केवळ एकानेच तरी नातं कुठपर्यंत सांभाळावं…??
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
कधी कधी कळत नाही की कोणत्या नौकेतून प्रवास करू….मनाचा इतका गोंधळ उडतो की शेवटी मी त्या खोल पाण्यात उंच उडी मारून स्वतःच पोहायच ठरवतो….बुडून गुदमरुन तडफडत तडफडत जीव जाण्याची शक्यता असतानाही…….!! अहो….आपल्या नात्यांचीही अगदी अशीच अवस्था आहे. नाती सांभाळता सांभाळता कधी कधी इतके गोंधळतो न आपण की काही वेगळी कल्पनाच करायला नको.आयुष्यात इतकी वेगवेगळ्या बंधातली नाती आहेत.
पण यापैकी बहुतांश नाती ही केवळ एकच जण सांभाळताना दिसतो.काहीही झालं तरी एकच व्यक्ती नेहमीप्रमाणे सगळं सांभाळून घेते.पण असं एकानेच नातं कुठपर्यंत नी किती काळ सांभाळावं….?पायऱ्या चढताना जशी दमछाक होते तशीच या नात्यांना सांभाळताना आपली दमछाक होत असते.पण एकच जण जेव्हा सारख सारख नातं सांभाळत असतो तेव्हा त्या व्यक्तीची अवस्था काय होत असेल…?असा प्रश्न कधी कधी मनात विचारांच काहूर माजवल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे नक्की कळतच नाही की आपलं नातं तुटू नये म्हणून एकच जण का धडपडतो…??प्रत्येक वेळी तीच व्यक्ती का सांभाळून घेते…?? नाती जुळायला वेळ लागतो , मुरायला वेळ लागतो..ती सांभाळून नाही घेतली तर तुटतील याची भीती मनात असते म्हणून की उगाचच तडजोड करायची म्हणून ती व्यक्ती सांभाळून घेते….??
खरतर उत्तर अगदी स्पष्ट आहे. नात्यांची त्यांना जाणीव असते आणि म्हणून ते प्रेमाने तडजोड करायला तयार होतात.नात्यांपुढे तडजोड खूप क्षुल्लक आहे याचीही जाणीव त्यांना असते.पण सतत असं त्याच व्यक्तीने सांभाळून घेणं कितपत योग्य आहे…??त्या व्यक्तीला सहनशक्ती नावाचा काही प्रकार असतो की नाही…??
अरे , असं म्हणतात की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये…मलाही हेच सांगायच आहे की एकच जण जर नातं सांभाळतोय तर सारख त्यालाच सांभाळायला लावायच का…??
तर नाही…. नातं हे एक असलं तरी ते दोघांच असतं.त्यामुळे ते सांभाळणं हेही दोघांच काम असतं.आणि ते दोघांनी मिळून सांभाळावं. त्याने नात्यातील ओढ आणि ओलावा कायम टिकून राहतो.नाहीतर एकच जण कायम नाती सांभाळत राहिला तर नात्यातील ओढ केव्हा संपेल कळणारही नाही. ओढ संपून ओढाताण निर्माण होईल. आज तु सांभाळलस.., उद्या मी सांभाळून घेईल असा दिलासा देणारा विश्वास नात्यात हवा.आणि तो प्रत्येकाने जपायलाही हवा.
कारण कुठल्याही नात्यात नात्यांना सांभाळणं ही दोघांची जबाबदारी असते.कदाचित जबाबदारीने वागणं हेच प्रेम असावं.त्यामुळे जबाबदारीची जाणीव ही दोघांमध्येही भरभरून असायला हवी. त्याने नाती सांभाळणं सोपं जातं.एकच जण नातं सांभाळत राहिला तर त्याची केव्हा दमछाक होईल कळणार नाही. त्यालाही वाटत असणारच की आपल्यालाही समजून घ्यावं ,सांभाळून घ्यावं.दोघांनी मिळून नात्यातल्या समतोल साधणं गरजेचे आहे. एकाने आयुष्याचा पसारा मांडला तर दुसऱ्याने तो आवरला तर चांगलच आहे. पण प्रत्येकवेळी हेच चित्र असणं म्हणजे खूप चुकीच आहे. कधीतरी दुसऱ्यानेही सांभाळून घ्यावं.
मग ते नातं कोणतही असो , नवरा-बायकोचं किंवा मित्र-मैत्रिणीच…! सांभाळून घेणं दोघांना जमायला हवं. आपण अशी गोड गोंडस नाती पाहत असतो की जिथे एकच जण सारखं समजून सांगतो , समजून घेतो.पण आपण त्याच्यापलिकडे जाऊन कधी विचार करतो का…?? की यालाही कोणीतरी समजून घ्यायला हवं कधीतरी…?अगदी साहजिकच आहे… कधी तु , कधी मी….असं प्रत्येकाला वाटत असणारच…!
राग-रूसवा , वाद-विवाद , गैरसमज प्रत्येक नात्यात होतात.पण वेळीच त्यांना सांभाळून घेतल नाही तर ते अवघड होऊन बसतं.त्यांना सांभाळणं नंतर मात्र कठीण जातं.पण अशावेळीही एकच व्यक्ती सांभाळून घेत असेल तर…..त्या व्यक्तीला जबाबदारीच ओझं वाटता कामा नये.कारण ओझ्याने माणूस दडपून जातो.त्याला जगायला ओढ हवी असते ,ओझं नाही…! त्यामुळे सांभाळून घेताना अशा प्रकारे सांभाळून घ्या की त्या जबाबदारीच कोणालाही ओझं वाटणार नाही.आणि हो…दोघांनी सांभाळून घ्यायला शिका.कारण एकटं सांभाळायच म्हणजे काही एकट्याने खाऊगल्लीत जाऊन खाण्यासारखी ही गोष्ट मुळीच नाही.
मग मित्रांनो , नेहमीच एकटं नातं सांभाळत असाल तर…थोडं समोरच्याला समजून सांगा.नात्यांची परिभाषा नेमकी काय असते ? याची जाणीव त्यांच्यामध्ये रूजवायचा प्रयत्न करा. आणि दोघांनी मिळून नातं सांभाळायला शिका…..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


