“लेक सासरी गेल्यानंतर लेकीचं आणि आईचं नातं कसं मेंटेन असायला हवं?”
मधुश्री देशपांडे गानू
” लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. ”
आदरणीय बहिणाबाईंची ही कविता. एकाच ओळीत त्यांनी आई आणि मुलीचं नातं सुरेख मांडलं आहे. माय-लेकीचं हे नातं जगावेगळ असतं. आई ही सर्वोत्तम पदवी लाभली असली तरीही आई-मुलगा आणि आई-मुलगी या दोन्ही नात्यांमध्ये आपापली वेगळी गंमत आहे. मुलाला वाढवणारी आई आणि मुलीला वाढवणारी आई दोन्ही भावनिक, मानसिक पातळ्या भिन्न आहेत.
आईच्या कुशीत विसावणारी छोटीशी परी, तिचीच प्रतिमा असणारी पण स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन आलेली असते. लेकीबद्दलची आईची माया खासच असते. मुलगी म्हणून तिची सगळी हौस मौज प्रेमाने करताना एक प्रकारची काळजीही आईच्या मनात असते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलीची खरी मैत्रीण तिची आई आणि आजीच असायच्या. काही मनातल्या गोष्टी सांगायला पहिली हक्काची ठिकाणं होती ही.. लवकर लग्न होऊन सासरी जात असत मुली.
एकदा लेक सासरी गेली की कायमची माहेरवाशीण होत असे. फक्त सणावाराला माहेरी येणारी पाहुणी हीच तिची ओळख उरत असे. पूर्वी सासुरवास ही फार असायचा. मनातून कितीही आईची ओढ, आठवण येत असली, तिला मनातलं सगळं सांगावं वाटत असलं तरीही सहज माहेरी जाणं जमत नसे. सासरच्या मंडळींची परवानगी गरजेची असे. ऊठसूट माहेरी जाता येत नसे त्याकाळी.
आता मात्र सगळेच संदर्भ बदलले आहेत. आज एक तर स्त्रिया उच्चशिक्षित असतात. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, सक्षम असतात. मुलींवर संस्कार करतानाही आई-वडील दोघेही सजग, जागरूक असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल घरटी बहुतेक एकच अपत्य असतं. मग ते जर मुलगी असेल तर अतिशय लाडाकोडात तिला वाढवलं जातं. मुलाप्रमाणेच स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवले जातं. त्यामुळे मुली आत्मविश्वास पूर्ण समर्थ, सक्षम असतात हल्ली. आणि असायलाच हव्यात.
आजची काय किंवा पूर्वीची काय आईचं मन लेकीसाठी कायमच तळमळत असतं. एक अस्पष्टशी काळजीची छाया घेऊन वावरत असतं. तिला आयुष्यभर सुख समाधान लाभू दे म्हणून प्रयत्नशील असतं. कारण शेवटी “कन्या परक्याचं धन.” सासरी तिला कोणताही त्रास होऊ नये, तिचा संसार आनंदाचा व्हावा हीच प्रत्येक आईची इच्छा, प्रार्थना असते.
लग्न होऊन मुलगी सासरी जेंव्हा जाते तेंव्हा दोन कुटुंबे एकत्र येतात. अनेक नवीन नाती जोडली जातात. पण नवीन नाती जोडताना आपली लग्नाआधीची नाती विसरायची नसतात. मागे टाकायची नसतात. आज मुली लग्न ठरताना माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणारा जोडीदार हवा असे स्पष्टपणे सांगतात. पालक ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असतातच. पण तरीही मुलीला आई-वडिलांची काळजी असतेच. त्यांची भावनिक, आर्थिक जबाबदारी तिला घ्यायची असते. यासाठी तिला समजूतदार, योग्य जोडीदार हवा असतो. लग्न झालं तरीही आई-वडिलांशी तिची भावनिक नाळ जोडलेलीच राहणार ना!
एकुलती एक मुलगी असल्याने आईचा सगळा जीव तिच्यात गुंतलेला असतो. अतिशय लाडाकोडात मुलींना वाढवतात हल्ली. पण त्याचबरोबर मुलीला लग्न होऊन सासरी जायचं असतं हा वास्तव विचार लक्षात ठेवून आईने मुलीवर योग्य संस्कार करायला हवेत. मुलीला करिअरिस्ट करताना तिला घरकामाची, स्वयंपाकाचीही सवय हवीच.
अर्थात ती आजकाल मुलांनाही हवीच. मुलीच्या मनाची तडजोडीची तयारी हवी. यशस्वी संसार करण्यासाठी आईने मुलीला योग्य कानमंत्र देणे गरजेचे आहे. मुलगी वयात आल्यानंतर तर आई मैत्रीण होते. आई-वडील असोत किंवा एकटी स्त्री पालक असो, मुलीचं लग्न झाल्यावर ही त्यांची मुलीतील गुंतवणूक कमी होत नाही.
