Skip to content

सत्र विसावे :- रागावर नियंत्रण नसणे (Intermittent Explosive Disorder)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र विसावे :- रागावर नियंत्रण नसणे (Intermittent Explosive Disorder)


हा मानसिक आजार Impulse Control Disorder चाच एक प्रकार आहे. Impulse म्हणजे एकाकी उत्पन्न झालेली प्रबळ इच्छा. या आजाराने त्रस्त व्यक्तीचा स्वतःच्या इच्छांवर ताबा नसतो. अशा व्यक्ती क्षणिक भावनावेगानुसार वागतात. स्वतःच्या इच्छांवर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. अगदी तसेच IED (Intermittent Explosive Disorder) ने त्रस्त असलेली व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. सभोवताली सामान्य स्थिती असूनही अशा व्यक्तींची आक्रमकता, रागाची तीव्रता व राग व्यक्त करण्याची पद्धत यांमध्ये अपसामान्यत्व आढळून येते. म्हणजेच छोट्या-छोट्या कारणांवरून चवताळून उठणे, मारहाण करणे, वस्तूंची नासधूस करणे असे प्रकार दिसून येतात. यादरम्यान अनियंत्रित आक्रमकता, राग याबरोबरच काही शारीरिक लक्षणेही अनुभवास येऊ शकतात. जसे की, घाम येणे, छातीत आवळल्यासारखे वाटणे, स्नायू आखडणे, छातीत धडधड होणे इ.


केस :-

राजेश वय वर्ष २८, एकुलता एक, लहानपणापासून अत्यंत लाडावलेला व आईच्या अगदी जवळ असलेला मुलगा. त्याचे वडील अगदी सौज्वळ व चौफेर विचार करून निर्णय घेणारे गृहस्थ. परंतु राजेशला वडिलांचे सानिध्य फार कमी लाभले असल्या कारणाने आईच्या आक्रमक भावनावेगात राजेशचे व्यक्तिमत्व घडत आलेले आहे. राजेशला हवी ती गोष्ट मिळण्याची इतकी सवय जडली आहे की आता या तरुणपणी मात्र त्याचा हा त्रास भयंकर वाढतो आहे आणि तो त्रास अवास्तव रागाच्या स्वरुपात व्यक्त होतो आहे. खरतर राजेश ३ वर्षाअगोदर धनश्री नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. अत्यंत टापटीप, बोलण्यात नेमकेपणा, दिसायला आकर्षक त्याच्या या वरवरच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे कोणत्याही मुलीला तो हवाहवासा असा आहे. परंतु या ३ वर्षाच्या प्रवासात धनश्रीलाही कळून चुकले आहे की कोणतीही मुलगी राजेश सोबत सुखी वैवाहीक जीवन जगू शकत नाही आणि आज धनश्री आपल्याला सोडून जाईन, या भावनेने त्याचा संताप टोकाकडे जाऊन विनाकारण तो घरी, कामाच्या ठिकाणी, रेल्वेत प्रवासाच्या वेळी इतरांवर चिढायला लागलाय, मारहाण करायला लागलाय, शिव्या द्यायला लागलाय. एकंदरीत त्याच्या रागावर त्याचे नियंत्रण आता पूर्ण सुटले आहे. त्यादिवशी तर रस्त्यावर चालत असताना दोन व्यक्तींची आपआपसातील भांडने पाहून त्याचे मनातील नियंत्रण सुटून तो इतरांना वस्तु व दगड मारायला लागला, जोरजोरात ओरडायला लागला. कालांतराने मनातील भावनावेग शांत झाल्यावर प्रचंड पच्छातापाची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. आज राजेश २८ वर्षाचा असून त्याच्या आजाराने टोकाकडील लक्षणे धारण केलेली आहेत. त्याच्या या आजाराने त्याच्याकडून नोकरी, मित्रपरीवार आणि धनश्री या अतिमहत्वाच्या गोष्टी हिरावून घेतल्या. तरी देखील धार्मिकतेने बुरसटलेल्या त्याच्या आईचे तंत्र-मंत्र सारखे नादान उपक्रम आता तरी थांबतील का ? जर थांबले नाही आणि त्याच्यावर शास्त्रीय उपचार सुरु झाले नाही, तर Mood Disorder आणि Depression सारख्या भयंकर मानसिक आजारांना राजेश बळी पडण्याची दाट शक्यता आहे, हे आता तरी त्याच्या आईला उमजेल का ? कोण जाणे !


लक्षणे :-
१) या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचा स्वतःच्या रागावर तर नियंत्रण नसतेच, परंतु मनातील भावनावेग दाटून आल्यास कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी ते हिंसाचारात्मक वर्तन करताना आढळून येतात.
२) मनातील भावनावेग कालांतराने शांत झाल्यावर सामान्य अवस्थेत तीव्र पश्छातापाची भावना त्यांच्या ठिकाणी आढळून येते.
३) तसेच भावनावेगा दरम्यान घाम येणे, हृदयाची धडधड प्रचंड वाढणे, स्नायू आखडणे, डोके जड झाल्यासारखे वाटणे इ. लक्षणे प्रकर्षाने जाणवतात.
४) या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींची हिंसात्मक कृत्ये ही पूर्वनियोजित नसतात, म्हणजेच अमुक व्यक्तीवर हल्ला करायचा, मारहाण करायची किंवा अन्य प्रकारे नुकसान करायचे ही काही ठरवून केलेली हिंसा नसते.


कारणे :-
१) या आजाराची पाळेमुळे ही लहानपणापासूनच्या संगोपणामध्ये रुजलेली असू शकतात. संगोपन हे जर सदोषयुक्त असेल तर असे आजार होण्याची शक्यता वाढते.
२) अनुवंशिकतेमार्फत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हे आजार संक्रमित होतात.
३) तसेच मेंदूतील काही रसायनांची कमतरता आणि मेंदूतील amygdala या भागातील बिघाड ही शारीरिक पातळीवरील IED ची महत्वाची कारणे आहेत.


उपचार :-
१) प्रथमतः या आजाराची सुव्यवस्थित माहीती कुटुंबियांना देऊन उपचाराची दिशा काय असेल आणि या परिस्थितीला कुटुंबियांनी कशा पद्धतीने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे, याबद्दल त्यांचे समुपदेशन केले जाते.
२) व्यक्तीला तिच्या ठिकाणी तीव्र राग येणाऱ्या घटना, व्यक्ती किंवा वस्तू यांची यादी तयार करायला सांगून त्याचा वास्तवतेशी काय ताळमेळ आहे, याबद्दल तार्किक विचार करण्यास प्रोत्साहीत केले जाते.
३) Anger Management ची तंत्रे शिकवून प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी उत्तेजीत केले जाते, यावर मानसशास्त्रज्ञ काटेकोरपणे देखरेख ठेवत असतो.
४) तसेच मेंदूतील रसायनांची कमतरता भरून काढण्यासाठी काही औषधोपचारांचाही उपयोग करता येऊ शकतो.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते.

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !

5 thoughts on “सत्र विसावे :- रागावर नियंत्रण नसणे (Intermittent Explosive Disorder)”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!