विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे..
जागृती सारंग
सूरज ना बदला, चाँद ना बदला
ना बदला रे आसमान,
देख तेरे संसार की हालत
क्या हो गयी भगवान,
कितना बदल गया इन्सान,
कितना बदल गया इन्सान।
नास्तिक चित्रपटाच्या गाण्याचे हे बोल किती परफेक्ट लिहिलेले आहेत. माणसं किती बदलली आहेत. जमाना बदल गया है, जमाने के साथ साथ चलना चाहिये हे खरं असलं तरी किती तरी गोष्टी लोकांनी आज नको इतक्या अंगवळणी पाडल्या आहेत.
पूर्वी मुलं-मुली एकमेकांचं प्रेम नजरेने व्यक्त करत, नंतर चिठ्ठीचा जमाना आला, नंतर कधीतरी चोरून एखादी भेट, नंतर लँडलाईनच्या काळात ब्लँक कॉल किंवा कॉलवर बोलून झाल्यावर राँग नंबर होता हे घरच्यांना सांगणं व्हायचं. पुढे पुढे मानलेला भाऊ वा मानलेली बहिण या नावाखाली भेटी गाठी होणारा जमाना आला, नंतर सरळ सरळ मित्र किंवा मैत्रीण म्हणून सांगण्याचा जमाना, आता तर टिंडर, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सएॅपचा जमाना आणि या जमान्यात बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसणं म्हणजे कमीपणाचं लक्षण मानलं जात आहे.
परंतू आता जमाना प्रचंडच बदलला आहे. पूर्वी एक नजरानजर झाली तरी पोटात प्रेमाची फुलपाखरं बागडू लागायची, नंतर शेकहँड करण्यासाठी धरलेला हात स्वर्गसुख वाटायचं, नंतर हातावर किस करणं, कपाळावर ओठ टेकवणं, एक जादू कि झप्पी असं करत करत मुव्ही पाहण्याच्या निमित्ताने थिएटरच्या काळोखात एकमेकांनी किस करण्यापासून ते आत्ता आत्ता पहिली डेट कॉफी आणि दुसरी डेट ओयो रूम बुक करण्यापर्यंत हा प्रेमाचा प्रवास जमाने के साथ साथ बदलत गेला आहे.
सध्या खरं तर आकर्षणालाच प्रेम समजलं जात आहे. एकमेकांना एकमेकांचे दोष कळू लागले कि प्रेम संपत जातं आणि आकर्षण संपलं की ब्रेक अप अगदी सहज केले जातात. मग ते नातं शरिर संबंध झाले असतील तरीही सहजपणे संपुष्टात येतं! अफेयर, ब्रेकअप, पॅचअप, बॅकअप हे सगळं हल्ली सहज स्वीकारलं जात आहे.
स्वातंत्र्याच्या नावाखाली जिथे तिथे स्वैराचार घडत असल्याचंच दिसून येत आहे. बरं हे फक्त मेट्रो सिटीपुरतं मर्यादित नाही तर अख्खा भारत देशच प्रत्येक गोष्टीत पाश्चात्य संस्कृतीकडे वळत चालला आहे. शिक्षणाने वैचारीक विकास होतो आणि म्हणूनच आपल्याकडे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी लव्ह मॅरेज, इंटरकास्ट मॅरेज, घटस्फोट, सिंगल पॅरेंटींग, पुनर्विवाह या आणि अशा बऱ्याच गोष्टींना आता सहजपणे स्विकारलं जात आहे.
हे सर्व बदल स्वागतार्ह आहेतच परंतु आजही बहुतेक पालक त्यांच्या समाजाच्या भीतीपोटी किंवा अजून काही वेगळ्या कारणांपोटी आपल्या मुलांना प्रेमविवाह करू देत नाहीत. या कारणामुळे मुला मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध आई वडिलांनी ठरवलेल्या स्थळासोबत अरेंज्ड मॅरेज करावे लागते. खरं तर लग्ना नंतर आपला भूतकाळ विसरून किंवा तो मागेच सोडून नवी सुरूवात नव्या जोडीदारासोबत प्रामाणिकपणे करायला हवी.
