“तुमच्या दोघांमध्ये रोज भांडण होत असल्यास या गोष्टी करून पहा…”
मधुश्री देशपांडे गानू
खरं तर इतक्या वेळा हा विषय चर्चिला जाऊन सुद्धा या विषयात काहीतरी नाविन्य असतंच. कारण नवरा-बायको हे नातंच असं आहे. “तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.” हे अगदी तंतोतंत लागू आहे या नात्याला. हे एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसूनही इतकं जवळचं प्रेमाचं, नाजूक असं आहे. लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास असणारं, समाज मान्यता असलेलं पवित्र नातं म्हणजे नवरा-बायको.
असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणात प्रत्यक्ष परमेश्वराने ही पडू नये. कारण दोघे कधी एकत्र येतील हे सांगता येत नाही. प्रेमविवाह असो नाहीतर ठरवून केलेले लग्न असो, नव्या नव्हाळीचे दिवस भुर्रकन उडून जातात. एकमेकांशिवाय अगदी एक क्षणही नकोसा वाटत असतो तेव्हा. पण हळूहळू लग्ना नंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, वास्तवाची जाणीव, एखाद दोन मुलांची भर, रोजचे दैनंदिन काम या राम रगाड्यात दोघेही गुंतून जातात.
आपण इथे फक्त रोज भांडणारे नवरा-बायको गृहीत धरले आहेत. ज्या नवरा-बायकोमध्ये टोकाचे मतभेद आहेत, विचारांची प्रगल्भता नाही, हट्टीपणा, हेकटपणा, माझं तेच खरं, आर्थिक फसवणूक अशा अनेक गंभीर बाबी आहेत अशा नवरा बायकोचे किती काळ पटणार?? अशांनी वेगळं झालेलं बरं…असो!
हळूहळू संसाराची गाडी पुढे रेटताना दोघांचा जीव मेटाकुटीला येतो. जुळणारी, न जुळणारी आर्थिक गणितं, कुटुंबाची जबाबदारी, नव्याने येणाऱ्या समस्या, रोज वाढणाऱ्या मागण्या, आले गेले पैपाहुणे, नातलगांचे मानपान मुलांचे शिक्षण, एक ना अनेक विवंचना.. यात नवरा-बायको दोघेही अडकून पडतात. दोघेही घरासाठी, कुटुंबासाठी अविरत झटत असले तरीही दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मग कुरबुरी सुरू होतात. एकमेकांचे दोष दिसू लागतात. स्वभाव पटेनासे होतात. आवडणारं माणूस एकदम नावडतं होतं. मग काहीही क्षुल्लक कारण पुरतं भांडण करायला. भांडायला हक्काचं माणूसही तेच असतं ना!
लग्न होण्याआधी आपले आई-वडील, बहिण-भाऊ यांच्याशी मतभेद होतातच की.. दोन भिन्न परिस्थितीत, संस्कारात वाढलेली स्वतंत्र व्यक्तिमत्व आयुष्यभरासाठी जोडली जातात. तेव्हा स्वभाव भिन्न असणं नैसर्गिकच आहे. पण स्वभाव, दृष्टिकोन, वैचारिक पातळी, क्षमता, एखाद्या प्रसंगावेळी देण्यात येणारी प्रतिक्रिया, विचारांची प्रगल्भता, समजूतदारपणा, कृती करण्याची क्षमता, कुवत सगळेच वेगळे असणार ना!
संसार दोघांचा आहे त्यामुळे कोणताही निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा. मग या निर्णय प्रक्रियेत, विचारधारेत कधी मतभेद होणारच. मग वाद-विवाद होतात. भांडणं होतात. कधी कचेरीत, बाहेर घडलेल्या अप्रिय प्रसंगाचा राग घरी येऊन जोडीदारावर काढला जातो. मग शब्दाला शब्द वाढत जातो. कधी एकमेकांना वेळ देता येत नाही या निराशेतूनही राग व्यक्त केला जातो. एकमेकांना समजून न घेता मग अशी भांडणं रोजचीच होऊन जातात. बहुतांशी जोडपी आपल्या जोडीदाराला समजण्यात कमी पडतात.
