“स्त्रिया हुशार आहेत असं म्हटलं जातं. मग निर्णय प्रक्रियेत त्यांना दुय्यम वागणूक का?”
मधुश्री देशपांडे गानू
नारी हूं, शक्ती हूं.. कोमल हृदय भी
वज्र सी कठोर हूं..
कुछ तो अलग बात है मुझमें..
या माझ्याच हिंदी कविता “खोज” मधील काही ओळी आहेत. सातत्याने दहावी-बारावीचे निकाल लागले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण होण्याच्या संख्येत मुलांपेक्षा मुली पुढे आहेत. असं का? तर नैसर्गिक दृष्ट्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक फरक दोघांमध्ये आहे.
मुळात स्त्री जातक हे निसर्गतःच चिवट, टिकून राहण्यासाठी बनले आहे. जर एखाद्या जोडप्याला जुळी मुलं झाली आणि त्यात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर वैद्यकीय दृष्ट्या मुलगी मुलापेक्षा जास्त आरोग्यपूर्ण आणि चिवट असते. स्त्री ही पुरुषांइतकीच सर्वच बाबतीत श्रेष्ठ असते. फक्त शारीरिक ताकदीच्या जोरावर पुरुष तिच्यावर सत्ता गाजवू पाहतो.
आपली सामाजिक जडणघडण, समाजाचे नीतिनियम हे नेहमी स्त्रियांप्रती कठोर राहिले आहेत. देवीचे रूप म्हणून तिची पूजा करायची आणि प्रत्यक्षात मात्र तिला फक्त उपभोगाची वस्तू आणि हक्काची वस्तू (माणूस नाही) म्हणून वागवायचे. आजही वागवले जाते. कारण तिला विचारांचे, कृतीचे, शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले तर ती काय उत्तुंग भरारी घेऊ शकते हे आज अनेक यशस्वी, प्रसिद्ध स्त्रियांकडे बघून कळतं.
मग “नाकापेक्षा मोती जड” होईल म्हणून तिला समाजाने अन्याय्य बंधनांनी बांधून ठेवले. आता काळ नक्कीच बदलला आहे. स्त्री शिक्षणात तर आमूलाग्र बदल झाला आहे. आज मुली मुलांपेक्षा जास्त शिकत आहेत. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च पदी विराजमान होत आहेत. तरीही त्यांना कधीतरी कमीपणाची जाणीव करून दिली जातेच. अपमानास्पद वागणूक दिली जाते केवळ स्त्री म्हणून.
मुळातच मुलींना प्रगल्भता, समज ही मुलांपेक्षा लवकर येते. शारीरिक, मानसिक बदल मुलींमध्ये लवकर होतात. एकाच वयाच्या पौगंडावस्थेतील मुलींची समज ही मुलांपेक्षा खुपच जास्त असते. मुलींची जडण-घडण त्यांना वाढवताना लावण्यात येणारे निकष हे मुलांना वाढवताना लावण्यात येणाऱ्या निकषांपेक्षा वेगळे असतात.
मुलगी जन्माला आल्यापासूनच आई वडील सजग होतात. एक दिवस लग्न करून सासरी जाणार म्हणून अगदी लहान वयापासूनच योग्य संस्कार सुरू होतात. त्या मानाने मुलं ही वंशाचा दिवा(??) असल्यामुळे त्यांचे अती लाड होतात. घरकामाची मुलींना सवय लावली जाते. पण मुलगा म्हणून त्याला काहीही शिकवले जात नाही. आई-वडिलांनाच मुलाने घर काम करायचं?? यात लाज वाटते. माझा स्वतःचा मुलगा घरातील बहुतेक सगळी कामं करतो.
त्याला वेळ प्रसंगी स्वयंपाकही येतो. स्त्री-पुरुष दोघेही आर्थिक सक्षम असताना, करियर करत असताना दोघांनाही घर कामाची समानता ही हवीच. यात कसला आलाय कमीपणा? ज्या घरात आपण राहतो त्याच घरातील कामं करण्यास लाज का वाटते मुलांना?? मुळात आई-वडिलांनीच हे लहानपणापासून शिकवायला हवे. सर्वस्वी पालक जबाबदार असतात. एक स्त्री असूनही आपल्या मुलाने काम केलेले एका आईला चालत नाही. त्यामुळे सुनेवर अन्याय होतो हे तिच्या लक्षातच येत नाही.
मुळात स्त्रिया या कोणत्याही परिस्थितीत सहज सामावून घेतात स्वत:ला. त्यांच्यात समर्पित भाव असतो. कोणतेही काम करताना स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मन लावून काम करतात. काम तडीस नेतात. म्हणूनच अभ्यासही मन लावून करतात. लहानपणापासूनच अशी वाग, तशी वाग, नाहीतर लोकं नावं ठेवतील, असं ऐकल्यामुळे त्यांच्यात सतत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असते.