खरंतर हल्ली पूर्वीसारखा सासुरवास होत नाहीच. पण मुलीच्या लग्नानंतर मात्र आई आणि मुलीने आपल्या नात्याला स्पेस देणं गरजेचे आहे हे ओळखायला हवं. नात्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात. आज केवळ मुलीच्या आई-वडिलांनी आणि मुलांच्याही आईवडिलांनी दोघांच्या संसारात जरुरीपेक्षा जास्त हस्तक्षेप केल्यामुळे अनेक संसार तुटले आहेत. घटस्फोटाचे हे प्रमुख कारण आहे. वस्तुस्थिती आहे ही. माय-लेकीची नात्याची नाळ जोडलेली राहणारच पण हे नातं इतर कोणत्याही नात्याला बाधा ठरू नये हे दोघींनीही जाणायला हवं. त्यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने पाळायला हव्यात.
१) कितीही काळजी वाटली तरीही मुलीच्या आईने रोजच्यारोज मुलीच्या संसारात काय चाललंय याची माहिती घेऊ नये. काहीवेळा अज्ञानात सुख असतं हे लक्षात ठेवावं.
२) मुलीनेही रोजच्यारोज सासरी काय घडतंय याच्या बातम्या आईच्या कानावर घालायची काहीच गरज नाही. ३) सासरी रुळायला तुमच्या मुलीला नक्कीच वेळ लागणार. नवीन घर, नवीन माणसं, नवीन पद्धती तिला आत्मसात कराव्या लागणार. यासाठी तुम्हीं तिला वेळ आणि मोकळीक दिली पाहिजे.
४) ती आता तिच्या हक्काच्या कुटुंबाचा भाग आहे, हे वास्तव आईने स्वीकारायलाच हवं. तिचे छोटे मोठे सर्व निर्णय आणि त्याची जबाबदारी तिने स्वतः घ्यायला हवी. आणि सासरच्या मंडळीच्या सल्ल्याने घ्यायला हवी. त्यात कोणताही सल्ला आपण होऊन आईने देऊ नये. मुलगी चुकली तरी चालेल कारण यातूनच ती अनुभवाने शहाणी होत जाईल.
५) नवरा-बायकोच्या वैयक्तिक नात्यात तर दोघांच्याही आईवडिलांनी पडू नये. मूल होऊ देण्याचा निर्णय, मुलांची जबाबदारी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यात बाकीच्यांनी बोलू नये हे उत्तम.
६) मुलीला सतत माहेरी यायची सवय लावू नये. अशाने तिची सासरी भावनिक गुंतवणूक कशी वाढणार? तिची सासरी भावनिक समरसता होणे गरजेचे आहे.
७) सासरच्या आर्थिक बाबींमध्ये आईने लक्ष घालू नये.
८) पण जर खरंच मुलीला मानसिक शारीरिक त्रास होत असेल आणि मुलगी जर सतत तक्रार करत असेल तर सत्य परिस्थिती आणि प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नक्कीच आपल्या मुलीच्या पाठीशी ठाम आणि खंबीर उभे राहावे. तिला सर्वतोपरी मदत करावी. शक्यतो नाती कायमची तुटणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. ९) स्वतःच्या संसाराची गोडी लागावी असे संस्कार आईने नक्कीच मुलीवर करावेत.
माय-लेकीचं हे सर्वात सुंदर प्रेमळ नातं अशा छोट्या छोट्या गोष्टींनी वृद्धिंगत होत जातं. आणि अशी स्वतःच्या संसारात मुरलेली लेक सहजच आईची आई होते. स्वतःच्या जबाबदाऱ्या, संसार यशस्वीपणे सांभाळून ती दोन्ही आई-वडिलांनाही समर्थपणे सांभाळते. यातच एका आईचे खरे यश आहे. हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूपच छान लिहीलय..आई हिच मुलीचा संसार उध्वस्त करते…मग ती मुलाची आई असो अथवा मुलीची आई. आई ने आपल्या मर्यादा ओळखल्या तर खूप घटस्फोट अथवा आत्महत्या कमी होतील..मुलीला कुटूंबास स्वबळावर एकत्र करण्यास शिकवलं पाहीजे… स्वबळावर स्वतंत्र राहण्यास नाही…पण आजकालची आई हेच उलट शिकवताना दिसून येते..तुला आम्ही एवढं शिक्षण कशाला दिलयं…तू एकटी समर्थ आहेस…इ..आणि मग अशा मुली single parent बनुन जगतात. असो….