“संभोगाशिवाय वैवाहिक नातं खरंच आनंदमयी होऊ शकत नाही का??”
मधुश्री देशपांडे गानू
पुन्हा एकदा याच महत्त्वाच्या विषयावर लिहायचं आहे. आता तुम्हीं म्हणाल खरंच हा विषय इतका महत्त्वाचा आहे का?? कधीही घरात, समाजात कुठेही या विषयावर बोललं जात नाही. मित्र-मैत्रिणींमध्ये चोरट्या पद्धतीने हा विषय फक्त चघळला जातो. पती-पत्नी या नात्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या गोष्टी बद्दल तर कोणीच बोलत नाही. अन्य फापटपसारा महत्त्वाचा वाटतो आपल्याला. वैवाहिक जीवन सुखाचे न होता फक्त तडजोड राहते बहुसंख्य लोकांची. किंवा नातं संपतं. तरीही त्याच्या या मूळ कारणाकडे मात्र आपण लक्ष देत नाही. अत्यंत गरजेचा तरीही नाजूक, चर्चिला न जाणारा विषय आहे हा.
मुळात नवरा-बायको हे नातंच या पायावर उभं आहे. वैवाहिक जीवन यशस्वी पणे निभावण्यासाठी अनेक पैलू गरजेचे आहेत. कौटुंबिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक असे अनेक.. या सगळ्या कसोट्या पार करतच नवरा-बायको हे नातं दृढ होत असतं. पण “स्वास्थ्यपूर्ण शारीरिक संबंध हाही एक खूप महत्त्वाचा आणि नात्यावर चांगला-वाईट परिणाम करणारा पैलू आहे आयुष्याचा.” हे किती लक्षात घेतलं जातं??
लग्नानंतरची सुरुवातीची वर्षे बरी जातात. कारण शारीरिक आकर्षण, ओढ असते. मग मुलांचा जन्म, त्यांचे संगोपन, जबाबदाऱ्या, कर्तव्य या सगळ्या धबडग्यात हा नात्याचा पायाच हरवून जातो. आजही शारीरिक संबंध हे फक्त मुलांना जन्म घालण्यासाठीचे कार्य आहे अशी ठाम समजूत आपल्या समाजात आहे. मग फक्त कर्तव्य म्हणून हे नातं निभावलं जातं. अत्यंत कोरडेपणाने. बहुतेक जोडप्यांमध्ये हेच घडतं. आणि अत्यंत वैयक्तिक बाब असल्याने त्याची वाच्यताही होत नाही. सुखी, आनंदी जोडपी असल्याचा देखावा आपल्याला छानच करता येतो, नाही का!
संभोगाशिवाय वैवाहिक नातं खरंच आनंदमयी होऊ शकत नाही का? तर उत्तर आहे “नाही”. पती-पत्नीचं नातं कायमस्वरूपी विश्वासाचं, प्रेमाचं, आनंदाचं होण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त हेच महत्त्वाचं आहे का मग? तर नाही. नातं दृढ करण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे. यामुळे नंतर उतारवयातही शारीरिक गरज आणि ताकद कमी झाली तरीही प्रेमामुळे हे नातं अधिक दृढ, सौख्याचं होतं.
अगदी नैसर्गिक आणि मानसिक सहजतेने आपण संभोगाचे फायदे पाहू.
१) अत्यंत आनंददायी अशी ही गोष्ट जोडप्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी रुजवण्यास मदत करते. शब्दांविना आपलं प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचं हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.
२) एकत्र असण्याची, अद्वैत असण्याची भावना पती-पत्नीत असणे आवश्यक आहे. या एका गोष्टीमुळे तुमच्यातील “bonding” टिकून राहतं. छोटे मोठे गैरसमज, वाद त्यामुळे मिटतात. तुम्हीं पुन्हा नव्या उत्साहाने एकत्र येता.
३) तुमचं पति-पत्नी या नात्याचं आयुष्य याने द्विगुणीत होतं, वाढतं, कायम राहतं.
४) तुमचे दिवसभरातील घरगुती, नोकरी व्यवसायातील ताण तणाव दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे माध्यम आहे.
५) शारीरिक गरज म्हणून हा संबंध प्रस्थापित होत असला तरीही यामुळे तुमचे भावनिक बंध घट्ट, मजबूत होतात.
६) यामुळे तुम्हीं तुमच्या जोडीदारासाठी विश्वासार्ह राहता. कधीकधी पती-पत्नीच्या नात्यात तोचतोचपणा येतो. पण या एका गोष्टीमुळे तुमच्या नात्यातील सातत्य, ताजेपणा टिकून राहतो. तुमचं लक्ष फक्त या एकाच नात्यात केंद्रित राहतं.
७) तुमचं जोडीदारा प्रति असलेले प्रेम, काळजी या माध्यमाद्वारे तुम्ही योग्य पद्धतीने व्यक्त करू शकता.
८) संभोगाचे अनेक शारीरिक फायदेही आहेत.
शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते. उत्तम झोप मिळते. आनंददायी संप्रेरके स्रवतात, ज्याने तुम्हाला छान वाटू लागतं. उत्साही, आनंदी वाटतं. दिवसभराच्या ताण-तणावांना तुम्ही अधिक सामर्थ्याने सामोरे जाता. “Cardio workout” केल्याचे फायदे मिळतात. हृदयाचे कार्य उत्तम राहते. अनेक छोट्या-मोठ्या शारीरिक तक्रारी दूर होतात.
९) याचे मानसशास्त्रीय फायदेही आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढतो. स्वाभिमान दुणावतो. तुम्हांला आनंदी वाटतं. तुमच्या नात्यात जिव्हाळा वाढतो. नैराश्य, ताण-तणाव यावर तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा उंचावतो. एकमेकांप्रती प्रेम, आदर, विश्वास, समजून घेण्याची क्षमता वाढीस लागते. तुम्हांला एका सुरक्षित नात्यात असल्याची जाणीव होते, जी समाधान देणारी असते.
संभोग हा तुमच्या नात्याचा उत्सव (celebration) असायला हवा. म्हणजे बाकी सर्व आयामांसह तुमचं पती-पत्नीचं नातं, वैवाहिक जीवन अधिक दृढ, कायम, विश्वासार्ह, प्रेमाचं आणि आनंदमयी होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख खुप छान आहे
लेख आवडला
छान लेख