Skip to content

कॉलेज बंक करून आम्ही रोज त्या झाडाजवळ भेटायचो…

कॉलेज बंक करून आम्ही रोज त्या झाडाजवळ भेटायचो…


सौ. शमिका विवेक पाटील


आज सुद्धा थांबशील ना यार ? आपल्या नेहमीच्या जागी. शरदने रेणुकेला लेक्चर सुरू असताना हळूच कानात विचारले. रेणुकाने नुसती मान हलवून होकार दिला. बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणीत मात्र कुजबुज सुरू झाली. जसे लेक्चर संपले तसे रेणूकाने शरदला गाठले आणि आवाज वाढवून विचारले, तू काय डोक्यावर पडला आहेस का रे ? सगळ्यांसमोर काय विचारात होतास ? थांबशिल का म्हणून ? तुला माहित नाही, त्या सगळ्याजणी नंतर विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होत्या.

बघुदेत..who cares ? शरदने तिचे बोलणे दुर्लक्षित केले, बरं ते सोड, थांबणार आहेस का आज ते सांग आधी ? आज नको, घरी उशीर होतो जायला मग आई हजार प्रश्न विचारत बसते. आपल्यात जे काही सुरू आहे ते एकतर कोणाला माहित नाहीय. उगीच लोकं तर्क वितर्क लावत बसतात. त्यापेक्षा काही दिवस नाही न भेटलेलं बरं. लोकांचा विचार करायचा होता मग इथपर्यंत आलोच कशाला ? पुन्हा तो वाद सुरू व्हायच्या आत तू इथून निघून जा रेणू, मी वाट बघेन आपल्या नेहमीच्या जागेवर. आलीस तर ठीक नाहीतर…. नाहीतर काय ? रेणूने घाम पुसत विचारले.

नाहीतर… मी निघून जाईन.. आणि उद्या वाट बघेन. त्याच्या ह्या उत्तरावर दोघेही जोरजोरात हसू लागले. चलो bye बोलत, रेणुकाने शरदचा निरोप घेतला. आणि उद्या भेटण्याचे प्रॉमिस केले.

शरद आणि रेणुका कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाला होते. अगदी सुरवातीला कॉलेजमध्ये आल्यापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत दोघांमध्ये कमालीचा बॉण्ड होता. आवडी निवडी एक, आचार विचार एक म्हणून दोघांमध्ये छान मैत्री होती. टिफीन असे काही शेअर करायचे की एकाच घरातले दोघेजण. त्यामुळे बाकीचे मित्र मैत्रिणी दूर झाले, पण ह्या दोघांना काहीच फरक नसे. कारण दोघे एकमेकांसाठी पूरक होते. त्यांचं एक गुपित होते, कॉलेज सुटल्यावर दोघेही एका झाडाच्यापाठी भेटायचे आणि तासन् तास काहीतरी बोलत बसायचे.

कधी मोबाईल वर व्हिडिओ बघायचे आणि वहीत काहीतरी लिहीत बसायचे. कधी जोरात हसायचे तर कधी भांडायचे. कोणालाच माहित नव्हते की दोघे नक्की काय चर्चा करायचे, आणि कसले व्हिडिओ बघत बसायचे. बघणाऱ्याला मात्र शंका नक्कीच येईल असे त्यांचे वागणे असायचे. कधी ती त्याच्या मांडीवर डोके ठेऊन एका कानात हेडफोन घालून काहीतरी ऐकत झोपायची.

तो सुद्धा दुसरा हेडफोन कानात घालून एकाग्र होत असे. एखादा व्हिडिओ बघताना दोघेही एकमेकांकडे बघून हसत. जाताना मिठी मारून उद्या ह्याच जागेवर भेटायचे प्रॉमिस दोघे करत.

हळू हळू ही गोष्ट कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या कानावर गेली. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी झाडाच्या पाठीमागे बसून अश्लील चाळे करतात. हे समजल्यावर दोघांच्याही घरी नोटीस गेली. घरचे वातावरण प्रचंड तापले. पण सध्या घरच्यांना काही सांगायचे नव्हते असे दोघांचे ठरले होते म्हणून लावलेले सर्व आरोप स्वीकारत त्यांनी परत तिथे न बसण्याचे ठरवले. आता रेणुकावर नजर ठेवण्यात आली, किती वाजता सुटते आणि कोणा कोणाला भेटते ह्यावर घरचे लक्ष ठेवून होते. इथे शरदच्या घरी सुद्धा तिच परिस्थिती झाली. तरीही दोघांनी भेटणे काही सोडले नाही.

भेटण्याची जागा तिच होती फक्त वेळ बदलण्यात आली. पुन्हा दोघे एकमेकांत गुंतू लागले. आपल्या आजूबाजूला पण लोकं आहेत ह्याचे भान ते भेटल्यावर विसरत होते. फायनल exam संपली आणि दोघेही चांगल्या मार्कांनी पास झाले. घरच्यांच्या आग्रहास्तव दोघांनी १० ते ७ ची नोकरी करायला सुरुवात केली. पण त्यांची मैत्री तीळ मात्र सुद्धा कमी नव्हती झाली. वीकेंडला दोघेही नेहमीच्या जागी भेटायचे आणि एकमेकांत हरवून जायचे. अशी बरीच वर्ष लोटली.

