Skip to content

प्रेम, आकर्षण आणि वासना यामध्ये गल्लत होऊ नये म्हणून हा लेख वाचा

प्रेम, आकर्षण आणि वासना यामध्ये गल्लत होऊ नये म्हणून हा लेख वाचा


जागृती सारंग


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!

पाडगांवकरांची हि कविता कुणास ठाऊक नाही हे शक्यच नाही. निदान प्रेम म्हणजे काय असं विचारल्यावर पूर्ण कविता जरी ठाऊक नसली तरी या दोन ओळी चटकन सर्वांच्या ओठांवर येतच असतील. अगदीच नाही तर प्रेमाची व्याख्या सांगताना पहिली ओळ तर नक्कीच प्रत्येकजण सांगत असतो.

बऱ्याचदा आपल्याला आपला पार्टनर किंवा आपण आपल्या पार्टनरला एक प्रश्न हमखास विचारतो, मी इतका का आवडतो तुला? किंवा कित्ती प्रेम करशील माझ्यावर, अगदी खरं खरं सांग असं काय पाहिलंस माझ्यात कि तू इतका जीव लावावास मला? या आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जो तो आपापल्या परीने देत असतो.

पण कधी कधी काही जणांना या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत आणि जर दिलंच तर त्यांचं उत्तर असतं ठाऊक नाही किंवा मला शब्दात सांगता येणार नाही. मला वाटतं हि अशा प्रकारची उत्तरे देणारी माणसं अगदी निःस्वार्थ प्रेम करणारी असतात. ज्यांना या प्रश्नांची उत्तरे देता येतात ती माणसं मला वाटतं एक देवाण घेवाण करत असतात. जी साहजिक आहे.

भावभावनांची, विचारांची, कौतुकाची, स्पर्शाची, मायेची, गोड सुखावणाऱ्या शब्दांची, एकमेकांना जपण्याची, अपेक्षांची, सोबतीची, या आणि अशा बऱ्याच गोष्टींची देवाण घेवाण…! जिथे हि देवाण घेवाण यशस्वी होते तिथे एक नातं निर्माण होतं आणि जर ते दोन भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये असेल तर त्याला नाव दिलं जातं प्रेमाचं…!

हे अगदी लगेच होत नाही, कधीकधी सुरूवात वैचारिक साम्यातून मैत्रीत होते आणि मग हि मैत्री फुलत, बहरत जाऊन एक मैत्रीपलिकडचं नातं निर्माण होतं. कधी काही बंधनांमुळे किंवा वेळेनुसार मैत्रीच्या पलिकडे आणि प्रेमाच्या अलिकडे हे नातं अडकून राहतं. बरेच जणं या नात्याला जग मान्य करेल असं प्रेमाच्या पलिकडे नेण्यात यशस्वी देखील होतात.

आधी अनोळखी, मग ओळख, नंतर बोलणं, हळूहळू छान मैत्री, त्यानंतर भेटणं, मग बेस्टीज, नंतर एकमेकांची सवय, नंतर भावनिक गंतागुंत, मग हुकअप आणि शेवटी एकतर ब्रेकअप किंवा बॅकअप किंवा मग एकमेकांसाठी आयुष्यभरासाठी मॅचअप….. हि पूर्ण प्रोसेस पूर्वी शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा गल्ली नाक्यापासून सुरू व्हायची पण आता याची सुरुवात सोशल मिडीयावरुन पिपल यु मे नो हून सुरू होऊन मॅरीड टु अमूक तमूक किंवा ब्लॉक लिस्ट अशी सुद्धा होते.

प्रेम हे कधी ठरवून होत नाही ते नकळत होतं पण एकाने व्यक्त केल्यावर दुसऱ्याच्या होकाराशिवाय ते पूर्ण होत नाही. सोबत हे ही तितकंच खरं की हल्ली ब्रेकअपचं प्रमाण फार वाढलेलं दिसून येतं. ब्रेकअप किंवा फसवणूक हे पूर्वी होत नव्हतं असं नाही पण त्याचं प्रमाण फार कमी होतं. मी दोष आत्ताच्या पिढिला देणार नाही कारण प्रेमाची व्याख्या जरी बदललेली असली तरी त्यात फक्त आत्ताची पिढी पुढे आहे परंतु प्रत्येक वयोगटातली माणसं सध्या असं वागताना आढळून येतात. यामागे कारणं तशी बरीच आहेत पण प्रत्येकाला निदान इतकं तरी ओळखता यायला हवं कि हे प्रेम आहे कि आकर्षण कि वासना!

पाडगांवकरांच्या कवितेत अजून दोन ओळी आहेत –
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं

या ओळी हल्लीच्या प्रेमाला पूरक आहेत. कारण हल्ली बरीच जणं क्षणिक सुखामागे धावताना दिसतात. आकर्षणाला प्रेम समजून बसतात. काहीजणांच्या लेखी जो स्वैराचार असतो त्यालाच काही जणं प्रॅक्टिकल जगणं असं गोंडस नाव देतात. आयुष्य आज आहे तर उद्या नाही, आयुष्याचा कुठवर भरवसा? स्वतःसाठी कधी जगणार? पुढे जाऊन आपण एक होऊ कि नाही याचं टेन्शन आत्ताच घेण्यापेक्षा आत्ताच्या क्षणात जगणं अन् एकमेकांना सुख देणं बऱ्याच जणांना योग्य वाटतं.

लव्ह एॅट फर्स्ट साईट, किंवा एखाद्याचे डोळे, बोलणं, फिजिकल अपिअरन्स, पर्सनॅलिटी, हसणं, आवाज, गाणं म्हणणं, लिहिणं, नाचणं, समाजकार्य, हळवेपण, खंबीरपणा किंवा तत्सम कलागुणांवर फिदा होणं हे सर्व प्रकार म्हणजे आकर्षण! प्रेमाची सुरूवात हि आकर्षणातूनच होत असते. आकर्षण जे शारीरिक किंवा व्यक्तीच्या कलागुणांचं असतं.

या गुणांसोबत जेव्हा त्या व्यक्तीचे अवगुणसुद्धा स्विकारण्याची तयारी होते ती प्रेमाची पुढची पायरी…. जी प्रत्येकाला चढता येत नाही. बरीच जणं आकर्षणातच गुरफटून राहतात आणि मग हुकअप ते ब्रेकअप हा प्रकार घडतो. ज्यावेळेस प्रेमी युगुलं किंवा लग्न झालेली जोडपी एकमेकांना गुणदोषासहित स्विकारतात आणि जगानं काही म्हटलं किंवा कुणीही त्यांच्या नात्यात लुडबुड केली तरी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन निभावतात तेव्हा काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत अशा जोडप्यांचं प्रेम हे आकर्षणाच्या पल्ल्याड गेलेलं दिसून येतं.

तुम्ही प्रेमात असाल किंवा तुम्ही प्रेम विवाह केलेला असू दे अथवा अरेंज्ड मॅरेज असू दे, या सर्वामधे आकर्षणापलिकडचं प्रेम म्हणजे काय? तर ते म्हणजे –

▪जोडीदाराला जगासमोर किंवा कुटुंबासमोर प्रथम प्राधान्य देणं,
▪इतरांसमोर जोडीदाराचा आदर करणं, सन्मानानं वागवणं,
▪जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट बिनदिक्कतपणे शेअर करणं,

▪️आता आमचं काही ऐकत नाही पण बायकोचा बैल झाला आहे किंवा त्याला मिठीत ठेवण्यापेक्षा मुठित ठेव असं किंवा इतर काही कुणी कितीही म्हणालं तरी काडीचाही फरक पडू न देता इतरांसमोर जोडीदाराची मनापासून काळजी घेणं,

▪जोडीदाराच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत घरचे किंवा बाहेरचे असे कोणीही आपल्या जोडीदाराचा पाणउतारा करणार नाही याची खबरदारी घेणं,

▪प्रेम व्यक्त करता आलं नाही तरी छोट्या छोट्या कृतीतून जोडीदाराची काळजी घेणं,
▪तिच्या मासिक पाळीच्या काळात किचनचा ताबा घेणं,
▪ऑफिसच्या किंवा बिझनेसच्या टेन्शन्स मुळे तुमची खराब झालेली मनःस्थिती सांभाळून घेणं,

▪आपला लक्षात न राहिलेला वाढदिवस किंवा एॅनिव्हर्सरी लटकेच रागवून, भांडून मग माफ करणं,
▪रात गयी बात गयी च्या उक्तीप्रमाणे रुसवे फुगवे बाजुला सारून सॉरी म्हणून पुन्हा नव्या दिवसाची सुरूवात नव्यानं करणं,
▪जेवणात तिखट मिठ कमी जास्त झालेलं सहज तक्रार न करता पचवून घेणं,

▪आपल्या जोडीदाराची कुणासोबतही तुलना न करता त्याला आहे तसं स्विकारणं,
▪कुटुंबातील इतर सदस्यांच्या मागणीनुसार जोडीदाराला बदलण्यास भाग न पडता कुटुंबालाही आपल्या जोडीदारास आहे त्या स्वरुपात स्विकारण्यास सांगणं,

