Skip to content

ब्रेकअप नंतरही ती ‘त्याला’ विसरू शकत नव्हती, संतापायची….आणि अचानक ???

ब्रेकअप नंतरही ती ‘त्याला’ विसरू शकत नव्हती, संतापायची….आणि अचानक ???


तिचं डोकं भणभणायला लागलं. काहीतरी प्यावं म्हणून आजूबाजूला पाहिलं तर समोरच कॉफी शॉप दिसलं. आत आल्यावर कोपऱ्यातलं एक टेबल रिकामं दिसलं. ती टेबलाकडे निघाली, तितक्यात एक रुबाबदार देखणा तरुण तिथे येऊन बसला. ती संतापली.

ब्रेकअप होऊन एक महिना झाला तरी आभाच्या मनातून नील जात नव्हता. ब्रेकअप झाल्यानंतर आभा एकही दिवस शांतपणे झोपू शकली नव्हती. तिच्यासाठी आयुष्य एकदमच उदास झालं होतं. नीलची सवय झाली होती तिला, पण नील ‘मला आता हे नातं नको आहे,’ असं सांगून तिला एकटं सोडून निघून गेला होता. त्याने काही कारणही दिलं नव्हतं. दोघांचं सुंदर नातं एका क्षणात संपुष्टात आलं होतं.

आभाळ कोसळल्यासारखं वाटलं आभाला! ती नीलमध्ये इतकी गुंतलेली होती की तिचं आयुष्य नीलवर सुरू होऊन नीलवरच संपत होतं. आभासाठी नात्याच्या नावापेक्षा नात्यातली सत्यता जास्त महत्त्वाची होती, त्यामुळे नीलच्या ‘लिव्ह इन’ पर्यायालाही तिने आक्षेप घेतला नव्हता. सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच नील तिच्या आयुष्यातून निघून गेला होता. या गोष्टीचा आभाच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता, कामातही लक्ष लागत नव्हतं. त्याचा परिणाम ऑफिसच्या परफॉर्मन्सवर व्हायला लागला तेव्हा मात्र तिने नीलला पूर्णपणे मनातून काढून टाकायचं ठरवलं, पण ते होत नव्हतं. सैरभैर अवस्था झाली होती तिची. एकदा अशीच ती रस्त्यावरून चालत होती. विचारांचं काहूर तिची पाठ सोडत नव्हतं. तिचं डोकं भणभणायला लागलं. काहीतरी प्यावं म्हणून आजूबाजूला पाहिलं तर समोरच कॉफी शॉप दिसलं. ती नकळत आत शिरली. नेमकी आज गर्दी होती. आभा आत शिरली खरी, मात्र लोकांची बडबड तिला सहन होत नव्हती. पण कॉफीने बरं वाटेल असा विचार करत तिने सगळीकडे नजर फिरवली. तेवढय़ात तिला कोपऱ्यातलं एक टेबल दिसलं तिथे कोणी बसलेलं नव्हतं. ती खूश झाली आणि टेबलाकडे निघाली, तितक्यात एक रुबाबदार देखणा तरुण तिथे येऊन बसला. तोही एकटाच होता. त्याने आपली जागा घेतली हे पाहून आभा संतापली, ‘‘अहो.. हॅलो मिस्टर, मी इथे बसतीये!’’ आभाच्या बोलण्यातून ती चिडलीये हे त्या तरुणाला जाणवलं आणि तो जरा सावरून बसला..

‘‘उठा इथून! असं वागण्याची पद्धत नसते..’’ आभा म्हणाली.

‘‘सॉरी, पण तुम्ही आधी टेबल बुक केलं होतं का? इथे रिझव्र्ड असा बोर्ड दिसत नाहीये आणि मी तुमच्या आधी बसलो.’’

‘‘टेबल बुक केलं नाही म्हणून काय झालं? मला आत्ता कॉफी हवीये हो. माझं डोक भणभणतंय. तुम्ही प्लीज दुसरीकडे जाऊन बसता का?’’

‘‘अहो मॅडम, मला पण कॉफी हवीये म्हणूनच तर मी इथे आलोय ना.. आणि दुसरीकडे कुठे जागा दिसतेय का तुम्हाला? असेल तर ती दाखवा मी तिथे बसतो, माझी काही हरकत नाही.’’ तो शांतपणे उत्तरला.

आभाने चौफेर नजर फिरवली, पण एकही टेबल रिकामं नव्हतं. तिने मानेनेच नकार दिला आणि शेवटी म्हणाली, ‘‘जाऊ देत.. मीच जाते. तुम्ही प्या कॉफी.. आणि सॉरी! मी जरा जास्तच चिडले.. पण मला आत्ता कॉफीची खूप गरज होती.’’

‘‘सॉरी बिरी नको हो.. बाय द वे, माझ्या समोरची जागा रिकामी आहे.. यु कॅन सीट देअर अ‍ॅण्ड हॅव युअर कॉफी!’’

