Skip to content

पुनर्विवाहाचे फायदे आणि तोटे माहितीयेत का ? वाचा या लेखात !

पुनर्विवाहाचे फायदे आणि तोटे माहितीयेत का ? वाचा या लेखात !


मेराज बागवान


‘विवाह’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते , क्षण असतो. ज्याने संबंध आयुष्यच बदलते. जीवन एक वेगळे वळण घेते. दोनाचे चार हात होतात आणि ‘सहजीवन’ सुरू होते. आपल्या भारतीय संस्कृतीत तर ‘विवाह’ ‘लग्न’ ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणाचे लग्न नाही झाले तर ती व्यक्ती जणू अपूर्णच असेच बरयाचदा समीकरण होऊन जाते. विवाह ही खूप आनंदाची, सुखाची गोष्ट आहे, कारण आयुष्यभरासाठी कोणी तरी कायमचे आपले होऊन जाते. हक्काचे असे माणूस आयुष्यात येते.

आयुष्याचा प्रवास करण्यासाठी कोणाचीतरी साथ लाभते आणि अनेक सुख-दुःखे पाहण्यासाठी दोघे जण ह्या सहजीवनाला सामोरे जातात.तसेच दुसऱ्या बाजूला लग्न जितकी भावनिक गोष्ट आहे तितकीच खूप जबाबदारीची देखील गोष्ट आहे. एकमेकांना आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर साथ द्यावी लागते, एकमेकांची मने राखावी लागतात, समजून घ्यावे लागते आणि बऱ्याच वेळा ‘सांभाळून’ देखील घ्यावे लागते. विचार समजून घ्यावे लागतात. तर आणि तरच हा सहजीवनाचा प्रवास सुखी आणि यशस्वी होतो.

पण ही झाली एक बाजू , कधी कधी असे घडते की , ह्या विवाह बंधनाची गाठ सुटते, कायमची सुटते.कधी विचार-मने न जुळल्यामुळे , सततच्या कलहामुळे विवाह मोडकळीस येऊ शकतो, तर कधी दोघांच्या समत्तीने देखील दोघे कायमचे वेगळे होतात. कधी जोडीदाराचा अकाली मृत्यू होतो. विवाहाचा कायदेशीर शेवट म्हणजे ,’घटस्फोट’. आणि अशा विविध कारणांमुळे विवाह बंधन तुटते. पण जसे वर सांगितले तसे, आपल्याकडे विवाहाला खूप जास्त महत्व आहे.पूर्वी एकदा लग्न कायमचे तुटले तर पुनर्विवाह ही संकल्पना तशी सर्रास पाहायला मिळत नव्हती.पण आज ‘पुनर्विवाह’ ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे.

‘पुनर्विवाह’ हा अधिकार आहे. ज्यांचे पहिले लग्न मोडले आहे किंवा जोडीदाराचा म्रुत्यु झाला आहे, अशा व्यक्तींना आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ सुरू करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण ह्या पुनर्विवाहाचे फायदे तसेच तोटे देखील आहेत, तर आपण ह्या लेखात नेमके हेच पाहणार आहोत.

पुनर्विवाहाचे फायदे:

१) आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरवात होते. नैराश्यात गेलेल्या आयुष्याला नवी चेतना मिळते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.

२) कधी कधी मुले लहान असतात, आणि नेमके तेव्हाच नवऱ्याचा किंवा बायकोचा मृत्यू होतो. त्यावेळी जर का पुनर्विवाहाचा निर्णय घेतला गेला तर मुलांचे भविष्य उज्वल होऊ शकते, त्यांना सांभाळायला हक्काचे असे आपले माणूस मिळते.

३) घटस्फोटामुळे किंवा जोडीदाराशी नाते संपल्यानंतर आयुष्यात नाही म्हणले तरी एक प्रकारची पोकळी निर्माण होते. एकाकीपणा वाढीस लागतो.मन , चित्त कधी कधी खूप विचलित होते. पुनर्विवाह हा निर्णय ही समस्या सोडवू शकतो. पुन्हा सहजीवन सुरू होते, विचारांची देवाणघेवाण होते आणि मग एकाकीपणा जाणवत नाही.

४) कधी कधी ‘स्त्रीचा’ मृत्यू होतो, जी घरातील साऱ्यांचे सर्व पाहत असते. मग घराचा सांभाळ करण्यासाठी , घरातील वृद्धांची काळजी घेण्यासाठी तरी पुरुष पुनर्विवाह चा निर्णय घेऊ शकतात.तसेच कोणीतरी आपली देखील काळजी घ्यावी , ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पुनर्विवाह ही अपेक्षा पूर्ण करू शकतो.

