Skip to content

पाळीच्या वेळी स्त्रियांना नवऱ्यांविषयी नेमकं काय वाटतं ?

पाळीच्या वेळी स्त्रियांना नवऱ्यांविषयी नेमकं काय वाटतं ?


रेणुका खोत


पाळीच्या दिवसात कंबरेत आणि पोटात कळा आणि पेटके यायला लागले की वाटतं निर्मितीच्या सगळ्या कळा बाईला इतक्या जास्त प्रमाणातही देण्याची निसर्गाला खरोखरीच काय गरज होती? अपेक्षित ते एकदा दोनदा निर्माण केलं की बास झालं ना.. ऊंई हुई करत पडून रहायचं किंवा पर्याय नसताना झक मारत आहे त्यावस्थेत उठून कामं करायची. साला अश्यावेळी हातात आयता चहाचा कप द्यायलाही कुणी नसतं आसपास.मणक्यातून सणसणत कळ वरवर आली की वाटतं कधीकधी ह्यातल्या काही कळा पुरषांना देण्यात निसर्गाने हात आखडता का घेतला असावा?

पाळी, सेक्स, नऊ महिने गरोदर असताना वाढलेली पोटं घेऊन फिरणं, त्यात होणार्या उलट्या, पित्त, मळमळ, नीट झोपता न येणं, मग प्रत्यक्ष बाळंतकळा , पाळीच्या आधी होणारी चिडचिड, अचानक रडू येणं, घाबरल्यासारखं होणं, पोटाचा पाठीचा तिंबातुंबा होणं… ढवळत राहतं बाईचं शरीर मन. किती बदलांना उलथापालथींचा सामना करायचा सतत. सारखं बदलत राहतं आत काहीतरी ज्याचा थांग लागत नाही.

पुरषांना सांगावे लागतात समजत नसतात हे आमचे त्रास. कधीकधी आम्ही स्त्रिया त्यांना आपापसात गप्पा मारताना हरामखोर जात असही म्हणतो. प्रेम असतं तरीही म्हणतो. एक संताप असतो त्यात.कधी कधी ना काय होतय तेच कळत नसतं पण मन शरीर ह्यातलं काहीतरी दुखत असतं. तेव्हा स्वत:हून पुढे येत तुला काय होतय गं असं विचारणारे पुरषही आसपास असले ना तरी खूपच बरं वाटतं. पण काहींना तितकही कळत नसतं. तेव्हा ह्या सोटम्यासोबत का आयुष्य काढतोय आपण असा प्रश्न पडून तोडफोड करावी वाटते स्त्रियांना.

दुखर्या अंगावरून अलगद हात फिरवला तरी पुरतो. पण क्वचित असे स्पर्श देण्यात पुरूष कुठेतरी कमी पडतात. त्यात सातत्य, वात्सल्य क्वचित आलं तरी ते अव्याहत लागतं बाईला हे कळत नाही का त्यांना? झोप म्हणून निघून जातात पुरूष. तिच्यापाशी बसून राहणं, तिच्याशी बोलणं गरजेचं. पण ती काही लहान नाही होईल बरी असं मानतात आणि पाठ फिरवतात. गोळ्या घेऊन उतारा पडतो हा गैरसमज आहे.

आम्ही बाळ जन्मास घालतो. आम्हीही बाळच असतो. आम्हांला लाड, काळजी, लक्ष पुरवणं हे सगळं लागतं. तेव्हाच कळा सुसह्य वाटतात.कळा येत असताना तोंडातून हुं का चू न काढणार्या निमुट सहन करणार्या स्त्रियांना फार शूर सॉल्लिड समजलं जातं. मला मात्र कळा आल्या की कण्हणार्या, ओरडणार्या, बोंबलणार्या स्त्रियाच जास्त भावतात. किटू देत की दुसर्यांचेही कान.

थोडं हा हू केल्याशिवाय आपल्यासाठी काही करावं हे भवतालात वावरणार्या आरामात लोळत पडलेल्या माणसांना सुधरणं अशक्य असतं. आपल्याला किती दुखतय ह्याची त्यांना कल्पना येणं शक्य नसतं. ते पुरषापर्यंत पोहचवावं लागतं. खरं तर अश्यावेळी स्त्रिला हे सांगण्याचीही वेळ येऊ नये. पुरषांनी अश्या काळात स्त्रियांना समजून त्यांच्यासाठी राबणं त्यांची सेवा करणं अनिवार्य आहे. महाभयानक कळा असतात. तुम्हांला कल्पना नाही यायची.


सौ. पाटील यांनी online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पाळीच्या वेळी स्त्रियांना नवऱ्यांविषयी नेमकं काय वाटतं ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!