Skip to content

पालकांच्या अपेक्षांचं ओझं – एक स्व-अनुभव !

यशोधन बापट
बदलापूर
आज सार्थकच्या क्लास मधून वेगवेगळ्या पेपर्सच्या मार्कांचा आढावा घेणारा SMS त्याच्या आईला आला.सार्थक हा इयत्ता दहावीत शिकणारा एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला असा मेहनती मुलगा होता. भूमिती, बीजगणित, विज्ञान हे विषय त्याला फारसे आवडायचे नाहीत.आधीच्या आठवड्यात झालेल्या परीक्षांचे निकाल मुलांना आधीच सांगण्यात आले होते.
परंतु मार्क आई-वडिलांच्या अपेक्षेसारखे नसल्याने सार्थकने घरी खोटे मार्क सांगितले होते. आज मात्र घरी खरे मार्क कळाले.सार्थक खेळायला गेला होता. आईने घरातील गॅलरी मधून अतिशय संतापलेल्या अशा अवस्थेत खूप मोठ्याने हाक मारून सार्थकला घरी बोलावले.प्रथमतः त्याला परिस्थितीचा अंदाज आला नाही. पण ज्यावेळी त्याने घरात प्रवेश केला त्यावेळी घरातील विचित्र वातावरणामुळे त्याला घरातील परिस्थितीचा अंदाज आला. आईने काहीही ऐकून न घेता त्याला यथेच्छपणे स्टीलच्या फूटपट्टीचा प्रसाद दिला.बिचारा सार्थक मार खात होता. प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही.घरातील टीपॉय, tv खालचे कपाट, tv चा रिमोट, आरसा यांचीही मोडतोड या भानगडीत झाली.रागाच्या भरात अतिशय अद्वातद्वा बोलून आई घरातुन बाहेर निघून गेली.गांगरून गेलेल्या आणि घरात एकटाच असलेल्या सार्थकला काय करावे हे सुचत नव्हते.बरं! बाबांना फोन केला तर तेही असंच काहीसं ऐकवणार आणि ते घरी आल्यानंतर त्यांचाही मार खावा लागणार हे वेगळंच. अश्या भेदरलेल्या अवस्थेत त्याने रडतरडत त्याच्या शाळेत असलेल्या परंतु त्याच्याशी  भावनिक दृष्ट्या अतिशय जवळच्या सरांना फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. योगायोगाने सर जवळच राहत होते. त्यांनी लगेचंच त्याच्या घरी धाव घेतली.घरात प्रवेश करताच घरातील उध्वस्त गोष्टींचे स्वरूप बघून त्यांना घडलेल्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला. सार्थक मानसिक दृष्ट्या पूर्णपणे कोसळला होता. माझ्या आयुष्यात दहावी का आली? मला ह्या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे. मला परीक्षा द्यायचीच नाही असले मनात खूप दिवसांपासूनचे साचलेले विचार त्याने सरांजवळ प्रकट केले.मार खाऊन सुजलेल्या सार्थकचा चेहरा पाहून सरांच्या मनात अतिशय कालवाकालव झाली.त्यांनी सार्थकच्या आईला फोन केला आणि घरी बोलावले. क्रोध अनावर झाल्यामुळे त्यांचेही ब्लडप्रेशर वाढले होते. त्यांच्या लक्षात आले की सार्थकनेच सरांना बोलावून घेतले आहे.सरांनी आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही पटलेसे सरांना जाणवले नाही. सरतेशेवटी सार्थकला घेऊन ते गाडीवरून फेरी मारायला गेले.वाटेत पालकांच्या नाहक अपेक्षांचे ओझे वाहणारा सार्थक नैराश्याच्या गर्तेत जाताना ते पाहत होते. बाहेर छान दाबेली खाताना सार्थकने सहजतेने ‘असल्या घटना’ माझ्या घरी वारंवार घडतातच असे सांगितले. सरांना फार वाईट वाटले.सार्थकलाच समजावत सर म्हणाले, “सार्थक,शक्यतो परिस्थितीला न घाबरता खरे मार्क घरी सांगत जा.एक खोटं लपविण्यासाठी तुला खूप खोटं बोलावं लागतं आणि नंतर त्याचा परिणाम हा असा होतो.तुला अवघड वाटणाऱ्या विषयाकडे तू किती सकारात्मक पणे पाहतोस?त्या विषयांचा अभ्यास निश्चित वाढव आणि चांगले मार्क मिळविण्याचा प्रयत्न कर.”
तात्पुरती मलमपट्टी झाली खरी पण सरांच्या मनातून सद्य घटना काही पुसली गेली नाही.
खरंच आपण आपल्या पाल्याकडून किती नाहक अपेक्षा ठेवत असतो.त्याच्या अध्ययन क्षमतेचा,आवडीनिवडीचा आपण विचार करतो का? केवळ आपली अपेक्षा पाल्याने पूर्ण करावी म्हणून अभ्यास करावा,चांगले मार्क मिळवावेत आणि आपले समाजातील स्टेटस सांभाळावे तर तसे होत नाही.विशिष्ट मर्यादेनंतर मुलं कंटाळून अभ्यास करणं बंद करतात आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात.
….म्हणून पालकहो मुलांवर काहीही लादू नका.त्यांना चांगली दिशा जरूर दाखवा.पण चुकीच्या अपेक्षा ठेऊ नका.त्यांना जर समजून घेतलं तर मुलं निश्चितच बहरतात, फुलतात आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे सुंदर मार्कांचा सुगंध ही देतात.

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!