५) पुनर्विवाह हा पुन्हा एकदा आयुष्य शिकवून जातो. विस्कटलेली घडी पुन्हा योग्य रित्या बसवितो. आयुष्यात पुन्हा आनंद, सुख आणतो.शारीरिक गरज ही प्रत्येक पुरुष-स्त्रीला असते. ते नैसर्गिक आहे.जोडीदार कायमचा सोडून गेला म्हणून, त्या गरजा संपत नाहीत. पुनर्विवाह पुन्हा एकदा आपले आयुष्य परिपूर्ण करते.एक प्रकारचा भावनिक आधार मिळतो.

ह्या सगळ्या गोष्टी पुनर्विवाहाने साध्य होऊ शकतात.पण ह्या सगळ्यांबरोबर , काही तोटे देखील आहेत पुनर्विवाहाचे , ज्याचा विचार करणे गरजेचे आहे.

पुनर्विवाहाचे तोटे :

१) कधी कधी मुले नवीन आईला , नवीन वडिलांना सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यांचा भावनिक गोंधळ उडू शकतो.

२) पहिला जोडीदार नसला तरी देखील काही काही बाबतीत त्याची पहिल्या जोडीदाराशी तुलना केली जाते. मग पुन्हा मन भूतकाळात जाऊ शकते आणि ते नवीन जुळलेल्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते.

३) पहिल्या जोडीदारासोबत जसा नात्यांमधील ओलावा टिकून राहत होता, तसाच ओलावा नवीन नात्यात खूपदा जाणवत नाही.

४) बरयाच वेळा , ‘हा असा आहे ना ‘म्हणून पहिला विवाह असफल झाला , ‘ही अशी करते’ म्हणूनच तिचे पहिले नाते फार काही काळ टिकले नाही.असा विचार मध्ये मध्ये मनात डोकवतो. ‘गृहीत धरणे’ सुरू होते.

५) जर पहिल्या जोडीदाराचा मृत्यू झालेला असेल आणि तो जोडीदार खूप प्रेमळ असेल,त्याने त्याच्या वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदारावर खूप प्रेम केले असेल , तर नेमकी अशीच अपेक्षा एखादी व्यक्ती नवीन जोडीदाराकडून करू शकते. किंवा तिने किती जरी प्रेम केले तरी देखील त्या व्यक्तीचे त्या व्यक्तीच्या प्रेमावर विश्वास बसत नाही.

६) कधी कधी आर्थिक गोष्टी एकमेकांसोबत मुक्तपणे शेअर केल्या जात नाहीत.एकमेकांवर पटकन विश्वास बसत नाही.नेहमी व्यावहारिक च विचार केला जाऊ शकतो.त्यामुळे भावनिक बंध निर्माण होण्यात अडचण येते.

अशा काही गोष्टी आहेत, ज्या पुनर्विवाहामुळे घडू शकतात, ह्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. प्रत्येकाला आपली एक हक्काची व्यक्ती कायम आपल्याबरोबर हवी असे वाटत असते. आणि त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण , नवीन दुसरा संसार उभारल्यानंतर देखील अनेक आव्हाने असतात.

पण , पुनर्विवाह मनुष्याला आपल्या चुका सुधारण्याची संधी देतो.स्वतःमध्ये नाते टिकविण्यासाठी बदल करणे कसे गरजेचे आहे याची जाणीव ह्या मधून होते.मनुष्य एकटा जगू शकत नाही. जरी त्याच्याकडून चुका झाल्या तरी देखील पुन्हा एकदा एक नवी सुरवात करण्याची संधी आयुष्य त्याला देतेच. मग आपण ठरवायचे असते , की , मिळालेल्या संधीचे सोने करायचे की पुन्हा ते सोने गमवायचे.

‘लग्न’ ही खूप सुंदर गोष्ट आहे. चूक फक्त एकाकडून होत नाही…टाळी एका हाताने वाजत नाही.म्हणूनच ‘विवाह’ असो की ‘पुनर्विवाह’, ते खऱ्या अर्थाने जगता आले पाहिजे. विशेष करून , जेव्हा विषय पुनर्विवाहाचा येतो तेव्हा ते नवीन नाते हळुवारपणे जपता आले पाहिजे, जेणेकरून पुनर्विवाहमध्ये असलेले तोटे , आव्हाने कमी करता येतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!