“घरातील वातावरणाचा नवरा-बायकोच्या पर्सनल लाईफ वर काय परिणाम होतो?”
मधुश्री देशपांडे गानू
“ये तेरा घर… ये मेरा घर,
किसी को देखना हो गर..
तो पहले आके मांगले..
तेरी नजर..मेरी नजर..
किती भावस्पर्शी गाणं आहे ना! नवविवाहित जोडप्याची स्वतःच्या घराबद्दल, संसाराबद्दल, आयुष्यभरासाठीच्या एकत्र सहवासा बद्दल किती सुंदर स्वप्नं असतात. आपल्या दोघांचंच असं जग असावं, घरकुल असावं आणि प्रेमाने ते सजवावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. भारतात तरी लग्नसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. “दोन जीवांचं प्रेम ही वैयक्तिक गोष्ट आहे पण लग्न ही सामाजिक जबाबदारी आहे.”
लग्नामुळे फक्त नवरा-बायको जोडले जात नाहीत तर दोन कुटुंबं कायमची जोडली जातात. लग्नानंतर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल किंवा दोघेच राहत असाल तरीही तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगांमध्ये, निर्णयांमध्ये तुमची कुटुंबंही सामावलेली असतात.
आजच्या काळात नवरा-बायको दोघेही करिअर ओरिएंटेड असतात. दोघांच्याही प्राधान्यता वेगळ्या असू शकतात. दोन भिन्न वातावरणात, संस्कारात, सामाजिक, आर्थिक भिन्न स्तरांतून आलेल्या व्यक्ती लग्नाने आयुष्यभरासाठी एकत्र येतात. दोघांच्याही संसाराबद्दलच्या ईच्छा, भावना वेगळ्या असू शकतात. एकमेकांना समजून घेऊन विचारांचा, इच्छांचा, मतांचा, आदर करून विश्वास आणि प्रेमावर हे नातं आयुष्यभर अबाधित राहतं. रक्ताचं नसूनही सर्वात जवळचं होऊन जातं. कोणताच आडपडदा नसणारं एकमेव नातं.
आज मुंबई सारख्या अनेक महानगरांमध्ये अतिशय तुटपुंज्या, छोट्याशा जागेत कुटुंबं राहत आहेत. अशावेळी एकत्र कुटुंब पद्धती असेल तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना त्यांची पर्सनल स्पेस मिळतच नाही. सतत माणसांच्या वावरामुळे या दोघांचे शारीरिक-मानसिक भावबंध जुळत नाहीत. अगदी गृहिणी असेल तरीही सतत घरातली कामं, सणवार, कर्मकांडं, आला गेला पै पाहुणा या सगळ्यामुळे ती बिचारी दमून जाते.
या सगळ्याचाही नवरा-बायकोच्या नात्यावर नकळत परिणाम होत असतो. खूप वर्षांपूर्वी “पिया का घर” नावाचा हिंदी चित्रपट आला होता. त्यातील नायिका एका मोठ्या चौसोपी वाड्यातून मुंबईच्या दोन खणांच्या चाळीत लग्नानंतर राहायला येते. सहा-सात माणसांच्या एकत्र कुटुंबात तिला मुक्त वागता येत नाही. आणि नवरा-बायकोचं नातं खुलतच नाही.
मुळात कोणत्याही लग्नाचा मूळ हेतू हा शरीरसंबंध आहे. लग्न टिकण्याचा मुख्य पायाच हा आहे. जर शरीर संबंध नैसर्गिक, सहज, तणावरहित आणि नियमित असले तर कोणतंही लग्न टिकण्याच्या शक्यता 99 टक्के असतात. पण आपल्याकडे याच महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. एकमेकांच्या या बद्दलच्या अपेक्षा लक्षात घेतल्या जात नाहीत. या बाबतीत समाधानी असणं हे लग्नाच्या, संसाराच्या एकूण यशस्वीतेसाठी महत्त्वाचं असतं.
अगदी आज नोकरी-व्यवसायानिमित्त दोघेच वेगळे स्वतंत्र राहत असतील तरीही आणि एकत्र कुटुंबात राहत असतील तरीही दोघांच्याही आई-वडिलांची नको इतकी लुडबुड, गुंतवणूक यांच्या संसारात असते. यामुळे अकारण खटके, वाद होतात. याचाही परिणाम नवरा-बायकोच्या पर्सनल लाईफ वर होतो. सततची स्पर्धा, आर्थिक सामाजिक स्तर टिकून ठेवण्यासाठी धडपड आणि त्यासाठी लागणारे कष्ट मेहनत यामुळे नवरा बायको शारीरिक मानसिकही थकून जातात. कामाचा, सातत्याने टिकून राहण्याचा ताण दोघांवरही असतो.
यामुळे घरात एकमेकांवर राग काढला जातो. भविष्याची चिंता, अतिविचार, ताण या सगळ्यामुळे शारीरिक-मानसिक जवळीकीसाठी लागणारं प्रसन्न मन आणि शरीर उरतंच कुठे??? मग हे असमाधानही त्रागा करायला पुरेसं असतं. या दुष्टचक्रात दोघेही पुरते अडकून जातात. आणि खरं कारण न शोधता काही तरी बाह्य कारणांमुळे घटस्फोटापर्यंत पोहोचतात.
खरंच एकमेकांवर निस्सीम प्रेम असेल आणि विश्वास असेल तर अशा परिस्थितीतही जोडपी मार्ग काढतातच. एकमेकांना आपला खास वेळ देणं हे फारच गरजेचं आहे. घरात तुम्ही तृप्त, समाधानी, शांत, सुखी असाल तर बाहेरचे कोणतेही बरेवाईट प्रसंग आत्मविश्वासाने हाताळू शकता. पण घरातील वातावरण जर बिघडलेलं असेल तर मात्र तुमच्या कामावर ही त्याचा विपरीत परिणाम होतो.
नोकरी-व्यवसाय, पैसा या महत्त्वाच्या बाबी आहेतच. करिअर करणं, यशस्वी होणं यासाठी तर हेच वय असतं, पण त्याचबरोबर आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभराचं नातं वृद्धिंगत करणं ही याच वयात होतं ना! जसं आपण तरुण वयात भरपूर कष्ट करून उतारवयासाठी पैशाची साठवणूक करतो, आपले म्हातारपण सुरक्षित करतो. त्याचप्रमाणे उतारवयातच खरी जोडीदाराची, सहवासाची गरज असते. ही गुंतवणूकही तरुण वयातच करायला हवी ना!!
कितीही अडचणी आल्या तरीही नवरा-बायकोने आपली पर्सनल स्पेस जपली पाहिजे. एकमेकांसाठी काही गोष्टींना, काही लोकांना स्पष्टपणे नाही म्हणता आले पाहिजे. वेळ प्रसंगी एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी होता आलंच पाहिजे. म्हणजे घरातील अथवा बाह्य कोणतेही वातावरण, जबाबदाऱ्या, नाती तुमच्या पर्सनल लाईफ वर परिणाम करणार नाहीत. तुमचं नातं सुंदर होईल आणि बहरेल आयुष्यभरासाठी!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


