पतीदेव आपल्या मूलभूत गरजांकडे का दुर्लक्ष करतोय, याची काय कारणे ??
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
कुठलही नातं हे पवित्र असतं अगदी तसचं नवरा-बायकोचं नातं सुद्धा पवित्र आणि सुंदर असतं.दोन मनांच , आत्म्यांच इथे मिलन होत असतं.विश्वासाच्या जोरावर हे नातं अधिक फुलतं.आणि नवरा-बायको म्हणजे संसाररूपी रथाची दोन महत्त्वाची चाकं…आणि ही दोन्ही चाकं जर मजबूत असतील तर हा संसाररूपी रथ सुरळीतपणे चालत रहातो.
त्यामुळे दोन्ही चाकं मजबूत असणं आवश्यक आहे.पण नवरा बायको म्हणजे केवळ संसार नव्हे…! त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. विशेषतः गरजा….आपल्याला मानवाच्या मूलभूत गरजा माहीत आहेत. पण जशा मानवाच्या मुलभूत गरजा असतात तशाच एखाद्या नात्यातही त्या त्या व्यक्तीच्या गरजा असतात.काही शारीरिक , मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात.आणि त्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो.विशेषतः
या विषयानुसार बोलायच झालं तर बायकोच्या काही मुलभूत गरजा असतात.आणि त्याकडे नवरा मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो.आणि कधी कधी याच ‘Basic ‘ गोष्टी समजून घेतल्या नाही तर बायको कुठेतरी हिरमुसते.म्हणून नवऱ्याने अशा मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. खरच कुठल्याही नात्यात दोघांनी दोघांना एकमेकांच्या कलाने समजून घेणे खूप महत्त्वाचे असते.
आणि हा समजुतदारपणाच नाती टिकून ठेवतो. नाहीतर नाती तुटायला असा कितीसा वेळ लागतो…?? आता जितकी नाती समजुतदार आणि सुंदर आहेत तितकीच काही अंशी काही नाती बरोबर अगदी याच्याविरुद्ध आहेत. म्हणजे काही नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये नवरा बायकोच्या मुलभूत गरजांकडे किंवा कोणत्याही गरजांकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. तिला जास्तीत जास्त समजून घेण्याचा , तिला काय हवं..? नी काय नको..? हे जाणून घेण्याचा निश्चितच एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
पण काही नात्यात , नवरा बायकोच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष करतो.का कोणास ठाऊक…?? तिच्या गरजा काय आहेत ? तिला नेमकं काय हवं नी काय नको..?हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही.त्यामुळे बायकोला कुठेतरी हे जाणवत असतं.पण बऱ्याचदा ती व्यक्त होत नाही. अगदी छोट्या छोट्या गरजा असतात बायकोच्या….आणि त्या गरजांकडे आपल्या नवऱ्याच लक्ष असावं इतकीच माफक अपेक्षा असते तिची.ति कमावती असो वा नसो….
पण केवळ आर्थिक गरज पुरवली म्हणजे सगळं झालं का..?? काही ठिकाणी कमावती तर तीपण असतेच ना..? आर्थिक गरजांच्या पलिकडे जाऊनही इतर अनेक गरजा असतात.त्या आपल्या नवऱ्याने समजून घ्याव्या इतकच तिला वाटत असतं. आजकाल स्त्री-पुरुष समानता असली तरी काही घरात बायको सगळी कामं करते.सगळ्यांच सगळं बघते.पण मग रात्री घरी आल्यावर नवऱ्याने फक्त आज खूप दमलेली दिसतेस , जरा आराम कर आता…
असे हक्काने चार शब्द बोलले तरी बायकोचा थकवा थोडा दूर होतो.त्या प्रेमाच्या शब्दांची तिला गरज असते. इतकच नाही तर कधी कधी नवऱ्याने फक्त प्रेमाने कुशीत घ्यावं , हक्काने एक मिठी मारावी , आणि थोडीफार मायेने विचारपूस करावी इतकी साधी सरळ अपेक्षा असते.खरं तर ही तिची प्रामाणिक गरज असते.तिला या गोष्टीतून दहा हत्तींच बळ सहज मिळायला सोपं जातं.