खरं म्हणजे प्रेम, माया, काळजी असतेच. पण संसाराच्या धबडग्यात हरवून जाते कुठेतरी. “आपल्याला कोणी समजून घेत नाही. आपली कोणाला किंमत नाही.” असे गैरसमज करून घेऊनही भांडणांना तोंड फुटते. कित्येकदा पूर्वीसारखे शरीरसंबंध नित्याचे राहत नाहीत. हे असमाधान खूप मोठे आहे. यामुळे तर चिडचिड भांडणं होतातच. कारण लग्नाचा मूळ पायाच हा आहे. हा पाया दोघांनी नीट सांभाळला तर भांडणंही चहाच्या पेल्यासारखी होतात.. रात्री संपतात. हे खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी.
आता खरंच रोज भांडणं होत असतील तर काय करून पहावं बरं!!
१) मुळात भांडणाचा मुद्दा काय आहे, समोरच्याला काय म्हणायचं आहे हे शांतपणे लक्षात घ्यावे.
२) एकाने हट्टीपणा केला तर दुसऱ्याने समजूतदारपणा दाखवावा. नवरा बायकोच्या नात्यांमध्ये अहंकार कधीही आणू नये. त्याचप्रमाणे स्वतःची चूक असेल तर सहज माफीही मागावी. तुम्हाला कधी पडतं घ्यावं लागलं तरी हरकत नाही. त्यात कमीपणा वाटता कामा नये. कारण नातं महत्त्वाचं आहे.
३)लगेच प्रतिक्रिया देऊ नये. एक दोन क्षण थांबून शांत विचार करावा की खरच इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का??
४) स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पहावं म्हणजे नक्की काय मुद्दा आहे तो कळेल. मी असतो तर कसा वागलो असतो असा विचार करावा.
५) हेकटपणा न करता समोरच्यालाही स्वतःची बाजू , स्वतःची मतं आहेत हे मान्य करावे आणि त्याचा आदर करावा.
६) एकमेकांना स्पेस ही दिलीच पाहिजे.
७) छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या यशासाठी एकमेकांचं भरभरून मोकळेपणाने कौतुक करा. “तू माझ्यासाठी खास आहेस.” हे तुमच्या जोडीदाराला तुमच्या शब्दांमधून, कृतीतून कळू द्या.
८)राग आला तरीही आपला मुद्दा शांतपणे समोरच्याचा आदर राखत मांडता येऊ शकतो. म्हणजे त्याला अपमानास्पद वाटणार नाही.
९) समजुतदारपणा, विचारांची प्रगल्भता, शांतपणे ऐकणे या गोष्टी हळूहळू विकसित करता येतील.
१०) दोघांनी मिळून एकमेकांसाठी ठरवून खास वेळ राखीव ठेवावाच. ११) शारीरिक संबंध सुखाचे, समाधानाचे असू द्या. कितीही भांडण झालं तरी ते त्याच दिवशी मिटवता आलं पाहिजे. कारण नातं, माणूस जास्त महत्त्वाचं आहे.
१२) “रात गयी बात गयी” हे उत्तम धोरण आहे. काल झालेलं भांडण , खूप वर्षापूर्वी झालेला वाद पुन्हा उकरून काढू नका.
१३) सर्वात महत्त्वाचं एकमेकांच्या आवडी-निवडी जपा. कधी बायको साठी एखादा गजरा, छोटीशी भेटवस्तू तिला सरप्राईज म्हणून द्या. बायकोनेही नवर्यासाठी हे करायला हवं.
१४) दोघांनीच नाटक सिनेमाला जाणं, सहलीला जाणं, फिरायला जाणं अशा कितीतरी गोष्टी आवर्जून एकमेकांसाठी करा.
१५) दोघांनीही आपापल्या आई-वडिलांना मर्यादेबाहेर तुमच्या संसारात ढवळाढवळ करू देऊ नये. सध्या हे घटस्फोट होण्याचे मुख्य कारण आहे. काही ठिकाणी स्पष्ट नाही म्हणायला शिका.
१६) सामोपचाराने नीट बोलून मतभेद मिटवावेत.
नवरा-बायको हे नातं तुम्ही जितकं फुलवाल तितकं फुलत जातं. मुरलेलं लोणचं कसं छान लागतं तसंच संसारही मुरावा लागतो. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही हे प्रेमाचं, विश्वासाचं, सुंदर नातं खुलवू शकता. नुसतं नवरा बायको आणि कोणासाठी तरी आई-बाबा न राहता फक्त एकमेकांसाठी कधीतरी “प्रियकर-प्रेयसी” व्हा. म्हणजे भांडण होतील हो!! घर आहे म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. पण त्यातही तुमच्या प्रेमाची गोडी आयुष्यभर टिकून राहील. हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khup Sunder & Thanks 🙏🙏
खुप छान माहिती दिली