एक दिवस दोघांनीही घरच्यांना मोठा धक्का दिला. घरी एक पत्रिका ठेवली त्यात दोघांचे नाव होते आणि एका हॉटेलचे नाव होते. तशीच एक पत्रिका कॉलेजच्या प्रिन्सिपलला सुद्धा दिली. आणि जे मित्र मैत्रीण ह्यांच्यावर हसत, ह्यांना नावं ठेवत त्यांच्या घरी सुद्धा पाठवून दिली. सर्व जण दिलेल्या ठिकाणी वेळेत पोचले. पाहतो तर सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हॉटेलचे ओपनिंग होते, आणि त्या हॉटेलचा शेफ शरद आणि मॅनेजर रेणुका हिच्या नावाचा बॅनर तेथे लावण्यात आला होता. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की हे काय नवीन ? सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती, ह्या दोघांनी हे कसे केले.

उद्घाटन सोहळा पार पडला आणि एका हॉटेल च्या मध्यभागी शरद आणि रेणुका उभे राहिले. सर्वांची नजर त्या दोघांवर खिळली होती.
हॅलो everyone, असे बोलून शरदने बोलायला सुरुवात केली.

माझी आणि रेणुकाची ओळख कॉलेजात फॉर्म भरायच्या लाईन मध्ये झाली. तिथे आम्हाला समजले की कॉमर्स हा विषय आम्हा दोघांचा नाही. तरीही कमी मार्क्स आणि घरच्यांच्या जबरदस्ती मुळे आम्हाला मनासारखी शैक्षणिक लाईन घेता आली नाही. ह्या विषयावर आम्ही खूप चर्चा केली आणि आपली स्वप्न आपण पूर्ण करायची. एका बाजूला शिक्षण घेत राहिलो आणि दुसऱ्या बाजूला hotel management चा कोर्स पूर्ण करत होतो. मला जेवण बनवण्याची खूप आवड आहे पण आपल्या इथे पुरुषाने जेवण बनवणे म्हणजे बायलेपणाची लक्षण म्हणून टोचून बोलले जाते. तसेच रेणूकाला management मध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण तिला घरून support मिळत नव्हता त्यामुळे तिचीही करिअरच्या बाबतीत नाचक्की होत होती.

आम्ही निर्णय घेतला की ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर management ची exam द्यायची आणि स्वतःच हॉटेल उघडायचं. एकदा का आपण यशस्वी झालो की आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. म्हणूनच रोज कॉलेज संपल्यावर आम्ही एका निवांत ठिकाणी आमचे प्लॅन्स discuss करायचो. रोज ऑनलाईन प्रशिक्षण घ्यायचो. नोट्स लिहायचो. पण तुम्ही सर्वांनी फार चुकीचा अर्थ काढलात. जोपर्यंत आपण आपले स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत ह्याची चर्चा चार चौघात करायची नाही असे दोघांत ठरले होते.

आज मी उपस्थित असलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो… एक मुलगा आणि मुलगी फक्त प्रेम प्रकरणच करू शकतात का ? त्याच्या ह्या प्रश्नावर सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स…. आमच्यात खूप छान bonding आहे, आमचे स्वप्न होते स्वतःचे हॉटेल उघडायचे. ह्यात किती प्रमाणात पुढे आम्ही यशस्वी होऊ माहित नाही , पण आम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं. प्रत्येक नात्याला नेहमी काहीतरी नाव जोडलेच पाहिजे का ? तुम्ही केवळ मुलगा मुलगी एकत्र गप्पा मारताना दिसले म्हणजे त्यांच काहीतरी लफड सुरू आहे असा निष्कर्ष लावता.

आणि त्यात जर एकत्र गार्डन मध्ये बसले म्हणजे तुमच्या विचारसरणीचा अंत बघायलाच नको. आमच्यात काय नातं आहे ह्यावर मला चर्चा करायचीच नाही, आणि मुळात मी का चर्चा करू ? प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. जो तो ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे विचार करणारं. तिथे उभे असलेल्या अर्ध्या जणांनी शरमेनं माना खाली घातल्या. आम्हाला इथे कोणाचा अपमान करायचा नव्हता, रेणुकाच्या ह्या बोलण्यावर काही जणांचे कान अजून उंचावले.

परक्या मुलीला नावं ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? प्रिन्सिपल सरांचे लेटर जेव्हा घरी आले तेव्हा मला किती प्रकारचा त्रास सहन करावा लागला असेल ह्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. असो, जे झालं ते झालं. आज आम्ही मिळवलं ज्यासाठी आम्ही झटत होतो. यापुढे तुम्हा सर्वांची साथ लाभेल हीच सदिच्छा. भल्या मोठ्या हॉल मध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!