बंधनात ठेवल्याने बायको जास्त हट्टी होते.
हर्षदा पिंपळे
बंधनात ठेवल्याने बायको जास्त हट्टी होते…..आता हे कुणी ऐकलं तर त्यांना मुळातच हास्यास्पद वाटेल. कारण कित्येकजण म्हणत असतील की बंधनं वगैरे काही नाही….” कितीही काहीही करा पण बायको ही हट्टीच असते”.
खरच इतकी हट्टी असते का बायको….? कित्येकजण नक्कीच हो म्हणतील…की , “हो बायको ही जास्तच हट्टी असते..तिच्यापुढे कुणाचही काही चालत नाही…तिच्या या हट्टी स्वभावापुढे आम्हालाच नतमस्तक व्हावं लागतं”. पण खरं सांगायच झालं तर (काही अपवाद वगळता) मुळातच माणसाचा स्वभाव हा हट्टी असतो.त्यामुळे त्या अशा हट्टी स्वभावापुढे सहसा स्वतःलाच माघार घ्यावी लागते.
आता विषय बायकोबद्दल चाललाय म्हणून ठीक आहे पण नवरेही तसे बरेच हट्टी असतात. कधी कधी बायकोलाच त्या हट्टापुढे दोन हात टेकावे लागतात.
बंधन……बंधनात ठेवल्याने बायको जास्त हट्टी होते../? तर…..काही जण म्हणतील तिला त्यासाठी बंधनात ठेवायची काही गरज नाही.. ती अशीही हट्टीच असते.
लग्नाआधी आणि लग्नानंतरही तिच्यावर अनेक बंधनं असतात. आता लग्नानंतर तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं असतात. आणि तरीदेखील त्या बंधनात ती तिचा संसार सुखाचा करताना दिसते.काही ठिकाणी मात्र ती स्त्री बंधनं झुगारुन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते.
हल्ली कुणी कुणावर सहसा बंधनं लादत नाही. कारण प्रत्येक जण स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करतो.पण काही अंशी काही ठिकाणी बायकोवर अनेक प्रकारची बंधनं असतात असं प्रकर्षाने जाणवते. इतकच नाही तर कुणावर कशाच बंधन असेल हेही लवकर सांगता येत नाही. पण बायको मात्र या बंधनात गुरफटून जाताना दिसते.
अशी कितीतरी उदाहरण आपल्या आजुबाजुला सहज निदर्शनास येतात.तिच्या पोशाखापासून ते तिने बाहेर जाण्यापर्यंत तिच्यावर वेगवेगळी बंधनं तिच्या नवऱ्याने घातलेली असतात.” तु बाहेर जाताना साडीच नेसायचीस…आणि हो फक्त भाजी मंडई पर्यंतच जायच…तिथून सरळ घरी यायच…मित्र-मैत्रिंनींसोबत जरा कमीच जायच…”अशा विविध प्रकारच्या बंधनांमध्ये ती गुंतलेली आपण पाहतो. ही झाली थोडी नकोनकोशी वाटणारी बंधनं…. हां काही अपवाद याला आहेतही… काही नवरे आपल्या बायकोला अगदी मोकळेपणाने वावरण्याची मुभा देतातही.
पण नकोनकोशी वाटणारी जशी ही बंधनं आहेत तशीच काही अगदी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची सुद्धा बंधनं असतात.जसं की….” माझी वाट पाहत बसण्यापेक्षा वेळेवर जेवायच म्हणजे जेवायच…उशीरापर्यंत जागायच नाही… बरं नाही वाटलं तर डॉक्टरकडे जायचच….नाही वगैरे काही नाही….” अशी ही प्रेमाची बंधनं बायकोला हवीहवीशी वाटतात. पण अनेकदा या दोन्ही बंधनांमुळे(काही अपवाद वगळता) बायको अधिकाधिक हट्टी होत जाते.ती जे करायला नको ते करायचच असा हट्ट धरते. नकोनकोशा वाटणाऱ्या बंधनांना झुगारलेल ठीक आहे. पण हवीहवीशी वाटणारी ती बंधनं जर बायकोवर असली तर ती तिच्यातील लहान मुल जागं करून हट्टाला पेटते.”हे असच आहे…मी हेच करणार…” हा तिचा हट्टी स्वभाव म्हणजे अगदी कहर वाटतो.
दिवसागणिक ती हट्टी बनत जाते. तिच्यावर बंधनं असली काय नी बंधनं नसली काय….ती तिचा हट्टी स्वभाव सोडायला अशी सहजासहजी तयार होत नाही.”माझच खरं” हा बायकोचा हट्टीपणा अक्षरशः तासनतास तग धरून राहतो.म्हणजे पहा किती तो हट्टीपणा…!
बायकोचा हट्ट म्हणजे एक अवघड काम असावं. “मला काही सांगायच नाही.. मी ते अजिबात ऐकणार नाही” आणि ते खरं करून दाखवणारी कदाचित बायकोच असावी. कित्येकदा ती असे हट्ट करते की त्याला काही मर्यादाच नसतात.
कित्येक नवरे बायकोला तिच्या माहेरी जाण्यावर नियंत्रण ठेवायला लावतात. पण बायकोला माहेरी जायच असतं.त्यामुळे कितीही तिच्यावर “माहेरी कमी जा” असं बंधन घातल तरी ती सहज ऐकत नाही. अगदी हट्ट धरून ती माहेरी जाते म्हणजे जातेच.पण तिचा हा हट्ट मात्र तेवढा नक्कीच पटण्यासारखा आहे.कारण माहेर तिच असतं..तिने माहेरी कितीदा जायच कितीदा नाही हे कदाचित तिच ठरवू शकते.तिच्यावर कोणी असं नियंत्रण किंवा बंधन आणू शकत नाही.
पण खरं सांगायच झालं तर हट्टीपणा आणि बंधन…ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटतात. आणि ह्या गोष्टी खर तर ज्या त्या गोष्टीवर “Depend” करतात.कारण बंधनं ही मानवानेच तयार केली आहेत आणि हट्टीपणा हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यामुळे हा हट्टीपणा कमीही होऊ शकतो किंवा जास्तही होऊ शकतो.किंवा त्याबद्दल असं खात्रीशीर काय होऊ शकतं हे मात्र सांगता येणं अशक्य..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