नवरा येतो , सगळ्या गोष्टी करून झाल्यावर झोपतो याला काही अर्थ नाही… त्याने तिच्याशी किमान थोडा वेळ तरी बोलावं , हि तिची गरज असते. तिला संवाद साधायचा असतो.बरच काही सांगायच असतं.पण तिच्या या गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही. बऱ्याचदा तुझं तु बघ…तुला काय आणायच तु आण…हो पण माझ्या गोष्टी आणायला विसरू नकोस असं म्हणणारेही कमी नाहीत.
पण , नवरा कधीच म्हणत नाही की , तुझ्या गोष्टी आणायच्या आहेत नं (अगदी रूमालापासून ते तिच्या ‘Periods मधील गोष्टींपर्यंत) , तर जाऊयात आपण दोघेही… माझी काही हरकत नाही.अशा या सोबतीची तिला गरज असते.मानसिक , शारीरिक ,आर्थिक या व्यतिरिक्त भावनिक गरजा तिलाही असतात.आणि त्याकडे मात्र काही नवरे दुर्लक्ष करतात.आता का दुर्लक्ष करतात तर ….,खरं तर ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या त्यालाच माहीत…..!
पण तरीही सांगायच झालं तर……नवरा दिवसभर काम करून थकून जातो , तेव्हा त्याला आल्यावर केवळ विश्रांती हवी असते.कधी एकदा घरी जाऊन झोपतो असं त्याला होत असावं.आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफीस असतं म्हणून , उद्या ऑफीस आहे गं , लवकर उठायचय , आत्ता झोपूदे , नंतर बोलू….असं बोलून तो खरच कळत नकळतपणे बायकोच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतो. सुट्टीच्या दिवशी कधीतरी मग , आज सुट्टी आहे तर मला आराम करायचाय , आपण नंतर निवांत जाऊयात , आत्ता तु जाऊन ये… , किंवा मग आज एकच दिवस मिळालाय , तर जरा मित्रांसोबत बाहेर चाललोय , तिकडून आलो की आपण बोलू , आपण जाऊ असं नवरे अनेकदा बोलून जातात.
तुझ्या गोष्टीतल मला काही कळत नाही किंवा मला काय कळणार…? असं म्हणून कितीदा टाळतात तिला….! असही अनेकदा घडतं की , आत्ता मी खरच कंटाळलोय गं , तुला माहीत आहे आत्ता मला कशाची गरज आहे , बाकी मला आत्ता काहीच नको गं , समजून घेणा…असं म्हणून शारीरिक गरजा भागवतो , पण कधीकधी तिच्या काही छोट्या छोट्या गरजा नवरा मात्र दुर्लक्षित करतो.
किंवा त्याच्याकडून अनावधानाने त्या गरजा दुर्लक्षित होतात.कदाचित कामावरचा ताण – तणाव , होणारी दमछाक , होणारी चिडचिड ….अशा अनेक गोष्टी किंवा अशी अनेक कारणं यामागे असु शकतात. आणि एवढच नाही तर…या सगळ्या गोष्टींमधून त्याची अर्धवट होणारी झोप , सततची चिडचिड , लक्ष विचलित होणे , अशी अनेक कारणं याला जबाबदार आहेत.
बाहेर कुठेतरी काहीतरी चालू असेल , मग बाहेरच्या जाळ्याची काळजी घेत असेल वगैरे वगैरे असं आपण नेहमीच म्हणू शकत नाही कारण आजही काही प्रामाणिक नवरे अजूनही आहेत. पण , इतकच की नवऱ्याने या धकाधकीच्या जीवनात बायकोच्या मुलभूत किंवा कोणत्याही छोट्या छोट्या गरजांकडे दुर्लक्ष करू नये.
किंवा तसं होत असेल तर किमान त्या गोष्टींकडे लक्ष कसं देता येईल याचा विचार त्याने केला पाहिजे.फार काही नाही तर…थोडा वेळ तिला दिला पाहिजे.तिलाही थोडं समजून घेतलं पाहिजे.बाकी नातं अधिकाधिक फुलेल यात शंका नाही…..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला