Skip to content

“काही बायका दहावी नापास असूनही संसाराच्या परीक्षेत कायम मेरिटमध्ये असतात.”

“काही बायका दहावी नापास असूनही संसाराच्या परीक्षेत कायम मेरिटमध्ये असतात.”


मधुश्री देशपांडे गानू


“अरे संसार संसार,

जसा तवा चुल्यावर

आधी हाताला चटके,

तेव्हा मिळते भाकर..”

केवढा गर्भितार्थ सामावलेला आहे या आदरणीय बहिणाबाईंच्या चार ओळींमध्ये. अशिक्षित बहिणाबाईंना कसे एवढं संसाराचं, जगाचं, आयुष्याचं सार, मर्म समजलं असेल? किती अनुभव घेतले असतील! किती संवेदनशील, सामावून घेणारं मन असेल त्यांचं!..

आजचा आपला विषय हा अशिक्षित किंवा अर्धवट शिक्षण सोडून लग्न करून संसाराला लागलेल्या बायकांबद्दल आहे. इथे मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, जेव्हा एखादा विषय लेखासाठी घेतला जातो तेव्हा संपूर्ण विषयातील फक्त या एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून लिहायचं असतं. आत्ताचाच विषय पहा, मग तुम्ही म्हणाल सुशिक्षित बायका काय चांगला संसार करत नाहीत का? तर असं नसतं. प्रत्येक विषयाला अनेक कंगोरे असतात. आपण फक्त त्याच्या एकाच बाजू वर लक्ष केंद्रित केले आहे. असो..

आपल्या समाजात लग्न संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते योग्यच आहे. पण आजही समाजात मुलगी झाली की बहुतेक (सगळे नाही) लोक नाराज होतात. एक जबाबदारीची जाणीव, चिंता वाटू लागते. आजही समाजात लग्ना संबंधी अनेक कुप्रथा असल्याने मुलीचे आई-वडील अगदी चिंताक्रांत होतात. मुलगी वयात आल्यानंतर आणखीन वेगळी चिंता सतावू लागते. “कधी एकदा चांगल्या घरी लग्न होऊन जाते” , असं आई-वडिलांना वाटतं. त्यांचं बरोबरच असतं. मुलगी सुखाने नांदावी, तिला सुयोग्य जोडीदार मिळावा असं प्रत्येक मातापित्याला वाटत असतं.

आज बहुसंख्य मुली सुशिक्षित उच्चशिक्षित, अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . कोणत्याही क्षेत्रात पुढे अशा आहेतच. मग या मुली उत्तम संसार  करत नाहीत का?? तर असं अजिबातच नाही. कितीतरी उदाहरणे आहेत.  सुधा मूर्ती, किरण बेदी , अंजली भागवत… कितीतरी प्रसिद्ध यशस्वी स्त्रीया आहेत. पण आज आपण काही कारणांनी शिक्षण अर्धवट राहिलेल्या स्त्रियांबद्दलच बोलणार आहोत. शिक्षणासारखं दुसरं काही नाही.

शिक्षणाने तुम्ही समृद्ध होता, एक माणूस म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून विकास पावता. हे सगळं बरोबर आहे. पण कधीकधी घरातील विपरीत परिस्थितीमुळे मुली शिकत नाहीत. कधी मुलगी आहे काय करायचं शिकवून? लग्न करून संसारच करणार ना! जास्त शिकली तर तिच्या पेक्षा जास्त शिकलेला मुलगा कुठून आणायचा? असा विचार करतात.

खूपदा गाव खेड्यामध्ये शेतीकामासाठी आणि इतर शारीरिक कष्टासाठी घरातल्या माणसांची गरज, मदत लागते. अशावेळी मुली शिक्षण सोडून मदत करतात. आता कामाची सवय ठेवली तर पुढे संसाराला उपयोगी येईल असं आई वडिलांना वाटत असतं. कधीकधी खूप भावंडे असतात व त्यांचे संगोपन करायला घरातल्या मोठ्या मुलीला शिक्षण सोडून घरी बसावे लागते. कधी शिक्षणात अजिबातच रस नसतो म्हणून शिक्षण अर्धवट राहतं.

