नवरा बायकोच्या भांडणात ज्याला सुखी व्हायचंय त्याने आधी माघार घ्यावी!
जागृती सारंग
अरेंज्ड मॅरेज असो वा लव्ह मॅरेज, एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्यावर हि जोडपी नवरा बायकोच्या लेबल ने ओळखली जातात. हे मेड फॉर इच अदर होण्याआधी नव्या नवलाईच्या दिवसात अगदी मॅड फॉर इच अदर असतात. एकदा का नवी नवलाई सरली आणि गाडी संसाराच्या रूळावर धावू लागली की हे मॅड बिकॉज ऑफ इच अदर कधी होऊन जातात याचं त्यांनाही कळत नाही. Mad because of each other चा प्रवास हा लांब पल्ल्याचा असतो. या प्रवासातला सर्वात मोठा आनंद हा आपल्यासारखा बेभान होणारा प्रवासी भेटण्यात असतो.
मला वेड लागले प्रेमाचे या गाण्यापासून ते मला वेड लागायची पाळी आणली आहेस इथपर्यंतचा प्रवास हा अत्यंत महत्वाचा! दोघांनाही हा प्रवास निभावून नेता आला तर दुनिया या जोडप्यांना Made for each other चं लेबल चिकटवून देतं.
खरंतर भांडणं नाहीत असं एकही घर नसतं किंवा कुठलंच नातंही नसतं. कारण भांडणाला कुठलंही कारण पुरेसं असतं. व पु काळे म्हणतात कि संसार असाच असतो… – लाकडाचा धुर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायची थांबवायचं नसतं. दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते.
लुटूपुटूची भांडणं असायला हवी पण टोकाची नकोत. म्हणतात ना भांडणातूनच प्रेम वाढतं. पण भांडण जास्त काळ लांबवू नये. खरंतर दोघांपैकी कुणालाही हौस नसते भांडण लांबवायची पण नेमकं घडतं असं की कोणी माघार घ्यायला तयार नसतं. जगातल्या कुठल्याच बायकोला वाटत नसतं की आपल्या नवऱ्याचं वाटोळं व्हावं आणि हे प्रत्येक नवऱ्याला कळेलच असं नसतं. यामागे कारणं बरीच असतात जी त्या दोघांमुळे नव्हे तर अवतीभवतीच्या माणसांमुळे लादली गेलेली असतात.
बऱ्याचदा समस्या उद्भवण्याचं कारण असतं एकमेकांना वेळ न देणं! जर नातं फुलवायचं असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवणं, एकमेकांमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणं, एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणं, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांचं कौतूक करणं, एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांच्या दोषांना / अवगुणांना स्विकारणं हे खूप महत्वाचं असतं.
कारण पार्टनरच्या कलागुणांवर भाळणं सहज जमून जातं पण जेव्हा अवगुण माहित पडतात तेव्हा ते स्विकारणं थोडं अवघड जातं. बहुतेकदा समोरच्याला प्रेमात पाडण्यासाठी किंवा लग्नाचा होकार मिळवण्यासाठी काही गोष्टी लपवून ठेवल्या जातात किंवा खोट्या सांगितल्या जातात. हिच कारणं नंतर संसारात धुसफुस होण्यासाठी पुरेशी होतात.
एकवेळ दोष वा अवगुण स्विकारता येतात पण माणसाला आपण फसवले गेलो आहोत हि भावना पचवता येत नाही. प्रेमापोटी पदरी पडलं आणि पवित्र झालं या म्हणी नुसार या फसवणुकीकडे दुर्लक्ष केलंही जातं परंतु त्यानंतरही सतत गृहित धरलं गेलं की समस्या कठीण होऊन बसते.