▪एकमेकांच्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा आदर करणं,
▪प्रेमविवाह करण्यासाठी एकमेकांच्या घरच्यांची परवानगी मिळेपर्यंत झटणं,

▪परवानगी मिळाली नाही तरी एकमेकांची साथ अर्ध्यावर न सोडता जिद्दीने एकमेकांचा संसार उभं करणं,
▪एकमेकांच्या नात्यात कटुता भरणाऱ्या किंवा नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जवळच्या वा लांबच्या माणसांना आपल्या आयुष्यातून वेळीच दूर सारणं,

▪एकमेकांच्या पडत्या काळात एकमेकांना सावरणं,
▪काही पटण्यासारख्या खऱ्याखुऱ्या कारणास्तव प्रेमाचं रुपांतर लग्न, संसारात करता नाही आलं तर प्रेमाचा आदर करून आणि ते प्रेम हृदयात जपून ठेवून मुव्ह ऑन करणं देखील अगदी खरं प्रेमच असतं.

पण असं म्हणतात की कुठल्याही प्रेमाचा शेवट हा बिछान्यातच होतो. हे वास्तव असलं तरी हा शेवट योग्य वेळी योग्य प्रकारे होणं गरजेचं असतं. म्हणजेच नात्याला समाजमान्य नाव देता यावं.

एकमेकांची सवय होणं हा जरी प्रेमाचा भाग असला तरी ते एक प्रकारचं व्यसन असतं. फक्त त्या व्यसनाचं रूपांतर वासनेत होता कामा नये. हल्ली हे वासनारूपी प्रेमच अधिक प्रमाणात दिसून येतं.

स्त्री असो वा पुरूष माणसं हि फक्त भाकरीची भुकेली नसतात तर ती भाव भावनांची, प्रेमाची, वात्सल्याची, स्पर्शाची आणि शरीर सुखासाठीही भुकेली असतात.

हल्ली सोशल मिडिया मुळे कौतुकासाठी, क्षणिक सुखासाठी प्रेमापेक्षा वासनेला उधाण आलेलं प्रत्येक वयोगटात दिसून येतं.

आंटी मत कहो ना सारखंच अंकल मत कहोना म्हणून लव्ह लेटर लिहिणारे इनबॉक्स वीरही असतात. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो अशा कॉम्प्लिमेंट्स देऊन विवाहीतांना हुरळून टाकणारे ही असतात.

बरं J1 झालं का हे फक्त पुरुषांकडून स्त्रियांनाच विचारलं जातं असं नव्हे तर स्त्रियांकडूनही रात्री बेरात्री विचारून संभाषणाला सुरुवात केली जाते. तुम्ही व्हॉट्सएॅपवर आहात का असं विचारुन नंबर घेण्यात स्त्रियाही मागे नाहीत. हे सर्व प्रकार स्त्रियांच्या नावे फेक अकाऊंट असणाऱ्याकडून नव्हे तर खऱ्याखुऱ्या स्त्रियांकडून होत असतात ज्याचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत थोडंफार कमी असावं.

कमी वयाची मुलं जास्त वयाच्या स्त्रियांना भुलवतातच पण तिस चाळिशीतल्या स्त्रियाही विस-तिशीच्या मुलांना झुलवत असतात. यामागे आर्थिकदृष्ट्या फसवणूक करण्याचाही हेतू असतो तसेच भावनिक आणि मानसिक समाधानासाठी देखिल समोरच्याला गुंतवले जाते.

आपण सेक्स चॅट करुया का? मी फ्लर्टिंग केलं तर चालेल ना? किंवा आपण एकमेकांची सुख-दुःख शेअर करुया ना! असं करत करत मग हे गुंतणं गुंतवणं एका भेटीची मागणी करतं. पहिली भेट सार्वजनिक ठिकाणी चहा किंवा एकत्र जेवण अशी होते. मग पुढची भेट एकमेकांच्या संमतीने किंवा समोरच्या व्यक्तीला गृहित धरून कुठेतरी सरप्राईज म्हणून एकांताच्या ठिकाणी केली जाते किंवा घडवून आणली जाते. ज्याचं रूपांतर शेवटी शरीर सुखाच्या वासनेत करण्याचा प्रयत्न केला जातो.

काही जणं वेळीच या फसव्या मायाजाळाला ओळखून बाहेर पडतात पण काहीजणं खोल गर्तेत अडकत जातात. काहीजणांना ब्लॅकमेलही केलं जातं ज्या कारणामुळे काहीजणं आयुष्याचा अंत करण्यासाठी सुद्धा तयार होतात. म्हणून प्रेम, आकर्षण आणि वासना हे वेळीच ओळखता यायला हवं.