आभाने थोडा विचार केला.. आणि ‘नुसती कॉफी तर प्यायची आहे, पिऊ आणि लगेच निघू.’ असा विचार करत मानेनेच होकार

देत ती तिथेच त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली.. तिने मेन्यू कार्ड पाहिलं. पटकन उठली आणि हॉट कॅपेचीनोची ऑर्डर देऊन आली.. मग ती डोळे बंद करून बसून राहिली.. तो तरुण विचारात पडला.. आत्ता भांडणारी मुलगी एकदम डोळे मिटून शांत का बसली असेल? पण त्याने तो विचार झटकला. मेन्यू कार्ड पहात त्याने त्याची ऑर्डर दिली आणि मोबाइल पाहायला लागला. तितक्यात आभाची कॉफी आली. वेटरच्या येण्याने आभाची तंद्री भंगली. आणि समोर आलेल्या वाफाळत्या कॉफीने तिचा मूड चांगला केला. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. समोर बसलेल्या त्याच्याकडे नजर टाकली, हसली.. आणि कॉफीचा घोट घेतला. तिला जाणवलं, त्या तरुणाला भेटल्यापासून तिने एकदाही नीलचा विचार केला नव्हता. म्हणजे नीलचा विचार मनातून काढून टाकणं इतकं काही अवघड नाही.

तो तरुण आभाकडेच पाहत होता. इतक्या वेळात आभा पहिल्यांदाच हसली होती. त्याला आश्यर्य वाटलं. न राहवून तो आभाशी बोलायला लागला, ‘‘हसलात.. तुम्ही! आल्यापासून वैतागलेल्या होतात.. माणसाने हसावं. मला असं वाटतंय तुम्ही कसल्यातरी तणावाखाली आहात. एक सांगू? म्हणजे सांगतोच, कोणत्याही गोष्टीने आपल्या आयुष्यावर फार परिणाम होऊन द्यायचा नाही. मी इथे आलोय कारण आत्ताच माझ्या मैत्रिणीशी भांडण झालंय.. पण तोच विचार करत बसलो असतो तर मात्र मला त्रास झाला असता. जे आत्ता आहे ते आयुष्य खरं असं मानून आयुष्य जगलं की कोणताच त्रास होत नाही. आणि सॉरी! मी हे सगळं सांगायची गरज नसेलही कदाचित.. पण मी सांगितलं.’’

आभा काहीच बोलली नाही. त्याला जाणवलं, आपण अनोळखी व्यक्तीशी बोलायला नको होतं. मग मात्र त्याने कॉफी प्यायला सुरुवात केली. जरा वेळ शांततेत गेला. त्याचं बोलणं ऐकून आभाचा मूड बदलला होता. तिने कॉफी संपवली. आणि शांतता भंग करत म्हणाली, ‘‘थँक्यू सो मच! पहिली गोष्ट, तुमच्यामुळे मला आत्ता कॉफी पिता आली. म्हणजे तुम्ही इथे बसायला नाही म्हणाला असतात तर वैतागून बाहेर निघून गेले असते. त्याने मला आणखीनच त्रास झाला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जे काही अनवधानाने मला सांगितलं, ते खूप महत्त्वाचं होतं. तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझी किती मदत केलीये. तुम्ही बरोबर ओळखलं.. हो, माझा ब्रेकअप झालाय म्हणून मी गेले कैक दिवस दु:खात होते. त्यातून मला बाहेर पडताच येत नव्हतं. आधी माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तोच होता, पण तुमचं बोलणं ऐकून मला त्याच्याशिवाय आयुष्य जगायला नवीन ऊर्जा मिळाली. थोडय़ा शब्दात आयुष्याचं सार सांगितलं तुम्ही. तो अगदी माझ्या जवळचा, पण मला दुखवून निघून गेला आणि तुम्ही अनोळखी असूनही मला आयुष्याचा अर्थ सांगून गेलात.. खूप खूप धन्यवाद! आणि हो, तुमचं गर्लफ्रेंडशी झालेलं भांडण लवकरच मिटेल. नक्की.’’ ती हसत म्हणाली.

तो तरुण ऐकत होता. त्याचे डोळे लकाकले, कोणाला तरी मदत केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

‘‘माय प्लेजर!’’ तो इतकंच बोलला. आभा वळली आणि लगबगीने कॉफी शॉपच्या बाहेर पडली. तिला नवं विश्व खुणावत होतं. आता दोघं परत एकमेकांना भेटणार की नाही हे दोघांनाही माहिती नव्हतं, पण आभाला कॉफी शॉपमध्ये खूप काही तरी मिळालं होतं आणि त्याला सुद्धा काही तरी चांगलं केल्याचं समाधान मिळालं होतं. एका कॉफीच्या कपाने आभाचं आयुष्य बदलून टाकलं होतं..

म्हणूनच, ‘अ कप ऑफ पॉझिटिव्हिटी’.. नेहमीच गरजेची !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “ब्रेकअप नंतरही ती ‘त्याला’ विसरू शकत नव्हती, संतापायची….आणि अचानक ???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!