काही पुरुष हे एखाद्या स्त्री किंवा आपल्या पत्नीशी इतके क्रूर का वागतात….??
हर्षदा नंदकुमार पिंपळे
“स्त्री-पुरुष” असा मुद्दा मांडायचा म्हंटल तरी धस्स होतं. कारण इथे कुणाची मानसिकता काय असते नी काय नसते हे समजणं फारच कठीण आहे. इथे कुणालाही वाटू शकतं की त्यांच्यावर अन्याय होतोय.फक्त पुरूषच दोषी असतात का नेहमी वगैरे वगैरे बोलणारे बरेच असतीलही इथे.पण इतकच सांगायच आहे की हा लेख त्यांच्यासाठीच आहे , त्याच पुरूषांसाठी आहे जे की खरोखरच असं वागतात ,ज्यांच वागणं क्रूर आहे. बाकी इतर पुरुषांना दोष देण्याचा किंवा बोल लावण्याचा या लेखामागील हेतु मुळीच नाही. त्यामुळे वाचा , आणि नीट समजून घ्या…….
आपल्याकडे पूर्वी पुरूषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. आजही काही अंशी कुठे ना कुठे ही पुरूषप्रधान संस्कृती पहायला मिळते.कदाचित आपण या पुरुषप्रधान संस्कृतीत येत नसु…पण आजुबाजुला घडणाऱ्या या पुरुषप्रधान संस्कृतीच काय…?कुठेतरी आपल्याला सुद्धा या काही अंशी अजूनही अस्तित्वात असलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीचा त्रास होत असणार यात शंकाच नाही.
खरतर या पुरुषप्रधान संस्कृतीच ओझही झालं नसतं….जर तिथे मोकळ्या मर्यादांच अंगण असतं…..पण कसलं काय…? इथे मोकळ्या मर्यादांच अंगण नसुन मर्यादांच काटेरी कुंपण आहे असं वाटलं तर या अशा संस्कृतिच ओझं हे होणारच.
पण हल्ली हळुहळू हे चित्र बदलताना आपण प्रत्येकजण पाहतोय. स्त्रियांच वर्चस्व दिवसागणिक प्रत्येक क्षेत्रात हे वाढताना दिसत आहे.कदाचित हेच स्त्रियांच प्रत्येक क्षेत्रातील वाढतं वर्चस्व ज्या ठिकाणी पुरूषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे तिथे परिणाम करत असावं.
स्त्रियांच वाढणारं वर्चस्व कदाचित या पुरूषांना सहन होत नसावं म्हणून त्यांच्यातील ती वाईट , क्रूर वृत्ती जागी होत असावी. आणि एकदा का माणसातील वाईट वृत्ती जागी झाली की तुम्हाला माहीतच असेल कोणताही माणूस किती विचीत्र वागतो ते…आणि वाईट वृत्ती ही विनाकारण जागी होत नसावी.त्यामागे निश्चितच कोणती ना कोणती ठोस अशी कारणं नक्कीच असणार यात काही शंकाच नाही.
पण म्हणून एखाद्याने इतकं क्रूरपणे वागावं का…? गोष्टी पटत नसतील तर त्या समजून उमजून घ्यायला हव्यात नं…? स्वतःमधील राक्षस जागा करण्याची गरज आहे का…? अशा दुष्ट वागण्याने स्वतःला आणि त्या स्त्रियांना त्रास द्यायला काहीच कसं वाटत नाही. मुळातच त्यांच मन धजावत नाही का ? असा प्रश्न कधी कधी विचार करायला लावतो.
पुरुष क्रूर वागतात खरे पण त्यामागील कारणं आपण कधी जाणून घेतली आहेत का…? नसतील जाणून घेतली तर आपण काही कारणं जाणून घेऊयात——
पुरुष क्रूर वागतो…पण का….? तर….. स्त्रियांच प्रत्येक क्षेत्रातील दिवसागणिक वाढत जाणारं वर्चस्व काही पुरूषांना (विशेषतः पुरूषप्रधान संस्कृतीतील) सहन होत नाही. त्यांच स्वतःच वर्चस्व कमी होत चालल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन मन अस्थिर होऊन वाईट विचार करायला लागतं. ही बाई माझ्यापुढे जाऊच कशी शकते…? मुसुमुसू रडणारी ही बाई आज माझ्याच डोळ्यात डोळे घालून बोलते….हे काही त्या पुरूषांना सहन होत नाही. त्यांच्या “मी” ,”माझं” ,”मलाच” या गोष्टींना नकळतपणे तडा जातोय असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे त्यातूनच ही क्रूर वृत्ती जन्माला येते.
विविध ठिकाणी अजूनही घरातील करता-करविता म्हणजे पुरूषच असे मानले जाते.घरातील आर्थिक डोलारा हा पुरूषांच्या हाती असल्यामुळे कितीदा तरी पैसे मागण्यासाठी नवऱ्याकडे पत्नीला हात पसरावे लागतात. सारखंसारख खरं तर तिलाही हात पसरायला लाज वाटते पण तिचा नाईलाज असतो.
म्हणून कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा नवरा तिला अगदी तावातावात म्हणतोच….कशाला लागतात गं इतके पैसे तुला….? जेवढे दिलेत नं त्यात कर काय करायच ते…उगाच सारख सारख…………………..वगैरे वगैरे तो बोलून जातो. ईतकच नाही तर तो असही म्हणायला कमी करत नाही की “मी कमवतो , माझ्या जीवावर हे सगळं चालतं….तुला काय माहीत दिवसभर काय काय असतं ते….तु काय घरात आयत बसून तर खातेस ” जो असा काही पैशाचा माज या पुरूषांमध्ये असतो तो म्हणजे फार विचीत्रच असतो.असं बोलून तिचं कुठेतरी मानसिक खच्चीकरण होतय असच वाटतं.थोडक्यात काय तर स्वतःच आर्थिक वर्चस्व ते एकप्रकारे गाजवत असतात.
