Skip to content

सासरी सुद्धा आई-वडिलांसारखं प्रेम मिळू शकतं, फक्त…

सासरी सुद्धा आई-वडिलांसारखं प्रेम मिळू शकतं, फक्त…


मयुरी महेंद्र महाजन

पुणे


स्त्री जन्माची कहानी ही प्रत्येक स्त्रीसाठी काही अर्थी विचार करायला भाग पाडणारी असते एक ऊंबरठा माहेरचा आणि दुसरा सासरचा या दोघांमध्ये जीव अडकलेला उभा जन्म बाईचा पूर्वीच्या वेळी स्त्रीचे जग चूल आणि मूल यामध्ये अडकलेले होते आता मात्र स्त्री चूल आणि मूल हे असले तरी ते पदराशी बांधून अवकाशात भरारी घेऊन स्वतःचे एक अस्तित्व तयार करत आहे तरी सर्व स्त्रियांना ही संधी मिळते असा याचा अर्थ होत नाही.

सासर म्हणजे सासुरवास आणि माहेर म्हणजे मायेचं घरटं ही संकल्पना प्रत्येक स्त्रीच्या मेंदूत नकळतच कोरली जाते म्हणून जेव्हा ति स्त्री सासरी नांदायला येते तेव्हा नकळत ती आपल्या कोरलेल्या मानसिकतेला अजून दुजोरा देत जाते आणि दुजोरा दिल्याने त्या स्त्रीच्या मानसिकतेत असलेली ती धारणा पक्की होत जाते आणि सासरची लोक आपल्यावर प्रेमच करत नाही असे तिला वाटू लागते…

प्राणी आणि पक्षाला जर मायेनं जवळ घेतलं त्यांना प्रेम दिलं, आपल्या मायेची ऊब दिली, जिव्हाळा दिला तर ते प्राणी आणि पक्षी सुद्धा आपण दिसल्यावर आपल्या जवळ येतात त्यांच्या बऱ्याच कृतीमधून ते आपले प्रेम प्रकट करतात मग आपण तर साधी माणस आहोत …हो…. जर एखादे वेळेस आपण कुत्र्याला दगड मारला असेल तर ते जेव्हा आपल्याला बघते तेव्हा नकळत आपल्यावर ती भुंकायला सुरूवात करते.

ही क्रिया आणि प्रतिक्रिया साधी वाटत असली तरी त्यातून खूप मोठा धडा घेण्यासारखे आहे आपण जीव लावला तर समोरची माणसेसुद्धा जीव लावतातच फक्त एक गोष्ट आहे प्रेमाची भाषा मात्र वेगवेगळी असते चाॅकमन यांनी आणि प्रेमाच्या पाच भाषा सांगितलेल्या आहेत ….हो प्रेमाला भाषा असते….. जर माझे लिखाण तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्हाला ते समजते त्याचे एकमेव कारण आहे…. भाषा तसेच जर तुम्हाला दुसऱ्याचे प्रेम समजून घ्यायचे असेल किंवा आपले प्रेम दुसर्‍या पर्यंत पोहोचवायचे असेल तर आपल्याला प्रेमाच्या भाषा माहिती असायला हव्यात…

सासरी सुद्धा आई वडिलांसारखे प्रेम मिळू शकतं गरज आहे फक्त ते ओळखण्याची आपल्या कडून भरपूर चुका झाल्या असतील तेव्हा वेळप्रसंगानुसार आपल्या आईवडिलांची आपण बोलणी ऐकली असेल ….मार खाल्ला असेल …परंतु म्हणून काही ते आपले वैरी आहेत असे आपण म्हणत नाही कुठेतरी आपली वाट चुकू नये आणि आपण पुन्हा तीच चूक करू नये यासाठी त्यांनी आपल्याला शिस्तीत राहण्याचा पाढा सांगितलेला असतो….

मान्य आहे मुलगी म्हणून जगताना आणि सून म्हणून जगताना या दोघांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे आणि असणारच कारण जिथे पद बदललेले तिथे जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये बदलणारच आहे… असे नाही की मोठे झाल्यावर आपल्याकडून चुका होत नाही होतात आणि जोपर्यंत चुका होत नाही तोपर्यंत कळणार तरी कसे की बरोबर काय आहे फक्त प्रयत्न करायचा झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याचा जर आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला रागवल्यावर त्यांच्यावर प्रेम करणे सोडत नाही त्याचप्रमाणे सासरी सुद्धा आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल जर आपल्याला कोणी काही बोलले असेल तर ते आपल्या हितासाठी आहे असे समजावे …..

टिव्ही आणि सिरियल यामध्ये रंगवलेली पात्र हे आपल्याला खरी भासतात आणि सासर असेच असते अशी समजूत बनत जाते..चाॅकमन यांच्या प्रेमाच्या पाच भाषा सांगितलेल्या आहेत… एक – कौतुकाचे शब्द – तुमच्या कुटुंबात तुम्ही एकमेकांशी संवाद साधताना जर तुमच्या प्रेमाच्या माणसांना छोट्या छोट्या गोष्टींचे परंतु महत्वाचे आहे या पद्धतीने कौतुक केले तर ती प्रेमाची भाषा आहे त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे हे त्यांना त्या प्रेमाचा भाषेतून कळते.

दोन -भेटवस्तू देणे -बऱ्याच जणांना जोपर्यंत काही भेटवस्तू मिळत नाही तोपर्यंत त्यांना वाटते की त्यांचे आपल्यावर प्रेमच नाही त्यामुळे त्यांची प्रेमाची भाषा भेटवस्तू आहे त्यांना भेटवस्तू द्या बघा त्यांच्या आणि तुमच्या नात्यात अजून आपुलकी वाढेल तीन – वेळ देणे – काहींना कौतुकही नको, वस्तूही नको परंतु आपला अमूल्य वेळ हवा असतो त्यासाठी आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या माणसांसाठी काही वेळ काढायला हवा.

चार – मदत करणे -स्त्रीला जर बरं नसेल आणि सासू बाईंनी जर चहा बनवून दिला तर त्या स्त्रीला आकाश ठेंगणे वाटते जर कधी स्त्री थकलेली असेल तर नवऱ्याने स्वयंपाकात केलेली मदत त्या स्त्रीसाठी खूप मोठी असते आपली काळजी करणारं कुणीतरी आहे यातचं तिला आभाळभर आनंद असतो .

पाच – स्पर्श -स्पर्शमग तो अडचणीच्या वेळेस फक्त पाठीवर ठेवलेला हात असो किंवा लहान बाळा सोबत घालवलेले काही क्षण असो, नवरा-बायकोच्या नात्यात भरून आलेले डोळे पुसताना नवऱ्याने मिठीत घेणे असो…. स्पर्श ही प्रेमाची सर्वात नाजूक भाषा असते आपल्या जोडीदाराने ती समजणे ही प्रत्येक जोडीदाराची एकमेकांची प्रेमाची आशा असते…

तर मग सांगितलेल्या या पाच प्रेमाच्या भाषे पैकी आपल्या माणसांची प्रेमाची कुठली भाषा आहे हे ओळखा आणि त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न करा बघा आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे परत येते असं म्हणतात सासरी आपण आपल्या माहेरचे प्रेम द्विगुणित करावे आपण फक्त दिले पाहिजे एवढेच….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!