संशयी बायको आणि चिडणारा नवरा हे गणित कसं सोडवायचं???
जागृती सारंग
संशय हा कधीही विनाशकारीच असतो. अगदी तसंच सततचा त्रागा, चिडचिडेपणा माणसाला शारिरिकरित्या आणि मानसिकरित्या त्रस्त करून सोडतो. ज्याचा परिणाम नोकरी, व्यवसाय आणि नात्यांवर होताना दिसून येतो. संशय आणि चिडचिड करणं हे दोन्ही रोग जर नवरा-बायको पैकी कोणालाही लागले तर नातं नवं असो वा जुनं त्या नात्यातले प्रेम, विश्वास अन् आदराचे भले भक्कम बुरुज अगदी सहजपणे ढासळायला सुरू होतात.
नवरा-बायकोच्या नात्यात लग्नानंतर दोघांना फक्त बेरीज, गुणाकार करायचा नसतो, तर सोबत वजाबाकी, भागाकार सुद्धा करावा लागतो. दोघांनीही नव्या आयुष्याला सुरुवात करण्याआधी जुनी प्रेमप्रकरणे, जुनी नाती, जुन्या चुकीच्या सवयी, व्यसनं यांची वजाबाकी आणि भागाकार करून जपन्या हिशोबाची बाकी शून्य करायला हवी.
ज्यांना आपल्या आयुष्यात आपण कोणत्या गोष्टीला, कोणत्या व्यक्तीला, कोणत्या तत्त्वाला तसेच कोणत्या नात्याला कसं आणि किती महत्त्व द्यायचं हे कळतं त्यांना कुठलीच गोष्ट कठीण नसते. नवरा-बायकोच्या नात्यात हे अगदी शंभर टक्के लागू पडतं. आयुष्याच्या अंतापर्यंत आपली साथ देण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी, आपला आधार म्हणजे आपला पार्टनर आहे हे एकमेव सत्य ज्यांना कळतं ते आपली आयुष्यातली प्रत्येक भूमिका अगदी चोख निभावण्याचा मनापासून प्रयत्न करतात.
माणसं स्वभावाने जन्मतः चिडखोर किंवा संशयी नसतात. अवतीभवतीच्या परिस्थितीमुळे, माणसांमुळे, अनुभवांमुळे तशी घडलेली असतात. बऱ्याचदा माणसं हि त्यांना मिळालेल्या वागणुकीतूनही बदलत जातात. नवरा-बायको हे सुरुवातीला एकमेकांवर खुप प्रेम करत असतात पण जबाबदाऱ्या वाढल्या की थोडे थोडे बदल प्रत्येक जोडप्यात होत जातात.
परंतु बायको जर संशयी झाली असेल तर ते संशयाचं पिल्लू आपल्याकडूनच तिच्या डोक्यात सोडलं गेलं तर नाही ना याचा विचार करावा. आपण वेळ देत नाही, आपली चिडचिड, आपलं तिच्याकडचं दुर्लक्ष या सर्व वागणुकीमुळे ती चिडचिड झाली आहे का हे देखील आपण पाहावं.
हे अगदी असंच लागू पडतं बायकोसाठी सुद्धा! तिनेही तपासून पहावं की आपण उगीचच पाळलेल्या संशयामुळेच आपला नवरा चिडचिड करत नाहीये ना, आपल्या संशयी स्वभावामुळे तो आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही ना किंवा घरी वेळ न देता सतत ची कटकट बडबड ऐकायला नको म्हणून बाहेर जास्त वेळ राहत आहे का?
या अतिमहत्त्वाच्या गोष्टी दोघांनी समजून घेऊन एकमेकांबद्दल तिसऱ्या व्यक्तीसह बोलण्यापेक्षा एकमेकांसोबत बोलून नातं कसं फुलवता येईल, खुलवता येईल हे पाहावे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्यापैकी कोणतं नातं प्राधान्य क्रमांकावर आहे हे पहावं. जोडीदार अति महत्वाचा आहे तर जोडीदाराकडून कुठल्या गोष्टींची अपेक्षा आहे हे एकमेकांनी एकमेकांना सांगणं गरजेचं आहे.
साधारणतः जोडप्यांमध्ये एकमेकांना एकमेकांकडून विश्वास हवा असतो, प्रामाणिकपणा हवा असतो, एकमेकांप्रती आदर हवा असतो. या तीन गोष्टी प्रत्येकालाच समोरच्या व्यक्तीकडून हाय प्रायोरिटी वरती हव्या असतात. त्यानंतर लगोलग अपेक्षा असते काळजी घेणे आणि वेळ देणे!
या पाच अपेक्षा प्रत्येकाला आपापल्या जोडीदाराकडून असतात.
यात आपण कुठे कमी पडलो का हे केव्हातरी नीट काळजीपूर्वक तपासून पहावे. कारण या पाच बेसिक अपेक्षांमध्ये आपण कुठे कमी पडलो तरच संशयाची पाल चुकचुकू लागते किंवा चिडचिडेपणा निर्माण होऊन त्रागा सुरू होतो.
आता अशा वेळी जर हे नातं टिकवायचं असेल, पुन्हा फुलवायचं असेल तर काय करावे हे पाहू –
संशयाच्या अजगराने नातं गिळंकृत करण्याआधी आणि चिडचिडेपणा करून नातं विकोपाला नेण्यापेक्षा एकमेकांशी समोरासमोर बसून संवाद साधावा.
संशयित अन् चिडचिड्या मनःस्थितीत असताना एकमेकांना समजून घेणे जरा कठीण होऊन बसतं म्हणून त्यावेळी दोघांनीसुद्धा कोण चुकलं यापेक्षा काय चुकलं याला महत्त्व द्यावं.