राईएवढी भांडणं मग कधी डोंगराएवढी होत जातात हे कळतच नाही. सॉरीच्या सुईने आणि कौतुकाच्या धाग्याने नवरा बायकोच्या नात्याच्या तलम वस्त्राचं फाटलेलं भोक वेळीच रफू करावं. एकाने रफू केलं तर दुसऱ्याने त्यावर सुंदर नक्षीकाम करून त्या रफूलाही मिटवून टाकावं. सतत भाडणं होत राहिली तरीही प्रत्येकवेळी एक नवं ठिगळ बसवावं. शेवटी ठिगळांपासून बनलेल्या गोधडीत एक वेगळीच सुंदरता आणि ऊब सुद्धा असतेच ना.
फक्त इतकं लक्षात असू द्यावं की एकानेच सतत फाडत राहू नये कारण ठिगळ लावणारा कलाकार असला तरी तो ही शेवटी माणूसच असतो. निदान सुईत धागा ओवून देण्याइतकी तरी मदत करावी. तलम वस्त्राची मुलायमता आणि सुंदरता निघून गेली तरी ऊबदारपणा जीवंत राहतो. म्हणूनच ज्याला नात्याची किंमत असते किंवा ज्याला सुखी व्हायचं आहे तो आधी सॉरी म्हणून रात गई बात गई या उक्तीने पुन्हा नव्यानं सुरूवात करतो.
परंतु नवरा बायकोच्या रेशमी नात्याला ठिगळं न बसण्यासाठी दोघांनीही काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, जसं की –
▪️दोघातली भांडणं किंवा दोघांचे सिक्रेट्स तिसऱ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. मग ती तिसरी व्यक्ती बेस्ट फ्रेंड, भावंडे वा आईवडील किंवा कुणीही का असेना!
▪️एकमेकांवर अति पझेसिव्ह होऊ नये. एकमेकांचा अपमान करू नये.
▪️कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट वा आजारपण आलं तर एकमेकांची साथ सोडू नये.
▪️एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता समोरासमोर बसून चर्चा करावी.
▪️स्वतःची चूक असल्यास बिनदिक्कतपणे माफी मागावी. कारण माफ करणाऱ्यापेक्षा स्वतःच्या चुकांची कबूली देऊन माफी मागणारा खरं तर खूप मोठ्या मनाचा असतो.
▪सतत चुका करत राहून फक्त सॉरी म्हणत राहण्यापेक्षा झालेल्या चुका परत न होण्यासाठी योग्य ती कृती अंमलात आणावी.
▪️भांडण झाल्यावर समोरच्या व्यक्तीची अपेक्षा काय आहे हे समजून घ्यावं.
▪️स्वतःची चूक असली तरीही बायकोसमोर का झुकावं किंवा नवऱ्याला मुठितच ठेवावं हा अट्टाहास धरू नये.
▪️अहंकार आणि स्वाभिमान यातला फरक जाणून घ्यावा अन् स्वतःच्या अहंकाराला बाजुला सारून पार्टनरच्या स्वाभिमानाला धक्का लागू देऊ नका. कारण बऱ्याचदा क्षुल्लक कारणांसाठी अहंकाराला मधे आणल्याने आणि स्वाभिमानाला धक्का लागल्यामुळेच भांडणं टोकाला पोहोचतात.
▪️टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणून जबरदस्ती इतरांच्या सांगण्यावरून पार्टनरला दोषी ठरवू नका. कारण टाळीसारखा आवाज एका हाताने करता येतो आणि तिथेच घोळ होऊन कित्तेकांना ती टाळी नसून नुसता आवाज होता हे कळत नाही. यावर उत्तम उदाहरण म्हणजे एका परिटाच्या सांगण्यावरून सितेवर शंका घेणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं…!
▪️नम्रतेचा गुण अंगी असल्याने पार्टनरच्या चुकांकडे दुर्लक्ष करून सतत सॉरी म्हणून नातं निभावत असाल तर उत्तमच, पण तुमच्या पार्टनरला या कमजोरीचा फायदा घेऊ देऊ नका कारण हि नम्रता मग समोरच्याला तुमच्यावर अन्याय करू देण्याचा हक्क देतं.
