकांच्या मतांचा सन्मान आणि स्वीकार, स्पेस देणं या महत्त्वाच्या बाबी आहेत. कित्येक स्त्रिया मुलं झाल्यानंतर यशस्वी करियर सोडून मुलांच्या संगोपनासाठी पूर्णवेळ देतात. ही तडजोड आहे, पण मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक आहे ना! कित्येक पुरुष स्वतःच्या आवडीनिवडी, छंद कायमचे बाजूला सारून फक्त पैसा कमवायचं मशीन आणि सांसारिक जबाबदाऱ्या, कर्तव्य निभावणारा बनून जातात. हा त्याग फार महत्त्वाचा आहे संसार यशस्वी होण्यासाठी.

संसाराच्या एका विशिष्ट टप्प्यावर जेव्हा बहुतेक जबाबदार्‍या, कर्तव्य पूर्ण होतात, त्या वेळी नक्कीच पती-पत्नीने आता स्वतःच्या छंदा साठी, आवडीसाठी तडजोड न करता वेळ द्यायला हवा. विस्मरणात गेलेल्या आवडीनिवडी जपायला हव्यात. म्हणजे या टप्प्यावर स्वतःच्या मनासारखे ही जगता येईल. उदाहरणार्थ. ८० वर्षांच्या आजी आहेत. नातीला भरतनाट्यमच्या क्लासला घातले. स्वतःला नृत्याची खूप आवड असल्यामुळे स्वतःही शिकायला लागल्या. आज या वयातही उत्तम नर्तिका आहेत, ज्याचा त्यांच्या यजमानांना सार्थ अभिमान आहे.

पती-पत्नी हे नातंच अस आहे, “तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना”. या नात्यात काहीवेळा स्वतःला पूर्ण विसरून सर्वस्व द्यावं लागतं. एकमेकांसाठी स्वतःला बाजूला ठेवून आपल्या प्रेमाचा माणसासाठी काही गोष्टी आवर्जून करणं, तेही आनंदाने मग ती तडजोड उरतेच कुठे?? तडजोडी कडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जे करायचं आहे ते मनापासून करा. त्यातही आनंद मिळतो. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी तडजोड करावीच लागते. फक्त एका टप्प्यावर ही तडजोडच आवड बनून जाते. आयुष्यभराच्या सहजीवनासाठी, आपल्या प्रेमाच्या जोडीदारासाठी….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “” लग्न म्हणजे शेवटपर्यंत नुसती compromise?? “”

  1. Khup khup chaan manapasun awadla tumcha lekh yes very true I wish u all the best ani aajun chaan ase lekh send kara

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!