जर ते जमणार नसेल आणि लग्न ठरत असताना तुम्ही पालकांना विरोध करू शकत नसाल तर निदान ज्या व्यक्तीसह लग्न जुळत आहे त्या व्यक्तीला एकांतात भेटून या प्रकरणाची कल्पना द्यावी आणि त्या व्यक्तीला लग्नास नकार देण्यास सांगावे. जेणेकरून लग्नानंतर तुम्ही स्वतःसोबत त्या व्यक्तीलाही दुःखी होण्यापासून वा एकमेकांची आयुष्ये उद्ध्वस्त करण्यापासून वाचवू शकता.
बहुतांशवेळा मुलं मुली पालकांच्या प्रेशरमुळे वा इमोशनल ड्रामामुळे लग्न करतात पण लग्ना नंतर जोडीदाराला कुठल्याच प्रकारे सुखी ठेऊ शकत नाहीत. आणि संसाराचे तिन तेरा वाजत जातात. म्हणजेच लग्नानंतरही आधीच्या प्रियकर प्रेयसी सोबत संपर्क ठेऊन आपल्या गरजा तिथे भागवल्या जातात आणि ज्या व्यक्तीची काहीच चूक नसते ती व्यक्तीसुद्धा आपल्या मानसिक, शारिरीक सुखासाठी वेगवेगळे पर्याय शोधू लागते.
अर्थात प्रत्येकजण हे वेगळे मार्ग शोधतोच असं नाही. काहीजणं या घुसमटीत त्यांच्या स्वः तत्वापायी किंवा चार लोकं काय म्हणतील किंवा घरच्यांच्या आदरापायी, संस्कारापायी असेच गुदमरत सहन करत करत जगत राहतात. सोशल मिडियामुळे या गोष्टी हल्ली सहज शक्य होतात. घरातल्या व्यक्तीने दुर्लक्ष केलेलं असलं की बाहेरच्या अनोळखी व्यक्तीने कणभर स्तुतीसुमने उधळली तरी मणभर उत्साह अंगात सळसळू लागतो.
मग या सर्वाची सुरूवात मैत्रीपासून सुरू होऊन मैत्रीच्या पलिकडलं आणि प्रेमाच्या अलिकडलं नातं इथे येऊन थांबतं. मग या आवडणाऱ्या व्यक्तीला मितवा हे नाव दिलं जातं. हा गुंता इतका वाढत जातो कि एकमेकांच्या मनापासून तनापर्यंत कधी ताबा घेतला जातो याचं भानसुद्धा राहत नाही. या सर्व गोष्टींना इतकं सहजा सहजी स्विकारलं जातं की यात काही गैर आहे हेच मुळी या लोकांना वाटत नाही.
आपल्याला आपल्या हक्काच्या जोडीदाराकडून मानसिक, शारिरीक सौख्य, समाधान मिळत नाही मग आपण आपलं मन मारून का जगायचं? आपण आपले आयुष्याचे क्षण दुःखी कष्टी होत वाया का घालवायचे असे म्हणत आपापली आयुष्यं कुणा तिसऱ्याच्या स्वाधीन सहज केली जातात. आत्ताच्या क्षणात जगूया, पुढचं पुढे बघू किंवा एकच आयुष्य आहे का रडत कुढत जगायचं, नवरा असं गैर वागला मग मी का वागू नये? असं म्हणत क्षणिक सुखासाठी प्रत्येकजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैरपणाने वागत आहे.
हे मैत्रीच्या पलिकडे आणि प्रेमाच्या अलिकडे असणारं एक तरी नातं असावं, आपल्यालाही मितवा असावा, आपल्या भावनांना समजून घेणारा, आपल्या पार्टनरव्यतिरीक्त सर्वार्थाने आपल्याला समाधानी करणारा एक सोलमेट असावा हे हल्ली फॅशनेबल झालं आहे. बरं काहीजणं उघडपणे या सर्व गोष्टी करतात तर काही जणं आपल्या जोडीदाराची फसवणूक करून असे वागत असतात.
पुरूष असो वा स्त्री, माणसं हि भाकरीसोबत कौतुकाची सुद्धा भुकेली असतात. हक्काच्या जोडीदाराने वेळ नाही दिला वा कौतूक नाही केलं आणि नेमकं कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने हे केलं की हक्काचं नातं दुरावण्यास सुरूवात होते. परंतु प्रत्येक वेळी हे असंच असेल गरजेचं नाही. कारण लव्ह मॅरेज करून सुद्धा, बायको नाकी डोळी नीटस नव्हे तर फिगर मेन्टेन्ड रूपवती असूनसुद्धा बाहेर अजून एखादं प्रकरण शोधलं जातं.
