“लग्नापूर्वी असणारे निस्सीम प्रेम लग्न झाल्यावर काही दिवसांनी कोठे जातं??”
मधुश्री देशपांडे गानू
“दो पंछी.. दो तिनके..
कहो..लेके चले है कहां?
ये बनायेंगे इक आशियां….”
प्रेम ही चिरंतन, अमर भावना आहे. स्त्री-पुरुष, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको म्हणजेच प्रकृती आणि पुरुष. एकमेकांना पूरक, समान पातळीवर दोघेही, एकमेकांशिवाय अपूर्ण.. आदिम काळात लग्नसंस्था अस्तित्वातच नव्हती. तेव्हा इतर प्राण्यांप्रमाणेच मानवाचे व्यवहार चालत असत.
मानव प्रकृती कडून संस्कृतीकडे विकसित होत गेला तसे सामाजिक जडणघडण, काही अलिखित नियम अस्तित्वात आले. समाजव्यवस्था टिकून रहावी म्हणून काही बंधने आली. “लग्न संस्था” अस्तित्वात आली. मूळ हेतू शरीर संबंध प्रस्थापित करून वंशवृद्धी करणे हा होता आणि आजही आहे.
भारतीय संस्कृतीत लग्नसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी लहान नकळत्या वयात लग्न होत असतं. लग्नाचा नीट अर्थही कळत नसे. एकत्र कुटुंब पद्धतीत लग्न टिकून राहायची. लहान वय असल्याने सासरचे वळण लावणे सोपे जायचे. वडीलधाऱ्यांच्या धाकामुळे संसार नीट मार्गी लागत असत. मुलांची संख्या ही जास्त असल्याने स्वयंपाक पाणी, मुलांचं करण्यातच बाईचा उभा जन्म निघून जाई. संसारात काही बिनसलं, बिघडलं तर सांभाळून घ्यायला, समजावून सांगायला घरात ज्येष्ठ मंडळी असत. त्यामुळे संसार निभावून नेले जात. टिकून राहत.
आता अगदी स्थळ पाहून केलेले लग्न असो किंवा आधी प्रेम मग लग्न असं असो. सगळे आयाम बदलले आहेत. प्रेमाची लग्न तर पूर्वीही होत असत. पण आता प्रमाण खूप वाढलं आहे. लग्न हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आयुष्य बदलणारा, नवं वळण देणारा, नवीन अर्थ देणारा, नवीन नाती जोडणारा.. त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला उभा जन्म काढायचा आहे ती व्यक्ती समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रेम लग्न ही संकल्पना वाढीस लागली. आजचा विषय हा फक्त प्रेम लग्न यापुरताच मी मर्यादित ठेवत आहे.
प्रेम ही अत्यंत तरल, नाजूक भावना आहे. ठरवून प्रेमात नाही पडता येत ना! एखादी व्यक्ती आवडणं, तिचं सौंदर्य, तिचं दिसणं, तिचं बोलणं, स्वभाव, तिचा सहवास, तिची स्वप्नं, महत्त्वाकांक्षा खूप आवडणं म्हणजे प्रेम. ज्या व्यक्तीशी अगदी सगळं बोलावसं वाटतं, जिच्या सोबत आपण पूर्ण आहोत असं वाटतं, जिच्या सोबत कायम असावं असं वाटतं, जिचा विरह क्षणासाठीही सहन होत नाही, जिच्या विरहाने मन व्याकुळ होतं, जिच्या आठवणींनी मन बेचैन होतं, कशातही मन लागत नाही, जिच्या साठी सर्व काही करावसं वाटतं अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं म्हणजे “प्रेम”.
प्रेमात कसं सगळं गुलाबी गुलाबी असतं. प्रेमात पडणं ते प्रेमाचा दोन्हीकडून स्वीकार ही प्रक्रिया खूप हुरहुर लावणारी असते. मग प्रेम मिळवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या जातात. गुलाब देणे, भेटवस्तू देणे, मुद्दाम भेट घडवून आणणे अशा अनेक.. त्या खास व्यक्ती समोर आपण स्वतःला खूप चांगले, परफेक्ट आहोत असं स्वतःला पेश करत असतो. हे प्रेमाचे दिवस सोनेरी असतात.
चोरून भेटणे, नाटक सिनेमा पाहणे, कॅण्डल लाईट डिनर, वेगवेगळ्या आकर्षक स्थळी भेटी.. सगळं अगदी मुग्ध, मंतरलेलं असतं. एकमेकांसाठी काय वाटेल ते करायची तयारी असते. मग अगदी “तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन” अशा अशक्य कोटीतील वल्गनाही केल्या जातात. भेट घडताना आपण सर्वात सुंदर दिसावं, सजावं, नटावं, कपडे उत्तम असावेत असा आटापिटा आपण करतो.