▪️तटस्थपणे नाण्याच्या दोन्ही बाजुंचा विचार करावा.
▪️नोकरी व्यवसाय न करणाऱ्या गृहिणींनी सतत टिव्ही किंवा मोबाईलमध्ये गुंतून न राहता, नवऱ्याला एटिएम कार्ड समजून सतत शॉपिंग करत न राहता घरच्या जबाबदाऱ्यांकडे सुद्धा योग्यरीत्या लक्ष देणं गरजेचं आहे.
▪️नोकरी व्यवसाय करणारी सहचारिणी असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांच्या वा जगाच्या टोमण्यांची पर्वा न करता घरातील कामे वाटून घ्या.
▪लग्नाआधी हुंडा नको असं म्हणून लग्नानंतर तिच्या संपूर्ण मिळकतीवर तिच्या मर्जी विरूद्ध अधिकार गाजवू नये.
▪️एकमेकांच्या आवडीनिवडी, छंदांना नावे न ठेवता एकमेकांची छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करा किंवा प्रोत्साहित करा.
▪️एखादा निर्णय पार्टनरला न सांगता घेतलात किंवा एखादं पाऊल चुकीचं उचललात तर पार्टनरकडून आलेल्या प्रश्नांना काहिही न लपवता विश्वासाने वेळीच उत्तर द्या किंवा स्वतःहून कबूली द्या.
▪️मन मारून कोणतीही गोष्ट करू नये, मनाचा आतला आवाज ऐकावा पण त्यामुळे आपल्या पार्टनरला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
▪️गोड बोला पण गोड बोलून आपल्याच पार्टनरला इतर कुटुंबियांसमोर वा चारचौघात वेड्यात काढू नका. चारचौघात कौतूक करा अन् एकांतात एकमेकांचे दोष सांगा.
▪️React होण्याऐवजी Respond करा.
▪️एकमेकांतला संवाद हरवू देऊ नका.
▪️एकमेकांच्या पाठिमागेही एकमेकांना सपोर्ट करा.
▪️पार्टनरच्या आईवडीलांचा, मित्रमंडळी व नातेवाईकांचा तसाच आदर करा जो तुम्हाला त्यांच्याकडून तुमच्या माणसांसाठी अपेक्षित आहे.
इतके सगळे करूनही जर नात्यात पारदर्शकता नसेल, विश्वास नसेल, एकाकडूनच सतत नाते जोडून ठेवले जात असेल, एकच जण सतत सॉरी म्हणत असेल, दुसरीकडून मात्र ताणले जात असेल आणि एकाचीच फरफट होत असेल तर अशा नात्याला वेळीच स्वल्पविराम द्यावा.
थोडा वेळ, थोडा काळ जाऊ द्यावा. तरिही पार्टनरमुळे किंवा पालकांमुळे किंवा कुणा तिसऱ्या व्यक्तीमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन जर नात्यात कडवटपणा येत असेल तर योग्य वेळी जड मनाने का होईना परंतु संगनमताने पूर्णविराम द्यावा. पूर्णविराम देणं शक्य नसल्यास बऱ्याचदा नवरा बायकोच्या नात्याचं वस्त्र हे तलम रेशमी असतं म्हणून फेकून दिलं जात नाही. कितीही फाटलं तरी तसंच फाटकंच अंगावर गुंडाळून मिरवलं जातं. हा निर्णय सर्वस्वी ज्याचा त्याचा त्यांच्या सहनशक्तीनुसार वा कुवतीनुसार असतो.
शेवटी प्रेम हे प्रेमाने कुणी दिलं तर त्याला किंमत आहे अन्यथा ओरबाडून घेण्यात आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Tumche lekh khupach chan astat, navin kahi tari shik milate ;ek navi disha milate thanku