कुणी दुखावलेली व्यक्ती सापडली किंवा एकाकी पडलेली व्यक्ती आहे हे समजलं की हि माणसं खांदा द्यायच्या बहाण्याने आधाराचे चार बोल ऐकवून सहानुभूती दाखवत समोरच्याचा फायदा उचलू पाहतात किंवा मी आहे ना म्हणत समोरच्याला स्वतःमधे गुंतवत जातात. प्रेम हे कुणासोबतही आणि किती वेळाही होऊ शकतं, प्रेमाला बंधन नसतं, प्रेमाला जात नसते, प्रेम आहे म्हणून लग्नच केलं पाहीजे असं गरजेचं नाही अशी विशेषणं चिटकवत. तसेच हे विवाहबाह्य संबंध कसे चुकीचे नाहीत हे पटवण्याचा कल सर्रास दिसून येतो.
बऱ्याचदा पोलिस, मिडिया, डॉक्टर, फोर्स, आयटी क्षेत्र, बिझनेस, इत्यादीसारख्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे या लोकांना आपल्या पार्टनरला, घरादाराला योग्य तो पुरेसा वेळ देता येत नाही. अशावेळी जोडीदाराच्या इच्छा अपुऱ्या राहतात. पूर्वी या गोष्टी सांभाळून घेतल्या जात होत्या. हल्ली लोकांना या गोष्टीमुळे म्हणा किंवा विवाहबाह्य संबंध दाखवणाऱ्या टिव्ही सिरियल्स वा कलंकसारखे चित्रपट, अनैतिक संबंधावरच्या शॉर्टफिल्म्स म्हणा अथवा सभोवतालचा मित्रपरिवार म्हणा या सर्व गोष्टी व्यभिचाराला प्रोत्साहन करण्यास कळत नकळत हातभार लावत असतात.
परंतू हिच लोकं सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल सारख्या सिरियल्स पहायला विसरतात का ही देखिल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण या सर्व अनैतिक संबंधांचा अंत अत्यंत वाईटच असतो. कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं तर कुणाचातरी एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याची चूक नसतानाही संसार उध्वस्त झालेला असतो, कुणीतरी वेड्यासारखं आयुष्य भरकटत जगतं हे का विसरून जातात.
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुखी नसाल तर एक तर कायदेशीर रीत्या काडीमोड घेऊन समोरच्याला त्याची नुकसानभरपाई देऊन अर्थात त्याच्या आयुष्यातील मानसिक, भावनिक भरपाई भरून देता येत नाही पण आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तुम्ही तुमच्या नव्या नात्याला सुरूवात करावी. एकाला फसवून एकीकडून आर्थिक फायदा घेऊन दुसऱ्या दगडावर पाय ठेवून उभे राहू नये. या सर्व गोष्टींचा कळत नकळत घरातील मुलांवर म्हणजेच पुढील पिढीवरही अत्यंत वाईट परिणाम होत असतो. काहीही न करता पुढची पिढी आपणच वाया घालवत असतो.
नियतिच्या फेऱ्यांमध्ये कधी ना कधी अडकणारच हे अटळ आहे. कोणत्याही कृत्याची, कर्माची फळं याच जन्मी भेटत असतात फक्त इतकंच की कुणाला तरी हा कर्माचा फटका या ना त्या रूपात कधी लवकर बसतो तर कधी कुणाला उशीराने बसतो..! आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत पण विदेशात आपल्या संस्कृतीवर सखोल अभ्यास केला जातो आणि आपल्या संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे हे ही आजच्या घडीचे वास्तव आहे.
वेळीच सावध होणे गरजेचे आहे. प्रत्येक फॅशन चांगलीच असते असे नाही. स्त्रीयांनी पुरूषांसारखे कपडे घातले तरी त्याला स्त्रिलिंगी टच असतो म्हणून स्त्रिया त्यात सुंदर दिसतात पण फॅशनच्या नावाखाली पुरूष स्त्रियांच्या कपड्यांना, साड्यांना पुरूषी टच देऊन ते वापरू शकत नाहीत हे ध्यानात यायला हवं. म्हणूनच विवाहबाह्य संबंधांची फॅशन लवकराच संपुष्टात यायला हवी.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Wow jabrdast
Amazing
अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा सुंदर लेख!
Tumhe agdi ani sahaj tumcha shubh vichar mandla ask chya jagat manuski la dhair rHilel Nahi