Skip to content

“अद्याप लग्न न जमलेल्या तरुण-तरुणी आणि शारीरिक आकर्षण.”

“अद्याप लग्न न जमलेल्या तरुण-तरुणी आणि शारीरिक आकर्षण.”


मधुश्री देशपांडे गानू


“शारीरिक आकर्षण”..अत्यंत मूलभूत, महत्त्वाचा पण  फारशी वाच्यता न होणारा विषय. अगदी प्रत्येक सजीवांमध्ये नर-मादी परस्परसंबंध अत्यंत नैसर्गिक आणि प्रजाती टिकून राहण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी गरजेचा आहे. पुनरुत्पादन हा मुख्य हेतू. कोणत्याही सजीवाची भूक ही जशी नैसर्गिक उर्मी आहे त्याचप्रमाणे लैंगिक संबंध ही पण नैसर्गिक ऊर्मी आहे.

मानव सर्व प्राणिमात्रांत प्रगत, बुद्धिमान. पुनरुत्पादन हा जरी शरीरसंबंधाचा मूळ हेतू असला तरीही त्यापासून मिळणारा आनंदही तेवढाच महत्त्वाचा असतो. शरीर मनाच्या आरोग्यासाठी गरजेचा असतो. अगदी पौगंडावस्थेतील प्रत्येक मुला-मुलीला भिन्नलिंगी आकर्षण हे वाटतेच वाटते. अगदी सहाजिक आहे. कुतूहल, उत्सुकता नैसर्गिक उर्मी आहे ही. स्वतःच्या शरीरात होणारे बदल जाणवत असतात. काहीतरी सुप्त पण प्रचंड आकर्षण वाटत असतं. आता तर समलिंगीही समाजाने सामावून घेतले आहेत.

एक तर शरीर संबंध हाच आपल्याकडे “Taboo” आहे. याबद्दल कोणीही मोकळेपणाने बोलत नाही. घरात, बाहेर कुठेही नाही. साधी मुलीला पाळी येते याबद्दलही तिला तिची आई व्यवस्थित शास्त्रीय शिक्षण आधीच देते का?? काहीतरी खुळचट लेबले लावून वेळ मारून नेली जाते. त्या कोवळ्या वयातील मुलीला नीट कळतही नाही. तरी आता परिस्थिती बरीच बदललेली आहे.

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश आता करण्यात आला आहे. पण तेही अगदी योग्य शास्त्रीय शिक्षण देण्यात कमी पडतंय असं वाटतंय. वयात आलेला प्रत्येक मुलगा/ मुलगी आपापल्या पद्धतीने कुवतीनुसार, लपतछपत योग्य किंवा चुकीच्या मार्गाने याबद्दल ज्ञान गोळा करत असतात. परिणामांची तर कल्पनाच नसते.

आता सोशल मीडियामुळे अगदी कसलाही धरबंध राहिला नाही. अगदी कोणत्याही वयातली व्यक्ती, लहान मूल काहीही पाहू शकतंय. कशाचा ताळतंत्र राहिला नाही. सगळेच सुख आत्ता मिळायला हवं. ओरबाडून हवंय.  फक्त ही एकच गोष्ट आयुष्यात महत्त्वाची आहे असा गैरसमज तरुण मुला मुलींचा झाला नाही तरच नवल! 13 14 वर्षाच्या मुलीला ही Boyfriend नसला तर Guilty वाटतं. निसर्ग नियम, सामाजिक नियम, नैतिकता या शब्दांचा मेळ बसत नाही हल्ली. यातूनच बलात्कारासारखे पाशवी, निर्मम, अनैसर्गिक गुन्हे वाढीस लागलेले दिसून येतात.

शारीरिक आकर्षण असणारच. ते नाकारत नाहीच आहोत.  पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी, योग्य वयात, योग्य पद्धतीने झाली तर त्याच्यासारखा आनंद नाही. एखादं नातं हळुवार फुलत गेलं तर त्यातला गोडवा टिकून राहतो. त्याच प्रमाणे शरीरसंबंधांचं ही आहे. त्यातली अवीट गोडी, आनंद, समाधान, तृप्ती, हळूवार एकमेकांच्या संमतीने एकमेकांना आनंद देणारी कलेकलेने वाढणारी हवी. इथे आपण सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाचा विचार करत आहोत. कारण “लग्नसंस्था” ही या घटकासाठी अनन्यसाधारण महत्त्वाची आहे.