आणि आपण अगदी छान छान, गोड गोड समोरच्याला आवडेल असेच वागत असतो. प्रेमाच्या व्यक्तीच्या आवडी-निवडी लक्षात ठेवतो. एकमेकांवर चांगली छाप पाडण्याची एकही संधी आपण सोडत नाही. आपली प्रेमाची व्यक्ती दुखावू नये म्हणून वेळ प्रसंगी आपण खोटेही बोलतो.
आता हीच प्रेम पाखरांची जोडी लग्न बंधनात अडकते. सुरुवातीचे दिवस खूप आनंदात, गुलाबी प्रेमाचे असतात. वर्षभर सणवार, सगळेच खूप नवीन नव्हाळीचं असतं. वर्ष दोन वर्षं सहज अशीच सरतात. प्रेमात पडून दोन ,चार तास एकत्र धुंदीत घालवणं वेगळं.. आणि लग्न झाल्यावर दोन प्रेमाची माणसं कायमस्वरूपी चोवीस तास एकत्र राहणं वेगळं.. त्यातून दोन घरची माणसं, नातलगही जोडले जातात. फक्त दोघांचे जग आता उरत नाही.
खरा संसार इथून सुरू होतो. मग सतत एकत्र राहिल्यावर एकमेकांच्या माहीत नसलेल्या सवयी लक्षात येतात. स्वभावाचे कंगोरे, बारकावे लक्षात येतात. प्रेमात धुंद होऊन घेतलेल्या आणाभाका, वचनं विसरायला होतात. कारण वास्तवातील संसार अगदीच कल्पनेपलीकडचा वेगळा असतो. प्रेमाच्या आकाशात स्वच्छंद विहार करणारे हे वीर एकदम जमिनीवर येतात.
एकमेकांच्या स्वभावातले दोष प्रकर्षाने दिसून येतात. लग्नाबरोबर अनेक वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जबाबदाऱ्या येतात. दोन भिन्न स्वभावाच्या, भिन्न परिस्थितीत, संस्कारात वाढलेल्या व्यक्ती एकत्र जबाबदाऱ्या घेताना भिन्न मतं , दृष्टिकोन असू शकतात. मग वादाला तोंड फुटते. इथून बारीक-सारीक कुरबुरी सुरू होतात. सासू सासरे, इतर नातलग यांचा सहभाग, यांची कधी अकारण लुडबुड यावरून मतभेद, वाद, भांडणं होऊ लागतात. एकमेकांच्या आधी आवडणाऱ्या गोष्टी आता नावडत्या होतात.
वंश वेलीवर फुले फुलली तर मुलांचं करण्यात दिवस कमी पडू लागतो. आज एक मूल वाढवणे हे अत्यंत गुंतागुंतीचं, जबाबदारीचं काम आहे. स्त्री आई झाली की तिचं जग बदलतं. तिचं मूल तिच्या जगण्याचा केंद्रबिंदू होतं. कारण त्याला तिची सगळ्यात जास्त गरज असते. अशावेळी नवरा-बायको हे नातं विस्कळीत होऊ शकतं.
आई-बाबा हे आनंदाच नातं निभावताना नवरा-बायको मधील प्रियकर-प्रेयसी हरवून जातात. मग फक्त व्यावहारिक नातं चालू राहतं. लग्नापूर्वीचे गुलाबी मंतरलेले प्रेमाचे दिवस विरून जातात. लग्नापूर्वीचं निस्सीम प्रेम जबाबदाऱ्या, व्यवहार यांच्या खाली दाबून जातं. वास्तवाची जाणीव कायम ठेवत संसार सुरू राहतो. आणि ज्या प्रेमाच्या, विश्वासाच्या पायावर हे नातं उभं आहे तो पायाच डळमळीत होतो. कधी कधी या सगळ्याचा अतिरेक होतो आणि अनेक लग्नं घटस्फोटाच्या अप्रिय निर्णयापर्यंत येऊन पोहोचतात.
खरं तर जिथे निस्सीम प्रेम असतं तिथे असं होता कामा नये, जरी लग्न ही सर्वस्वी जबाबदारीने पार पाडायची बाब असली तरीही.. नात्यातला गोडवा, ताजेपणा, प्रेम, विश्वास आयुष्यभर टिकून राहण्यासाठी नवरा-बायको दोघांनीही कायम उत्सुक, समजूतदार, असायला हवं. जबाबदाऱ्या, व्यवहार, इतर नातीही यशस्वीपणे सांभाळताना मूळ नात्याला तडा जाऊ देऊ नये.
नवरा-बायको हे नातं निभावताना स्वतःमधील प्रियकर-प्रेयसी सतत सातत्याने, जाणीवपूर्वक जपावी. एवढा वेळ एकमेकांना जरूर द्यावा. हे नातं खुलत, फुलवत ठेवावं. म्हणजे लग्नापूर्वीचं निस्सीम प्रेम कायमस्वरूपी तुमच्या संसारात आनंदाची, सौख्याची उधळण करत राहील…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


