आई-वडिलांच्या भांडणाचा मुलांवर काय परिणाम होतो?

आई-वडिलांच्या भांडणाचा मुलांवर काय परिणाम होतो?


डॉ सुमेधा मनीष हर्षे


“नेहा काय चालू आहे?
एवढीही अक्कल नाहीये का तुला?”
“निखिल, मला तर नाहीये अक्कल पण तुझं काय?”
“हे बघ नेहा! माझी अक्कल काढू नकोस.”
“मग, तुलाही अधिकार नाहीयं माझी अक्कल काढायचा!”
“आता चूप बसतेस की…”
“काय करणार आहेस तू? हात उचलणार आहेस? तेवढंच बाकी राहिलं होतं!”
दोघांचेही आवाज खूप चढले होते. दोघंही माघार घ्यायला तयार नव्हती.
किया, त्यांची ५ वर्षांची मुलगी, एका कोपऱ्यात भेदरून उभी होती. तिची काय अवस्था होत असेल! कल्पनाही करवत नाही.
ही अशी दृश्यं आजकाल घरोघरी दिसताहेत. नवरा-बायको मधले बेबनाव वाढत चालले आहेत. घटस्पोटांचेही प्रमाण खूप वाढले आहे. पण त्यामुळे ही कोवळी मुलं भरडल्या जाताहेत, त्यांचं भावविश्व उध्वस्त होतंय.

आई-वडिलांचे संबंध सामान्य नसलेल्या घरातली मुलं (०-१२ वर्षांची) खूप अस्वस्थ, केविलवाणी होऊन जातात. मुलांच्या ह्या कोवळ्या वयात त्यांना आई-वडीलांची भावनिक जवळीक, त्यांची माया, भरपूर वेळ आणि घरामधले आनंदी वातावरण एवढंच हवं असतं.

कारण ह्याच वयातच त्यांची भावनिक, बौद्धिक, शारीरिक वाढ तसेच व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. जर पोषक वातावरण मिळालं नाही तर ही मुलं अकालीच कोमेजून जातात. आई वडिलांच्या भांडणाचा ह्या मुलांवर अतिशय वाईट परिणाम होतो.

ज्या वयात आनंदी राहायचं, खेळायचं, बागडायचं त्याच वयात त्यांच्यावर मानसिक ताण येतो. सतत भांडत असलेले आई-वडील, त्यांच्यात असलेला अबोला, घरातलं बिघडलेलं वातावरण ह्यामुळे ह्या मुलांच्या सर्वांगीण वाढीस अडथळा येतो.

एकमेकांची उणीदुणी काढत असलेले, एकमेकांवर जोरजोरात ओरडणारे आई-वडील बघून या मुलांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसते. ते सतत भितीच्या सावटाखाली वावरत राहतात. एक प्रकारची असुरक्षितता त्यांच्या मनात निर्माण होते. या सर्व ताणांमुळे मुलांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

* मुलांची झोप कमी होते. ते शांत झोपूच शकत नाहीत.
* दहा अकरा वर्षांची मुलं सुद्धा अंथरूण ओलं करतात.

* शाळेत, अभ्यासात त्यांचे लक्ष एकाग्र होत नाही.
* ही मुलं उदास राहू लागतात.

* एकलकोंडी व्हायला लागतात, मित्र-मैत्रिणींपासून तुटत जातात.
* एवढ्या लहान वयात नैराश्येने ग्रासली जातात.
* त्यांचा नात्यांवरचा विश्वास हळूहळू उडू लागतो.

मुलं घरातल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात, त्यातूनच शिकतात. जर लहानपणापासूनच ते नात्यांमधला गोडवा, एकमेकांकरता असलेली काळजी, प्रेम बघत असतील तर नात्यांमधला बळकटपणा त्यांच्या मनात रूजत जातो. मग ही मुल़ं भविष्यात सुदृढ नात‌ं बनवू शकतात. मात्र, जर ती नात्यांमधला कडवटपणा अगदी लहान वयापासूनच अनुभवत असतील तर त्यांचा नात्यांवरचा विश्वास उडून जातो.

* ते भविष्यात नातं बनवायला घाबरतात किंवा नात्यांबाबतीत त्यांच्यात खूप नकारात्मकता निर्माण होते.
* बहुतांश वेळा ही मुलं भविष्यात नाती टिकवू शकत नाहीत, नात्यांमध्ये पुढे जाऊ शकत नाहीत, पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाहीत.
जसजशी ही मुलं वयात यायला लागतात तशी या मुलांमध्ये लहानपणापासून मनात घर करून बसलेली भीती, असुरक्षितता वाढत जाते.

* मग ह्या मुलांना स्वतःच्या कोषात रहायला आवडतं.
* ती घुमी होतात, स्वतःला व्यक्त करायला घाबरतात.

* त्यांचं व्यक्तिमत्व फुलू शकत नाही, आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही.
* ती न्यूनगंडाने पछाडल्या जातात.

* ह्याच्या विपरित, काही केसेस मधे ही मुलं आक्रमक होतात. त्यांच्या मनात सर्व जगाविषयी राग भरला असतो. ती एखादा गुन्हा करायलाही मागे पुढे पहात नाही.

आई- वडिलांच्या प्रेमाची कमतरता मग त्यांना आयुष्यात नेहमी जाणवत रहाते.

मुलं वाढवणं ही दोघांची जबाबदारी असते. निसर्गानेच दोघांमध्ये ते काम वाटून दिलेलं आहे.
म्हणून

* आई वडिलांनी शक्यतोवर आपापसातले वादविवाद परस्पर सामंजस्याने मिटवावेत.
* मुलांच्या चांगल्याकरता दोघांनीही थोडी माघार घ्यावी.

* आपआपले अहंकार थोडे बाजूला ठेवावे.
* मुलांसमोर भांडणं टाळावीत.

* जर माघार घेणे शक्यच नसेल, दुसरा मार्गच नसेल तर घटस्पोटाचा निर्णय घेतांना मुलांना विश्वासात घेऊन, परिस्थितीची जाणीव त्यांना समजेल अशा शब्दांत करून द्यावी.

मुलांच भावविश्व एखाद्या शांत जलाशया सारखं असतं. ज्यात आजूबाजूच्या सृष्टिचं प्रतिबिंब पडत असत. एका छोट्याशा दगडानेही त्यावर तरंग उठतात. तसंच मुलांचाही असतं. थोड्याशा ताणानेही त्यांच्या भावसृष्टीत खळबळ माजते, तरंग उठतात. आणि मग मनाचा खोल डोह ढवळून निघतो. तिथली शांतता भंग पावते. मनात उलथापालथ होते.

तेव्हा पालकांनो,
आपल्याला ह्या फुलांना जपायला हवं, त्यांना फुलवायला हवं, तरच सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा, समाधानाचा बहर येईल.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.