पण कागदोपत्री शिक्षण अर्धवट राहिलेल्या पुष्कळ बायका या संसारात मात्र तरबेज असतात. अगदी उत्तम स्वयंपाक करण्यापासून,  पै पाहुण्यांचं आगत-स्वागत, घरातली इतर अनेक कामं, बाहेरील व्यवहार यात हुशार असतात. पतीची योग्य साथ लाभली तर उत्तमच. पण काही वेळा दारूडा, व्यसनी पती असेल तरीही मुलांची जबाबदारी, घराची, आर्थिक जबाबदारी अतिशय कौशल्याने निभावतात. आपल्याकडे कामाला येणाऱ्या स्वयंपाक करणार्‍या मावशी आणि गृहमदत सखी बघा बरं! कितीतरी जणींचे संसार सुखाचे नसतात.

पण त्या हात पसरत नाहीत. चार घरी कष्टाची काम करून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. सणवार, हौस मौज सगळे हसतमुखाने करतात. आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये त्यांना काय हवं नको बघायला जातो. तिथे तर शिक्षणाची वानवाच असते. पण अगदी कुडाची, छोटीशी खोपटं असलेली घर असली तरीही स्वच्छ सारवलेले अंगण, अतिशय चकचकीत एकसारखी लावलेली भांडीकुंडी, आहे त्यात घर सजवलेलं असतं.

आणि नेहमी हसतमुख. त्यांच्या हातचा साधा आमटी भात, उकडलेली कंदमुळे इतकी चविष्ट असतात. परत निघताना परसातली भाजी पिशवी भरून देतील. परत या ..म्हंटतील. केवढी आत्मीयता दाखवतात. या बायका संसारात मेरीट मध्येच आहेत ना! परत आता राहणीमानही सुधारले आहे. छान टापटीप सुंदर राहतात. मला फार कौतुक वाटतं या सगळ्यांचं..

कित्येकदा पती निधनानंतरही स्त्रिया एकट्या संसाराचा गाडा घरातील सासरच्या सर्व माणसांना सांभाळून यशस्वी चालवतात. अगदी अर्धवट शिक्षित असल्या तरी व्यवहारात चोख असतात. नुसतं चूल मूल करत नाहीत. बाहेरचे, बँकांचे व्यवहार खूप छान करतात. मी स्वतः गावातच राहते त्यामुळे अशा स्त्रियांना जवळून ओळखते. नवीन काहीतरी शिकायची जिद्द असते. आज कित्येक अशा स्त्रियांनी स्वतःचे बचत गट निर्माण करून यशस्वीरित्या चालवले आहेत. यशस्वी उद्योजिका आहेत काही जणी. अवाढव्य शेतमळा पतीच्या मागे धडाडीने एकट्या निभावत आहेत. एकट्या स्त्रीने शेती यशस्वीपणे सांभाळणे सोपे काम नाही.  हे सगळं मी स्वतः पाहिलेल्या स्त्रियांबद्दल बोलत आहे.

मुळात स्त्री ही पुरुषापेक्षा मनाने ताकदवान असते. जगण्यासाठी चिवट असते. म्हणूनच ती तिचे घर सोडून नवीन घरात, नवीन माणसांमध्ये रुळू शकते. एखादा बदल स्त्री पटकन स्वीकारते. विचार करा, एखादा कठीण प्रसंग जर घरावर आला तर पुरुष हताश होईल पण स्त्री पटकन,” अहो मी आहे ना! तुम्ही नका काळजी करू. सगळ ठीक होईल.” असा विश्वास नवऱ्याला देते. नवऱ्याच्या नकळत पैशांची जमेल तशी बचत करते. वेळप्रसंगी नवऱ्याची, घरातल्या सदस्यांची आई होते. संसार सुखाचा व्हावा , मुलांचं भलं व्हावं म्हणून अहोरात्र कष्ट करते. एकाच वेळी अनेक आघाड्या यशस्वीपणे सांभाळते.

तर अशी ही दहावी नापास असलेली स्त्री संसारात मात्र पैकीच्या पैकी गुण मिळवते. आणि असेल त्या परिस्थितीला तोंड देत, मार्ग काढत संपूर्ण घराला बरोबर घेऊन घर आनंदी, यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करते…. अखंड……


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!