आजकाल शिक्षण, करिअर, नोकरी, पैसा , स्टेटस या गोष्टींना अवास्तव महत्त्व आल्यामुळे तरुण-तरुणींचे लग्नाचे योग्य वय पुढे ढकलले गेले आहे. बऱ्याचदा अवास्तव आणि अती अपेक्षांमुळे लग्न ठरत नाहीत. पण निसर्ग त्याचे काम करतोच. वाटणारे भिन्नलिंगी आकर्षण कसे थांबवणार??मग सहज प्रेम प्रकरणं, तात्पुरती नाती निर्माण होतात. शारीरिक आकर्षण आणि शरीर संबंध याला एकूणच एक  Casual/cool स्वरूप आलं आहे.

किती तरुण-तरुणी लग्नापर्यंत धुतल्या तांदळासारखे असतील हा प्रश्नच आहे. आणि खरंच एखादा असेल  तर त्याला जुनाट विचारांचा मानलं जातं. बरं सगळी प्रतिबंधक साधने आज सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे परिणामांना बगल देऊन सहज सगळ्या सीमा ओलांडल्या जातात. आजही “योनिशुचिता” याला आपल्या समाजात नको इतकं महत्त्व आहे. म्हणजे शारीरिक दृष्ट्या सगळी जबाबदारी फक्त स्त्रीवर. कारण तिला परिणाम भोगावे लागतात. तिला वाईट ठरवले जाते. खरं तर सहभाग दोघांचाही असतो.

सध्या तर प्रेमविवाहच जास्त होतात. एखाद प्रेमाचं नातं जोपासताना, पुढे नेताना त्या दोन व्यक्तींची समज, नात्याचं गांभिर्य, नात्याची जबाबदारी, त्याचे परिणाम या सगळ्याचा विचार व्हावा लागतो. नात्यामध्ये किती पुढे जायचं याच्या सीमा दोघांनीही आखायच्या असतात. बरेचदा मुलांना हे सगळं हवं असतं पण जबाबदारीची वेळ आली की ते हात झटकतात. आणि मोकळी होतात. अशा वेळी मुलीला फसवणुकीची भावना होते. कित्येक नाती फक्त शरीरसंबंधापुरती असतात. तिथेच संपतात. कारण इंटरेस्ट संपलेला असतो.

अद्याप लग्न न झालेल्या तरुण-तरुणींना पुढे सगळ्याच गोष्टींना उशीर होत जातो. शरीराची पुनरुत्पादनाची कार्यक्षमता कमी होते. अपत्ये उशिरा जन्माला आली तर त्यांचं संगोपन करायला शरीर, मनाची  सक्षमता आणि समर्थता कमी पडू शकते. वेळेवर लग्न, मुलं असलं की मुलं वेळेवर हाताशी येतात असं घरातील ज्येष्ठ मंडळी पूर्वी सांगत. हल्ली बरीच लग्न झालेली जोडपी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेताना दिसतात.

अद्याप लग्न न झालेल्या तरुण-तरुणी शारीरिक आकर्षणाची ओढ असूनही मन मारून जगत असतात. निसर्ग आपलं काम करत असतो. त्यामुळे वेळेवर योग्य गोष्टी होणं, मिळणं एकूणच शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी असतं. प्रौढ वयात जर लग्न झालं तर एक तर तडजोड करावी लागते आणि शारीरिक आकर्षण कमी होण्याची शक्यता असते. असे तरुण तरुणी लग्नाळलेले असल्याने अयोग्य व्यक्तीच्या प्रेमात पडून बरेचदा पळून जाऊन लग्न करतात आणि फसतात.

नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते. फसवणूक ही होऊ शकते. आई-वडिलांनीही अवास्तव अपेक्षा न करता थोडे तडजोडीचे धोरण ठेवून योग्य वयात मुला-मुलींची लग्नं करून दिली पाहिजे. पण त्यांच्या मनाविरुद्ध नाही. म्हणजे केवळ शारीरिक आकर्षणाचं अवास्तव महत्त्व वाटून तरुण-तरुणी चुकीचा मार्ग पत्करणार नाहीत. आजही कित्येक तरुण-तरुणी अतिशय संयमी विचार आणि कृती करणारे आहेतच.

शारीरिक आकर्षण अगदी कोणत्याही वयात वाटू शकते. त्याला वयाचे बंधन नाही. एखाद्या व्यक्तीची शारीरिक पातळीवर प्रचंड ओढ वाटू शकते. पण आततायीपणाने, असंयमित वागण्याने, अविचाराने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. एकूणच लग्न, नवरा-बायकोचं नातं हे समाज मान्य, रूढी मान्य, पवित्र, प्रेमाचं मानलं गेलंय. नुसतं शारीरिक आकर्षण न वाटता, दोन मनं एकत्र आली तर शरीर-मनाने आयुष्यभरासाठी जोडली जातात. आणि यातच खरे समाधान आहे…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!