आणि नवरा-बायको म्हंटल तर त्यांच्यातही वादविवाद हे होतातच.पण काहींच्या वादविवादाला काही परिसीमाच नसते. असं अनेकदा आढळून आलेलं आहे की ,पुरूषांना गोंधळ-गडबड नी कटकट फारशी सहन होत नाही..(पण त्याला अपवाद अनेक पुरुष आहेत.) आणि कदाचित अशा कडाक्याच्या भांडणातून देखील त्यांची ती वाईट वृत्ती जागी होते नी त्यांच्या हातून काहीतरी कृत्य घडतं.खरतर त्या परिस्थितीत नकळतपणे मानसिक तोल ढासळला जातो आणि तोच त्यांच्या क्रूरपणाला कारणीभूत ठरतो.
इतर कामाच्या ठिकाणी सुद्धा हल्ली आपण पाहतो , स्त्रियासुद्धा मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि त्याही “बॉसिंग” करताना आढळतात. पण मग ती एक स्त्री आहे तिने तिच्या मर्यादेत रहावं , अशी बॉसिंग करणं तिला शोभत नाही.ते त्यांच काम नाहीच….असे अनेक प्रकार घडतात त्यातून तो तिला धडा शिकवण्याच्या बहाण्याने , तिच्याशी गैर कृत्य करायला लागतो , त्याचा अहंकार दुखावल्यामुळे तिच्याशी जितकं क्रूर वागता येईल तितक तो क्रूरपणे वागत राहतो.
अनेकदा तर त्यांना स्त्रियांच्या छोट्या छोट्या चुकाही पटत नाहीत. त्यावरून तिला वाईट वागणूक देणारेही कमी नाहीत.
अनेकदा घरात तर बायकोविषयी गैरसमज निर्माण करून घेऊन त्या रागाच्या भरात तिच्याशी निष्ठूरपणे वागलं जातं.
थोडक्यात सांगायच झालं तरी स्त्रियांच प्रत्येक क्षेत्रातील वाढत चाललेलं वर्चस्व , मान -अपमान , स्त्रियांची दादागिरी , वाढत चाललेली स्पर्धा , बदलत चाललेली आर्थिक मानसिकता , श्रेष्ठ-कनिष्ठत्व , कोणत्या ना कोणत्या व्यापामुळे बदलत चाललेली मानसिकता , काही अंशी असणारी पुरूषप्रधान संस्कृती या सगळ्या गोष्टी पुरूषांच्या क्रूरपणाला कारणीभूत ठरतात. पुरुष स्त्रियांशी अत्यंत वाईट वागतात. परंतु हेही तितकच खरं आहे की , काही ठिकाणी हे चित्र असलं तरी काही ठिकाणी मात्र स्त्रिया आणि पुरुष हे एकत्रितपणे , समानतेने काम करतात.
एकमेकांच्या कामाच दोघांंनाही तेवढच कौतुक असतं हे पहायला मिळतं.दोघेही एकमेकांना तितकेच आदराने वागवतात. पण काही ठिकाणी अजून एक चित्र पहायला मिळतं ते म्हणजे हल्ली स्त्रियांचदेखील पुरूषांना त्रास देणं वाढत चाललय.वर्तमानपत्रात रोज एक तरी बातमी येतेय की बायकोमुळे नवऱ्याची , सासुमुळे जावयाची आत्महत्या , किंवा त्या स्त्रियांनीच वेगवेगळी क्रूर कृत्ये केली ……
अशा अनेक बातम्या हल्ली पहायला मिळत आहेत. म्हणजे काय तर केवळ पुरूषांनाच दोष देऊन काही उपयोग नाही इथे तर आजकाल स्त्रियाही काही कमी नाहीत.वरील कारणं या स्त्रियांनाही लागू होतात. स्त्रियाही क्रूरपणे , आक्रमकपणे मोठ्या प्रमाणात वागताना दिसत आहेत.
या समाजात काही तुमच्यासारखे चांगले स्त्री-पुरुष आहेत याचा अभिमान वाटतो पण जी काही समाजात स्त्री आणि पुरूषांची अशी वाईट वृत्ती आहे त्याच मात्र खूप वाईट वाटतं.पण दिवसागणिक दोघांची दोघांच्या प्रति बदलत जाणारी मानसिकता आणि बदलणारी परिस्थिती कुठेतरी नक्कीच याला कारणीभूत ठरते.याला खतपाणी घालणारेही अनेक जण असतात पण याला खतपाणी घालायच की या परिस्थितीला व्यवस्थित हाताळायच हे आपल्याच हातात असतं.
समाजातील अशी ही क्रूर वृत्ती नष्ट करायची असेल तर तुमच्यासारख्या (आपल्यासारख्या) काही सुसंस्कृत चांगल्या स्त्री-पुरूषांनी एकत्र यायला हवं.कारण “स्त्री आणि पुरुष” हे समाजाचेच दोन सुंदर पंख आहेत आणि हे दोन्ही पंख जर मजबूत , कणखर आणि सुंदर असतील तर हा समाज नक्कीच एक दिवस गरूडझेप घेईल…….. !पण स्त्रिया आणि पुरूष हे असेच क्रूर वागत राहिले तर गोष्टी अवघड होऊन बसतील कायमच्या………..च.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



अगदी बरोबर आहे. स्वतःवर जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा विचार करायला भाग पाडते.