बायकोच्या संशयाला जी घटना, जी व्यक्ती जबाबदार असेल त्याबद्दल तिला त्या गोष्टी जशा आहेत तशा वेळेत सांगून तिच्या शंकाकुशंका दूर कराव्यात.
ज्या व्यक्तीमुळे नात्यात कडवटपणा आला असेल त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कायमचं वजा करायचा प्रयत्न करावा. जर ही तिसरी व्यक्ती तुमची नवी-जुनी मैत्रीण असेल, ऑफिस कलिग असेल अथवा सोशल फ्रेंड असेल तर तुमच्या मध्ये फक्त मैत्री आहे आणि जर बायकोला फक्त गैरसमज झाला असेल तर तिच्या प्रत्येक शंकेचं योग्य ते निरसन वेळीच करावं.
बायकोने देखील अशा वेळी तितकंच समजून घ्यायला हवं की आपण उगीचच चुकीचा संशय करून तर घेत नाही आहोत ना! मैत्री एकवेळ संपवता येते परंतु कामाच्या ठिकाणी ऑफिस कलिगसह अबोला धरता येत नाही. आपल्या चुकीच्या संशयामुळे आपण आपल्या जोडीदाराचे आणि आपले नुकसान तर करत नाही ना या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात.
दोघांची भांडणं असतील ती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत येऊ नयेत. आपल्या जोडीदाराच्या कोणत्याही भल्या बुऱ्या गोष्टी आई वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा मित्र मैत्रिणींना सांगू नये.
रात्री झोपण्यापूर्वी भांडण मिटवून झोपावे अन्यथा अख्खी रात्र फक्त नकारात्मक विचारात निघून जाते आणि सकाळी नव्याने सुरुवात करण्याऐवजी एकमेकातला द्वेश अजून जास्त वाढत जातो.
आपल्या जोडीदाराची स्वतःसह किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसह किंवा आपल्या मित्रपरिवारासह कधीही तुलना करू नका.
एकमेकांच्या चुका अधोरेखीत करण्यापेक्षा एकमेकांमधे असलेस्या वेगळेपणाचं कौतुक करा.
व्यक्त होताना संवाद साधताना तुला काय कळणार माझं ऑफिसचं टेन्शन किंवा तुला काय कळणार मी दिवसभर घरात किती काय काय करत असते ते! असं नकारात्मक बोलण्यापेक्षा आज मला फारच त्रास झाला आहे, ऑफिसमध्ये प्रचंड दगदग झाली आहे, किंवा घरातली कामं करता करता खूपच दमायला झालं आहे तर माझ्यासाठी फक्त तू अमूक तमूक करशील का असं सकारात्मक बोलून पहा ना.
एकमेकांच्या प्रगतीसाठी, एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करा.
एकमेकांचा आधार बना. एकमेकांवर अवलंबून असतानाच एकमेकांचे स्वातंत्र्य देखील अबाधित ठेवा.
एक तर गोष्टी जेव्हाच्या तेव्हा स्पष्ट करून पुढचा गुंता, अबोला वेळेत सोडवा किंवा थोडासा ब्रेक घ्या. या ब्रेक च्या दरम्यान स्वतःचे महत्त्व ओळखून स्वतःला हा वेळ द्या.
स्वतःला आनंदी ठेवता आलं तर अवतीभवतीच्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आनंद वाटू शकता.
ब्लेम गेम खेळण्यापेक्षा आत्मपरीक्षण करत करतच तुमची स्वप्ने, तुमचे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आयुष्यात काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा, नाच, गाणं, एखादे म्युजिक इन्स्ट्रुमेंट असं काहीतरी नवीन शिका. क्रिएटिव्ह माणसं हि स्वतःवर प्रेम करणारी असतात.
संशयी वृत्ती असो वा चिडचिडा स्वभाव असो, क्रिएटिव्हिटीमुळे नकारात्मकता आपल्यापासून चार हात दूर ठेवता येते.
स्वतःसाठी आणि कोणत्याही नात्यासाठी शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आणि भावनिक आरोग्य ही अत्यंत महत्त्वाचे आहे हे ध्यानात घ्यावे आणि त्यानुसार वागायचे प्रयत्न करावे.
संशयीपणा आणि चिडचिडेपणाला खतपाणी घालणाऱ्या वाईट सवयी आणि व्यसनांना स्वतःच्या कुटुंबाच्या भल्यासाठी वेळीच सोडून द्या.
जोडीदाराला बलत बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा किंवा जसे आहात तसे एकमेकांचा स्वीकार करा.
स्वतःवर फोकस करा, स्वतःला अटेन्शन द्या म्हणजे मन-डोकं रिकामी राहणार नाही. रिकामे मन राक्षस घर सगळं काही उद्ध्वस्त करू शकतं. म्हणून एखादी चूक घडली तर किंवा जोडीदार दुखावला गेला तर चूक स्वीकारून, माफी मागून, एका चुकीच्या बदल्यात किमान पाच चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जोडीदाराला त्याची जाणीव होईल आणि मनापासून आनंद ही होईल.
अंतिमतः सर्वकाही करूनही जर नातं विकोपाला जात असेल किंवा गेलं असेल. बरेच प्रयत्न करूनही नात्याची गाडी रुळावर येत नसेल तर नात्यात महत्वाच्या असणाऱ्या विश्वास, प्रामाणिकपणा, आदर यांना जर वारंवार तडा जात असेल आणि नातं सुधारण्याच्या पलीकडे गेलं असेल तर योग्य त्या कायदेशीर, अनुभवी तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन नातं सुधारण्याचा प्रयत्न करा किंवा योग्य तो निर्णय वेळीच घ्यावा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Ha lekh khup mast vatla vacchunm positivity ali