सतत नाविन्याचा शोध घेणे, स्वतःमध्ये प्रसंगानुरूप, काळानुरूप सुधारणा करणे हे स्त्रियांना सहज जमतं. आपल्या आजूबाजूला पाहिलं तरी लक्षात येतं बहुतेक स्त्रिया स्वतः बाबत, दिसण्याबाबत, पेहरावाबाबत जितक्या जागरूक असतात तितके पुरुष अजिबातच नसतात. त्यामुळे बहुसंख्य जोडपी टापटीप, टेचात राहणारी बायको आणि तिचा गबाळा नवरा अशीच दिसतात.
कित्येक गोष्टी स्त्रियांना जास्त सखोलपणे पटकन समजतात. पण पुरुषांना समजत नाहीत. उदाहरणार्थ. “रंग”. स्त्रियांना जेवढे बारकाईने अनेक रंगछटांचे ज्ञान असते तेवढे पुरुषांना नसते. स्त्रिया एकाग्रचित्ताने कोणतेही काम करू शकतात कारण त्या सहसा सहज मोहाला बळी पडत नाहीत. पण पुरुषांना मात्र चित्त विचलित व्हायला कोणतेही क्षुल्लक कारण पुरते.
व्यावहारिकपणा, समयसूचकता, निर्णय क्षमता हे स्त्रियांमध्ये असलेले उपजत गुण. पण आजही कौटुंबिक, सामाजिक पातळीवर असं दिसून येतं की कोणत्याही निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतलं जात नाही. घरगुती उदाहरण घेऊ. एका कुटुंबामध्ये उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावर काम करणारी घरातील मोठी कर्ती स्त्री पण आजतागायत बँकेचे व्यवहार माहीत नाहीत.
कारण तिचे स्वतःचे व्यवहारही नवरा बघतो. आर्थिक स्वतंत्र, सक्षम असूनही स्वतःचा असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. फक्त नवऱ्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला मम म्हणणं एवढंच करते. वर तिला हे चूक आहे याचीही जाणीव नाही. नवर्याने घेतलेल्या एका मोठ्या चुकीच्या निर्णयाने तिला आणि कुटुंबाला खूप मनस्ताप सहन करावा लागला, पण आता समजून काय उपयोग? कित्येक स्त्रियांना स्वतःच्याच घरातले आर्थिक व्यवहार माहीत नसतात.
“आमचे हे बघतात सगळं, मला काही माहीत नाही.” हे सांगण्यात त्यांना नवऱ्याचा अभिमान(??) वाटत असतो. पण कधीकाळी दुर्दैवाने अकस्मात नवऱ्याचे निधन झालं तर अशी स्त्री काहीही करू शकत नाही. तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फसवणुकीची शक्यता असते. कारण घेतलेल्या निर्णयात तिचा काहीच सहभाग नसतो.
हे केवळ आणि केवळ सामाजिक, कौटुंबिक स्त्री-पुरुष असमानता जोपासल्याने होते. वर्षानुवर्षं स्त्री म्हणजे “चूल आणि मूल” असंच ठसवण्यात आलं आहे. तिची हुशारी पद्धतशीरपणे बंधनात अडकवली गेली. सामाजिक विकृत मानसिकता आणि खोटा पुरुषी अहंकार, स्वार्थी वृत्ती यामुळे स्त्रीला जाणीवपूर्वक कोणत्याही लहान-मोठ्या निर्णयप्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले.
खरं तर नीट विचार केला तर असं लक्षात येईल की स्त्री-पुरुष दोघांनीही मिळून सारासार विचार करून घेतलेले निर्णय नेहमीच फायदेशीर, प्रगतिशील ठरतात. अशीही आनंदी, समाधानी अनेक कुटुंबं आहेत. कारण स्त्री संपूर्ण कुटुंबाचा विचार करून निर्णय घेते. सर्वसमावेशक वृत्ती आणि कृती असते तिची. अगदी कळत्या वयापासूनच घरातील मुलीला ही कुटुंबाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायला हवं.
आमच्या घरात आम्ही दोघी बहिणी पण प्रत्येक निर्णय आम्ही चौघे मिळून घेत असू. याचा पुढील आयुष्यातील बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देताना स्त्रीला फार उपयोग होतो. प्रत्येक पालकांनी हे केलेच पाहिजे. म्हणजे जीवनाला सामोरं जाताना ती डगमगत नाही. कुटुंबासाठी, समाजासाठी एक योग्य निर्णयक्षम व्यक्ती, माणूस बनते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