जेव्हा तुम्हाला तुमच्या गट फिलिंग्ज द्वारे तुम्हाला जाणीव होत जाते कि –

▪तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून दुय्यम स्थान मिळत आहे,
▪तुम्हाला दुर्लक्षित केलं जात आहे,
▪तुम्हाला पाठवलेले कुठल्याही प्रकारचे मेसेजेस पलिकडून डिलीट केले जात आहेत,

▪प्रत्येक वेळी चुका करुन तुम्हाला दोषी ठरवलं जात आहे,
▪चुका घडल्यावर नावापुरतं सॉरी म्हणून त्यावर सुधारणा करण्याऐवजी पुन्हा त्याच गोष्टी केल्या जात आहेत,
▪इतरांच्या सांगण्यावरुन तुमच्याशी नातं तोडलं जात आहे,

▪नातं निभावण्याची तयारी न दाखवता तुम्हाला गृहीत धरून दोषी ठरवून झिडकारलं जात असेल,
▪तुमच्याजवळ शरीरसुखाची मागणी करून किंवा शरीराने पूर्णतः एकमेकांचे होऊन नंतर काही कारणास्तव नातं निभावणं शक्य नाही हे सांगितलं जात असेल,

त्यावेळी समजून जावे की हे प्रेम नव्हे फक्त आकर्षण आहे आणि ज्याचे रूपांतर फक्त आणि फक्त वासनाच आहे!!!

▪जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करतं किंवा तुम्हाला भावनिक रित्या खच्चीकरण करुन पूर्णपणे वैचारिकदृष्ट्या अपंग बनवतं ते कधीच प्रेम नसते.
▪खऱ्या प्रेमात अव्वाच्या सव्वा किमती असणाऱ्या मौल्यवान भेटवस्तूंची मागणी कधीच नसते.

▪खरं प्रेम तुमचा वेळ मागतं.
▪कौतुकाचे चार शब्द मागतं.

▪लाख संकटं आली तरी ती एकमेकांच्या हातात हात घालून संकटांवर मात करण्याची ताकद मागतं.
▪आयुष्यभरासाठी तुमची विश्वासाची साथ मागतं….!

प्रेम झाल्यावर ते शेवटपर्यंत निभावण्याची ताकद आपल्याकडे असावी.

वासना म्हणजेच तीव्र गरज म्हणून कधीकधी काहीजणं आपल्या अधुऱ्या प्रेमाला हि गरज पूर्ण करण्यासाठी ब्रेकअप नंतरही बॅकअप म्हणून ठेवतात. जर एका छताखाली राहून तुमचे जोडीदारासोबत पटत नसेल आणि तुम्हाला इतर कुणावर जीव जडला असेल किंवा जुनं प्रेम विसरता येत नसेल तर जोडीदाराची फसवणूक करण्यापेक्षा जुन्या नात्याला कायदेशीररीत्या पूर्णविराम देऊन ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत नव्यानं रितसर सुरुवात करावी.

परंतु स्वःसुखासाठी जोडीदाराचे वा तुमच्या आयुष्यात असलेल्या त्या तिसऱ्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये. कारण अशाने आपण तिसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या किंवा भविष्यात येणाऱ्या जोडीदाराचे आयुष्य देखिल उद्ध्वस्त करत असता.

जर तुम्ही अशा प्रकारे उध्वस्त होण्याआधी वेळीच थांबू शकत नसाल तर तुम्ही प्रेमवेडी माणसं नसून वासनेची शिकार किंवा वासनेचे शिकारी झालेले आहात यात तिळमात्र शंका नाही.

प्रेमानं जग जिंकता येतं आणि प्रेमानं गळाही कापला जातो. तुम्ही काय करताय किंवा तुमच्यासोबत नक्की काय घडतंय यावर विचारमंथन करा. प्रेम आहे, आकर्षण आहे कि फक्त वासना आहे यावर आत्मपरीक्षण करून वेळीच सावध होत सद्सद् विवेक बुद्धीने योग्य तो निर्णय घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

11 thoughts on “प्रेम, आकर्षण आणि वासना यामध्ये गल्लत होऊ नये म्हणून हा लेख वाचा”

  1. खुप छान एकच नंबर लिहिलं आहे वास्तववादी

  2. Satish Pandurang Patil

    अप्रतिम लेखन.
    सोबत लेखकांबद्दल माहिती असल्यास उत्तम.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!