Skip to content

मुलांच्या मनात डोकावताना……

डाॅ.स्वाती विनय गानू – टोकेकर

उद्यापासून प्रिलिम सुरु होईल. आई-बाबा माझ्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये आहेत. खरं तर गेल्या वर्षी ९ वी चा रिझल्ट लागला आणि दुसऱ्याच दिवशी १० वी ची शाळा सुरु झाली. जरा म्हणून ब्रेक मिळाला नाही. मला एक कळत नाही मुलं म्हणजे काय यंत्र वाटतात का या लोकांना. दिवसरात्र फक्त अभ्यास, अभ्यास. आम्हाला काही पर्सनल लाईफ आहे की नाही.
१० वी चं वर्ष म्हणून जे काही मागच्या एप्रिल महिन्यापासून सुरु झालंय ते आज आठवतंय. आई-बाबांनी दोघांनी मिळून माझं दिवसभराचं गच्च वेळापत्रक ठरवलं . त्यात शाळा, क्लास, होमवर्क याशिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि मी तर कुठेच नव्हतो. आपण रोबोट झालोय की काय असंच वाटायचं . बाबा ऑफिस मधून आल्यावर कितीही थकले असले तरी माझ्याशी २५ बॉल्सची का होईना रोज क्रिकेटची मॅच खेळायचे . या वाळवंटात तेवढाच काय तो ओअॅसिस. कारण १० वी सुरू झाल्याबरोबर घरातली लाईफलाइन अर्थात टी. व्ही बंद झाला. एक प्रकारचं टेन्शन असल्यासारखं वातावरण घरात होतं. आणि आता तर ते टेन्शन इतकं वाढलंय की मला अगदी घुसमटल्यासारखं वाटतं. मनात विचार आणि भावनांचं नुसतं वादळ उठलंय पण सांगायचं तरी कुणाला? कोणाशी शेअर करावं? काही सुचत नाही .म्हणून ठरवलं आता डायरीतल्या पानांशी मैत्री करावी. परवा अन्वय जे काही बोलला माझ्याशी ते ऐकल्यावर तर मी हादरलोच . तो म्हणाला ,”अरे, माझे डॅडी मला रोज म्हणतात १० वी च्या बोर्ड परीक्षेत तुला ९५% पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुझं तंगडंच तोडून टाकेन. मला त्यांच्या या धमकीची फार भीती वाटते. कधीकधी वाटतं की मी खरंच लंगडा होईन की काय?”
त्याचं बोलणं ऐकलं आणि मन एकीकडे उदास झालं आणि दुसरीकडे संतापूनही उठलं. “अरे यार आईबाबांना कुणीतरी सांगा की आम्ही तुमच्या अपेक्षांचं ओझं वाहणारे गाढव नाही आहोत . तुमची अपुरी राहिलेली स्वप्नं तुम्ही आमच्यात पाहता हे ठीक आहे पण ती पूर्ण झालीच पाहिजेत असा अट्टाहास का करता?”
सारखं रागावणं , आमची अक्कल काढणं नाहीतर पर्सेंटेज कमी पडले तर काय होईल माहीत आहे का?वडापावची हातगाडी टाकायची स्वप्नं आहेत का तुझी? तुला मार्क कमी मिळाले तर आम्हाला कॉलनीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुला आमच्या कष्टांची कदर नाही. हे सगळे डायलॉग्ज कानावर एकसारखे आदळत असतात. वाटतं की आम्हालाही मन आहे. त्यांना कसं समजवावं तेच समजत नाही. आमच्या स्वतःच्यासुद्धा काही अपेक्षा आहेत. काही चांगलं वेगळं करण्याची उर्मी आहे. मुळात मला काही समजतं यावरच आईबाबांचा विश्वास नाही . वारा आपली दिशा बदलतो न अगदी तस्संच यांचं वागणं, बोलणं बदलतं. कधी म्हणतात,” आदित्य, तू इतका मोठा झालास . असं वागणं तुला शोभत नाही आणि कधी म्हणतात फार शहाणा झालास का ?मोठ्यांमध्ये नाक खुपसू नकोस.” मी लहान आहे की मोठा हा गुंता सुटत नाही.

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!