Skip to content

नैसर्गिक आपत्तीमधील मानसिक आरोग्य – कारणे व उपाय !

नैसर्गिक आपत्तीमधील मानसिक आरोग्य – कारणे, स्वरूप व उपाय याबाबत प्राथमिक माहिती.


डॉ. अनिमिष चव्हाण

एम्. डी. (मनोविकारशास्त्र), सातारा.


पाऊस ओसरला. पाणी ओसरत आहे. आता हळूहळू सहानुभूती आणि मदतीचा ओघही ओसरेल. न्यूज मीडिया आणि सोशल मीडियावर आज महाराष्ट्रात असलेल्या पूर परिस्थितीबाबत चालू असलेले चर्चांचे वादळ आणि चिखलही स्वाभाविकच यथावकाश ओसरेल. पण इतक्या सहज ओसरणार नाही आहे तो पूरग्रस्तांच्या मनातील काळोख.

पूर-वादळ-भूकंप यांसारख्या आपत्ती माणसांना आणि पशू-पक्षांनाही दिग्मूढ करून टाकतात. परिस्थितीने दिलेल्या फटक्यांचे मोजमाप अशक्य असते. आपण काय-काय गमावले आहे आणि आता पुढे काय-काय वाढून ठेवले आहे याची नुसती कल्पना करतानाही जीव मोडकळून पडतो. आणि नेमक्या अशाच वेळी एकाकीपणा चाल करून येतो.

आपत्तीग्रस्त व्यक्ती कित्येक महिने या भयंकर मानसिक हलकल्लोळातून जात असतात. त्यातून निम्मे-अधिक कसेबसे सावरतात तर उरलेले मानसिक आजारांचे शिकार बनतात. सर्वसाधारण समाजाच्या तुलनेत आपत्तीग्रस्त समाजात वेगवेगळ्या मानसिक समस्यांचे आणि आजारांचे प्रमाण दुप्पट ते तिप्पट आढळते.

केवळ आपत्तीचे प्रत्यक्ष बळीच नव्हे, तर आपत्तीतील भय, वेदना आणि निराशेचे जवळून दर्शन झालेल्या व्यक्ती आणि आपत्ती निवारण करण्यासाठी झटलेल्या संवेदनशील व्यक्ती देखील भावनिक आघात झेलत असतात. योग्य आणि पुरेशा मानसिक आधाराअभावी त्यांचीही मोठी मानसिक होरपळ होऊ शकते. लहान मुले, वयोवृद्ध, अपंग, आजारी व्यक्ती, स्त्रिया, अल्पसंख्यांक, कौटुंबिक आधार गमावलेल्या आणि निम्न आर्थिक स्तरातील व्यक्ती यांना मानसिक आघात अधिक प्रमाणात होऊ शकतात.

वेळीच योग्य मानसिक मार्गदर्शन न मिळाल्याने भावनिक आघात सोसणाऱ्या व्यक्ती नैराश्य, आत्मघात, चिंता, पॅनिक (अचानक भयकंपित होणे), सोमॅटायझेशन (भावना व्यक्त करण्याऐवजी शारीरिक तक्रारीत रूपांतर), मनोकायिक आजार, व्यसन यांसारख्या मनोविकारांना बळी पडू शकतात. अकारण अपराधीभाव, सर्व काही गमावल्याची भावना आणि परिस्थितीपुढे हतबल झाल्याची भावना या व्यक्तींमध्ये ठायीठायी दिसू लागतात.

आपत्ती ओसरल्यानंतर काही आठवडयांपासून ते तीन-पाच वर्षांपर्यंत मानसिक आघातांचे दुष्परिणाम दिसत राहतात. आपत्तीमुळे झालेली हानी, गमावलेले कुटुंबिय आणि आपत्तीशी झुंजलेला काळ यांचे प्रमाण जितके अधिक तितकी मानसिक झुंजही मोठी होत राहते! म्हणून, आपत्ती व्यवस्थापन करताना तातडीच्या तसेच दीर्घकालीन मानसिक आधार यंत्रणांचे नियोजन होणे अत्यावश्यकच आहे.

आपत्तीमुळे मानसिक आजारी पडणाऱ्या व्यक्ती या असाधारण परिस्थितीचा सामना करणाऱ्या साधारण व्यक्तीच असतात. त्यांना गरज असते तुमच्या-आमच्या सोबतीची. आधाराची. ऐकून आणि समजून घेण्याची. त्यांच्यासोबत घरा-दारांत साचलेला गाळ उपसता उपसता मना-मनांत दबलेल्या भय आणि दुःखाचा उपसा करणे तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.

मानसिक आधार देण्याची ही प्रक्रिया अनेक अनौपचारिक मार्गांनी शक्य आहे. अंगणातील गप्पा, अनुभव कथन, आरोग्य शिक्षण, सणवार, योगासने, गाणी, चित्रे, नृत्य, नाट्य, खेळ अशा अनेक साधनांनी मनातील कढ हलके होऊन चुकीच्या मार्गाने जाणारी पावले थोपवली जाऊ शकतात. शिवाय, ज्यांना अधिक मानसिक उपचारांची गरज आहे अशा व्यक्ती आणि मुले ओळखून त्यांना असे उपचार मिळवून देता येतात. या संपूर्ण प्रक्रियेत काही भान ठेवण्याची मात्र आवश्यकता आहे. जसे की,

• आपत्तीमुळे हबकून गेलेल्या व्यक्ती कदाचित पुनः पुन्हा आपले वेदनादायी अनुभव सांगत राहतील. त्यांना रोखू नका, बोलू द्या.
• त्यांना उपदेश अथवा प्रेरणादायी भाषण नको; तुमच्या डोळ्यांतील आणि स्पर्शांतील सहवेदनेची ओळख गरजेची आहे.
• काही व्यक्ती वेदना व्यक्त करू शकत नाहीत. त्यांना कोणताही आग्रह न करता तुमचा फक्त वेळ द्या.
• लहान मुले आपलं भय आणि दुःख त्यांच्या परीने सांगत असतात. त्यांना पुरेसं व्यक्त होऊ द्या. लुटूपुटीचे खेळ, चित्रे ही मुलांची भाषा असू शकते.
• मुले आणि मोठी माणसे हळूवारपणे आपापल्या मूळ दिनक्रमाकडे कशी वळतील हे पहा.
• खोटे दिलासे नको, वास्तववादी उपायांची चर्चा करा.
• स्वतःची हतबलता आणि वेदना पोकळ बढायांनी लपवू नका. स्वत:च्या भावनिक आरोग्याची जरूर काळजी घ्या.
• आपत्तीग्रस्त व्यक्तींच्या लहान-सहान समस्या संवेदनशीलतेने समजून घ्या.
• आपल्या आवाक्याबाहेर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी योग्य व्यक्तींची मदत घ्या.
• सर्वच मानसिक समस्या या मानसिक आजार नसतात. त्यामुळे, त्यावरील औषधांचा सर्रास उपयोग टाळा. पण, आवश्यक असेल तेव्हा मनोविकारतज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास कचरू नका.

अशा अनौपचारिक मानसिक आधार यंत्रणेचे मोल आपल्या देशात अनन्यसाधारण आहे. मात्र, योग्य प्रशिक्षण आणि नियंत्रण यांच्या अभावी व्यसने किंवा अंधश्रद्धा बोकाळणारी यंत्रणा माजून आपत्तीची तीव्रता अनेक पटींनी वाढू शकते. म्हणूनच, पाऊस ओसरला तरी आव्हान अजून बाकी आहे! …

ही पोस्ट आपण जरूर शेअर करू शकता.


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!