Skip to content

टिंग टॉंग…..

वैशाली व्यास
Counselor and Psychotherapist, Pune.
डोअर बेल वाजली. मी दार उघडलं. दारात माझ्या कडे घरकामाला येणारी सीमा होती. आल्या आल्या तोंडभर हसून “Good morning ताई” म्हणणारी सीमा, आज जेमतेम, कसनुसं हसून आत गेली.

“बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय” असं मनात म्हणत मी माझ्या कामाकडे वळले. आज नेहेमी एवढी घाई नसल्याने माझं सावकाश आवरणं चालू होतं. सीमा आजूबाजूला घुटमळत होती. ” काय ग? काही बोलायचं आहे का?” ह्या माझ्या प्रश्नांची वाटच बघत असल्या सारखी ती समोर येऊन उभी राहिली. “ताई, त्या शेजारच्या सोसायटीतल्या कामावरच्या ताई, चांगल्या नाही वागत हो! सतत अपमान करत असतात. आता आज त्यांच्या कडे स्वयंपाक नव्हता करायचा, तर नीट सांगावं ना? दार उघडं होतं, मी आत गेले नेहमीसारखी…तर, अगं अगं, आत काय येतेस? नाही करायचाय स्वयंपाक आज…जा..निघ..! अशा खेकसल्याच! त्यांची मैत्रीण बसली होती घरात, साहेब आणि मुलं पण होती… इतकं कसंतरी वाटलं ना…आम्ही काय माणूस नाही का? सतत अपमान करीत असतात. कुठलंच काम कधीच आवडतं नाही माझं… काढून टाकणार आहे अशी सारखी धमकी देत असतात. दोन कामं जास्त करायला पण हरकत नसते हो ताई… पण दोन शब्द प्रेमाने तर बोला… कौतुक नका करू हवं तर, पण असा अपमान, हाडहूड, खेकसणं…नको वाटतं… कामाचेच पैसे घेतो ना आम्ही? भीक थोडीच घालतात?”
रागाने, अपमानाने, असहायतेने सीमा चे डोळे भरून आले होते, ओठ थरथरत होते, आवाज कापत होता.
मला ही खूप वाईट वाटलं आणि राग सुद्धा आला. व्यक्ती कडे व्यक्ती म्हणून बघणं, माणूस म्हणून बघणं, खरंच एवढं अवघड आहे? पण अहंकाराने आंधळ्या झालेल्या लोकांना माणसातील माणूसपण दिसतच नाही. कुठलाही माणूस हा लहान अथवा मोठा नसतो, त्याची किंमत कमी अथवा जास्त नसते, हे कधी कळणार अशा लोकांना? प्रत्यक्षात माणसाची किंमत ठरवणारे आपण कोण? कुणी दिला आपल्याला हा अधिकार? आणि काय मोजमाप आहे तुमचे एखाद्याला लहान अथवा महान समजायचे?
बहुतेकदा पैसा, समाजातील स्थान, शिक्षण ह्या गोष्टींवर एखाद्या व्यक्तीचे मूल्य, किंमत, योग्यता ठरवली जाते. म्हणजेच माझ्या एवढा किंवा जास्त पैसे, प्रतिष्ठा, शिक्षण अडलेल्या व्यक्तीच माझ्या नजरेत मान द्यावा असे असतात. त्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींकडे मी दुर्लक्ष करणे, अपमानास्पद शब्द बोलणे, वागणूक देणे असे वागते. हे किती भयंकर आहे…!
ढोबळपणे विचार केला तर माणसाची worth म्हणजेच मूल्य अथवा योग्यता दोन प्रकारे मोजता येईल. एक म्हणजे human worth की जी सगळ्यांची सारखीच असते. त्यात काहीच कमीजास्त नसते. अगदी सर्वोच्च पदाच्या व्यक्ती पासून ते कुठलंही पद न भूषवणाऱ्या नागरिकांपर्यंत सगळ्यांची human worth म्हणजेच माणूसपणाची किंमत सारखीच असते आणि ती कधीच मोजता न येणारी आहे. म्हणजेच ह्या level वर आपण कुणालाच कमी लेखू शकत नाही. ” मी माणूस आहे तसाच तू पण माणूस आहेस” ह्या एका सोप्या वाक्यातच समानता दिसून येते, की त्यात शंका घेण्यासारखे, वाद घालण्या सारखे काहीच नाही.
Human worth मोजण्याचा दुसरा प्रकार म्हणजे, त्या व्यक्तीची skill worth म्हणजेच विशिष्ट काम करण्याचे कौशल्य, निपुणता. प्रत्येक व्यक्ती कडे वेगवेगळी कौशल्ये असतात. एखादे कौशल्य अथवा skill आज नाही ह्याचा अर्थ असा नाही की पुढे कधीच ती व्यक्ती ते skill शिकणार नाही. तेव्हा ह्या skill worth च्या level वर सुद्धा आपण माणसाची किंमत ठरवू शकत नाही. कुणाला कमी अथवा जास्त लेखू शकत नाही. “आज हे skill ह्या व्यक्ती मध्ये नाही’, असे फारतर आपण म्हणू शकतो. पण त्यामुळे त्या व्यक्ती चे मूल्य कमी होत नाही.
प्रत्येक व्यक्ती मध्ये अगणित असे potential (सुप्तगुण) असते. आणि मनात आणले तर उद्या ती त्याचा पूर्णपणे वापर करू शकते. 
आणखी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, आणि ती म्हणजे, अपमानकारक वागवणाऱ्या व्यक्तींना आपण काही चुकतोय ह्याची जाणीव, भान सुद्धा नसते. “मी माझ्या कामवाल्या बाई ला खूप मदत करते”, म्हणणारी च्या मनात श्रेष्ठत्वाची भावना रुजलेली असतेच. 

मानसशास्त्रानुसार अशा व्यक्ती स्वतःच आजारी असतात. देव त्यांना ह्याची जाणीव देवो आणि लवकर बरे करो…

Get well soon friends…!!
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
https://www.facebook.com/groups/aapall.manasshastra

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!